धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

By अतुल कुलकर्णी | Published: January 31, 2018 12:28 AM2018-01-31T00:28:15+5:302018-01-31T00:28:36+5:30

तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती.

 Drama grandfather, your mind! | धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

Next

प्रिय धर्मा आजोबा,
तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती. तुमच्यामुळे सगळ्यांचा सोमवार वाया गेला. म्हातारपणी हे असा त्रास देणं बरोबर नाहीय.
तुम्ही तुमचं निवेदनं कलेक्टर, तहसीलदार यांना दिलं असतं तर कधी ना कधी तुम्हाला न्याय मिळाला असता. शेजारच्या नेत्याला जेवढा मोबदला मिळाला तेवढाच तुम्हाला मिळाला पाहिजे असा आग्रह कसा काय धरू शकता तुम्ही? कुठे तुम्ही आणि कुठे ते नेते? आमचे सरकार पारदर्शक आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र सिस्टिम उभी करतोय. पण तुम्हाला घाई झाली. आमची सिस्टिम उभी राहण्याच्या आतच तुम्ही विषाची परीक्षा केलीत... थोडे थांबला असता तर तुम्हाला आमची पारदर्शक यंत्रणा दिसली असती... पण तुम्ही घाई केली. तुमचं चुकलंच आजोबा... तहसीलदार, कलेक्टर, आयुक्त सगळ्यींना इतरही कामं असतात. या वयात तुम्ही सगळीकडं फिरत बसण्यापेक्षा तुमचं काम एखाद्या दलालाला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हालाही हवा तेवढा मोबदला मिळाला असता आणि त्या नेत्यालाही त्याचा हिस्सा मिळाला असता. पण नाही, तुम्ही पडलात गांधीवादी. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी ३० दिवसाच्या आत तुमचा प्रश्न सोडवण्याचे लेखी पत्र तुमच्या मुलाकडे दिलं. तुमच्या जमीन संपादनात चूक झाली असेल तर व्याजासह मोबदला देऊ असंही लिहून दिलं त्यांनी त्या पत्रात. अहो, तुम्ही गेल्याची बातमी कळताच धावत पळत, आमच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलं... अजून काय करायला पाहिजे होतं त्यांनी? तुम्ही मात्र घाई केली हे चुकलंच तुमचं! आमची घाई सुध्दा विरोधकांना पहावत नाही. आता ते म्हणू लागले की, व्याजासह मोबदला मिळेलही पण गेलेली जिंदगानी व्याजासहित थोडीच येणार? हे काय बोलणं झालं का बरं? आमच्या मंत्र्यांना नागपुरातली इतरही कामं खूप आहेत, अमृत पाणीपुरवठा योजनेचे टेंडर ५० टक्के जास्ती आलं तरी आम्ही पाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते टेंडर पास केलचं ना... मग तुम्हालाही दिला असता जास्तीचा मोबदला. पण तुम्ही पारदर्शकपणे ते काम दलालाला न देता स्वत:च पायपीट करत राहिलात. हे काय बरोबर नाही केलं तुम्ही आजोबा...
नवाब मलिक सुध्दा विनाकारण आमच्या जयकुमार रावलांवर आरोप करू लागलेत. काय तर म्हणे त्यांनी त्या भागात जमिनी घेऊन ठेवल्या, तुम्हाला मोबदला देण्यासाठी ठेवलेली बैठक त्यांनीच दोनवेळा रद्द करायला लावली... अहो, इतर काही कामं असतील म्हणून बैठक रद्द झाली असेल. याचा अर्थ ती तुमच्यासाठी रद्द केली असा होता का? आता कोणीतरी म्हणालं की, मंत्र्यांच्या नावावर जर आपल्या जमिनी केल्या तर मोबदला जास्तीचा मिळेल. पण आता हे कळून काय उपयोग. तुम्ही तर घाई केलीत. नाहीतर ही आयडिया तुमच्या कामी आली असती ना...? सरकार बदललं म्हणजे सगळी सिस्टिम बदलते असं कसं वाटलं तुम्हाला? म्हणूनच म्हणालो, तुमचं चुकलचं धर्मा आजोबा...
 

Web Title:  Drama grandfather, your mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.