मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:35 AM2017-11-21T04:35:32+5:302017-11-21T04:35:36+5:30

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे.

Due to the closure of Mumbai University ... | मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

Next


मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे. विद्यापीठाने आपल्या १५०व्या वर्षांत पदार्पण करताना ‘गौरवशाली’ इतिहास, परंपरेचा वारसा सांगत कार्यक्रम केले. एकीकडे विद्यापीठ इतिहासाच्या स्मरणरंजनात गुंतलेले असताना उद्योगविश्वाने आपली भलतीच अडचण मांडली होती. विद्यापीठाच्या फॅक्टरीतून पदवी वगैरे घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी पुरेसे तयार नसतात. पदव्यांची गुंडाळी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी आम्हालाच परत त्यांना प्रशिक्षित करावे लागते. मग, पदवी किंवा अन्य अभ्यासक्र मांचा उपयोगच काय, असा रोकडा सवाल उद्योगविश्वाने उपस्थित केला होता. त्याला आता दहा वर्षे उलटली. पण, प्रश्न तसाच आहे. गेल्याच वर्षी ‘फिक्की’ या उद्योगविश्वातील अग्रणी संस्थेने एक अहवाल सादर केला. भविष्यातील रोजगारांच्या संधींचा वेध घेणाºया अहवालाने आपल्याकडील उच्चशिक्षणाची तकलादू अवस्था आणि त्याच्या ढिम्मपणावर चिंता व्यक्त केली होती. मात्र, गौरवशाली वारसा सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया विद्यापीठाला दहा वर्षांत या समस्येकडे पाहावेसे वाटले नाही. १६० वर्षांच्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात एकाही कुलगुरूची हकालपट्टी झाली नव्हती. ती या वर्षी झाली इतकेच काय ते घडले. त्यातही विद्यापीठीय राजकारणाचा बेरकीपणा असा की आॅनलाइन तपासणीत जो काही गदारोळ झाला त्याला फक्त कुलगुरूच जबाबदार. त्यांची हकालपट्टी झाली म्हणजे आता विषय संपला. आॅनलाइन तपासणीची संकल्पना मांडणाºया संजय देशमुखांना त्याची कालबद्ध अंमलबजावणी करता आली नाही; म्हणून त्यांची संकल्पना चुकीची ठरत नाही. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाइन तपासणीच्या गदारोळाला ‘इष्टापत्ती’ म्हटले आहे. विद्यापीठाच्या दगडी भिंतींआड जे बिनबोभाट सुरू होते ते आॅनलाइनमुळे उजेडात आले. शासनकर्त्यांनाही अचंबा वाटावा इतक्या गडबडी वर्षानुवर्षे होत होत्या. विद्यापीठाने स्वत:चा वारसा सांगायचा नसतो. त्यांनी ज्यांना घडविले त्यांच्या कर्तृत्वातून तो आपसूक मिरवला जातो. हे साधायचे असेल तर परीक्षा, पेपर, उत्तरपत्रिका आणि निकाल इतक्या लघुदृष्टीच्या विद्यापीठ प्रशासनाला जागे करावे लागेल. त्यापुढे पाहण्याची, त्यासाठी झटण्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. तरच, अभिमान बाळगावा, वारसा सांगण्याजोगे विद्यापीठाकडे काही शिल्लक असेल. पेपरफुटीसह इतर प्रश्नांनीही विद्यापीठाला घेरले आहे. ते सर्व प्रश्न तातडीने सोडविले नाही, तर पदव्या वाटणाºया देशातील अनेक संस्थांपैकी एक एवढीच तिची ओळख असेल.

Web Title: Due to the closure of Mumbai University ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.