डॉक्टरविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:14 AM2017-11-12T00:14:32+5:302017-11-12T00:14:57+5:30

नुकतेच मनसेने मुंबई व पुण्यात डॉक्टरांना धमकवणारे व ‘रुग्णांकडे पैसे मागाल तर खबरदार!’ अशा आशयाचे बॅनर लावले. त्याविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे राज ठाकरे यांना खुले पत्र...

Do not set social war against doctors | डॉक्टरविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका

डॉक्टरविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका

Next

- डॉ. अमोल अन्नदाते

नुकतेच मनसेने मुंबई व पुण्यात डॉक्टरांना धमकवणारे व ‘रुग्णांकडे पैसे मागाल तर खबरदार!’ अशा आशयाचे बॅनर लावले. त्याविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे राज ठाकरे यांना खुले पत्र...

आदरणीय राज ठाकरे,

सध्या आपल्या हिट लिस्टवर फेरीवाल्यांनंतर डॉक्टर आल्याचे पाहून खरे तर बरे वाटले की, किमान आपल्यासारख्या ‘व्यस्त’ नेत्याला पक्ष स्थापनेनंतर एवढ्या वर्षांनी वैद्यकीय क्षेत्राची दखल घ्यावी वाटली, पण वाईटही वाटले. कारण आपल्यासारख्या अभ्यासू नेत्याकडून ती अशा प्रकारे घेतली जाईल, अशी मुळीच अपेक्षा नव्हती.
रुग्णांकडे डिप़ॉझिट मागाल तर गाठ मनसेशी आहे, हॉस्पिटलविषयी तक्रार असल्यास संपर्क करा, या आपल्या आव्हानांचा नेमका हेतू काय? आपल्याला डॉक्टरांमध्ये भीती निर्माण करायची आहे व त्यांनी आपल्याशी किंवा आपल्या स्थानिक मनसे नेत्यांशी ‘विशेष’ चर्चेला यावे, असा आपला हेतू आहे की, आपण जनतेला कोणापासून तरी कसे वाचवत आहोत? हे दाखविण्यासाठी राजकारणात गरजेचा असलेला काल्पनिक शत्रू म्हणून आपण या वेळी डॉक्टरांची निवड केली आहे? की, आपल्याला खरेच महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राचे भले करायचे आहे? कारण आपल्याला खरेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रासाठी भरीव करायचे असेल, तर आपला मार्ग पूर्ण चुकला असल्याचे, मी डॉक्टर म्हणून आपल्याला मनापासून व जबाबदारीने सांगू इच्छितो. आपण आज वैद्यकीय क्षेत्राचा सखोल अभ्यास केल्यास, आपल्या लक्षात येईल की, आज आरोग्यसेवेचा ७० टक्के भर आज खासगी डॉक्टर वाहात आहेत. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आपण स्वत: एखाद्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे, तर आम्ही काम करत असलेल्या ग्रामीण भागातही एक दिवस तरी एखाद्या हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये व डॉक्टरबरोबर घालवा आणि रुग्णालय चालवत असलेल्या डॉक्टरचे रोजचे हिशेब, त्यांचे खर्च तपासून पाहा. मला यात आपल्याला डॉक्टरांची बाजू समजावून सांगायची नाही, पण आपण ग्रास रूट ट्रूथ्स म्हणजे मूळ सत्य समजावून घ्यावे व मग खुशाल डॉक्टरांना जाहीर सुळावर चढवावे. कारण तसा कोणालाही धारेवर धरण्याचा हक्कच आपल्याला उभ्या महाराष्ट्राने बहाल केला आहे. आज खासगी डॉक्टरांना रुग्णालय चालविणे हे अत्यंत जिकिरीचे झाले व स्वत:चे हॉस्पिटल हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. त्यातच क्रिटिकल केअर म्हणजे, सिरिअस रुग्णांवर उपचार करणाºया शाखेपासून डॉक्टर अधिकच लांब जात आहेत. असे का होत आहे, याची कारणे आधी आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या अशा धमक्यांमुळे अशी बोटावरील निष्णात मंडळीही आपल्याला संपवायची आहेत का? लहान रुग्णालये संपत चालल्यामुळे या मोठे उद्योग समूह प्रत्येक शहरात कॉर्पोरेट रुग्णालये उभारत आहेत. अनेक हुशार प्रामाणिक डॉक्टर एक तर स्वत:चे हॉस्पिटल बंद करून परदेशाची वाट धरत आहेत व उरलेले कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी पत्करून कमी पगारावर सेवा देत आहेत. आपल्यासारख्यांना ही रुग्णालये परवडतील, पण सर्वसामान्य रुग्ण या रुग्णालयात पाऊलही ठेवू शकत नाहीत. कवडीमोल किमतीत या रुग्णालयांच्या घशात घातलेले भूखंड, धर्मदाय नावाखाली चालणारी व आपल्या चांगल्या परिचयाच्या असलेल्या उद्योगपतींच्या मुंबईतील रुग्णालयात किती खाटा धर्मदाय आहेत? याची माहिती आपल्यासारख्या सुज्ञ नेत्याला नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यांच्याविरुद्ध ‘ब्र’ काढताना कधी दिसला नाहीत.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची काय स्थिती आहे? १,८१८ प्राथमिक आरोग्य केंद्रांची दयनीय स्थिती का झाली आहे व ती कशी सुधारता येईल, शासन सध्या आरोग्य क्षेत्रात काय योजना राबवत आहे आणि त्या लोकांपर्यंत कशा पोहोचविता येतील? याचा किमान अभ्यास केला असता, तसेच त्यावर दूरगामी नियोजनबद्ध काम सुरू केल्यास, या मुद्द्यावर आपला पक्ष येत्या विधानसभेत सत्तेत येईल. अर्थात, सत्तेसाठी राजकारण करणाºयांपैकी आपण नाही, हे तर उभा महाराष्ट्र गेली काही वर्षे अनुभवतच आहे. आज सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील १८ हजार पदे रिक्त आहेत. त्यासाठी आपण सरकार दरबारी लढा का दिला दिला नाही? आरोग्य क्षेत्र सुधारण्यासाठी खासगी डॉक्टरला सुधारविणे व धमकाविणे हा पहिला आणि शेवटचा अजेंडा आपल्याला दिसतो आहे का? आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये जर आरोग्याचा उल्लेख असेल, तर हे सगळे करून झाल्यावर शेवटचा पर्याय कदाचित खासगी डॉक्टर असू शकेल. कारण खासगी डॉक्टर हा एक व्यावसायिक आहे व तो सध्या समाजातील सगळ्यात त्रस्त व्यावसायिक आहे; हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, पण खासगी डॉक्टरची बखोटी धरून, त्याच्या विरोधात बॅनर लाऊन महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचा कायापालट होऊ शकत नाही, एवढे तरी आपल्याला नीट माहिती आहे. आपण मनसेतर्फे महाराष्ट्रातील एक जरी प्राथमिक आरोग्य केंद्र दत्तक घेत असाल, तर आम्ही महाराष्ट्राचे हवे तितके डॉक्टर आपल्या पाठीशी उभे आहोत. फक्त आपल्या फोटोच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण केले व बिलासाठी डॉक्टरला येऊन धमकावले म्हणजे राजकीय पक्षांची आरोग्याची जबाबदारी संपली का? आपण लावलेल्या असंख्य बॅनर्सच्या खर्चात एखाद्या गावाच्या सर्व बालकांचे लसीकरण झाले असते. डॉक्टर-रुग्ण नाते हे आज ताणले गेले आहे हे मान्य आहे, पण त्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांची धमकी, खळ्ळखट्याक, गाठ आमच्याशी आहे, अशा धमक्या हे उत्तर असू शकते का? हे आपल्यासारख्या कलासक्त व संस्कृतीवर प्रेम असलेल्या नेत्याला खरेच वाटते का, गावातील बुद्धिमान डॉक्टरांना धमकावण्यासाठी जे स्थानिक नेते आपण निवडले आहेत, ते तरी जनतेला किती जवळचे वाटतात? किमान याची तरी एकदा तपासणी करून पाहा. डॉक्टर-रुग्णांमध्ये अशी आपली धमकी संस्कृती आणून आपल्या मनसेचे यात किती भले होईल, माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राचे अपरिमित नुकसान होणार आहे, एवढे नक्की.

आपण आज वैद्यकीय क्षेत्राचा सखोल अभ्यास केल्यास, आपल्या लक्षात येईल की, आज आरोग्यसेवेचा ७० टक्के भर आज खासगी डॉक्टर वाहात आहेत. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आपण स्वत: एखाद्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे, तर आम्ही काम करत असलेल्या ग्रामीण भागातही एक दिवस तरी एखाद्या हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये व डॉक्टरबरोबर घालवा आणि रुग्णालय चालवत असलेल्या डॉक्टरचे रोजचे हिशेब, त्यांचे खर्च तपासून पाहा. मला यात आपल्याला डॉक्टरांची बाजू समजावून सांगायची नाही, पण आपण ग्रास रूट ट्रूथ्स म्हणजे मूळ सत्य समजावून घ्यावे व मग खुशाल डॉक्टरांना जाहीर सुळावर चढवावे.

Web Title: Do not set social war against doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.