किड्यांचे वाद अन् झाड बरबाद

By admin | Published: May 12, 2014 06:35 AM2014-05-12T06:35:03+5:302014-05-12T06:35:03+5:30

भीक मागणे चांगले की लूट करणे? भिकारी श्रेष्ठ की लुटारू श्रेष्ठ? कोणी म्हणते लुटण्यापेक्षा भीक मागणे चांगले.

Disposal of insects and clutter of trees | किड्यांचे वाद अन् झाड बरबाद

किड्यांचे वाद अन् झाड बरबाद

Next

अमर हबीब 

भीक मागणे चांगले की लूट करणे? भिकारी श्रेष्ठ की लुटारू श्रेष्ठ? कोणी म्हणते लुटण्यापेक्षा भीक मागणे चांगले. भीक मागणारा तुमच्या मर्जी विरुद्ध हिसकावून घेत नाही. तो याचना करतो. तुमच्यातील कणव जागृत करतो. करुणेच्या प्रेरणेने तो तुम्हाला दान देण्यास उद्युक्त करतो. भीक मागणे ही पुरातन परंपरा आहे. साधू संन्यासी आपला उदरनिर्वाह लोकांनी दिलेल्या अन्नावरच करायचे. लुटणे पाप आहे. भीक मागणे हे दात्याला पुण्य प्राप्त करून देते. अर्थात, लुटण्यापेक्षा भीक मागणे श्रेष्ठ आहे. लुटणार्‍याच्या बाजूने वेगळे समर्थन येते. तो म्हणतो, माणसाचे माणूसपण त्याच्या स्वाभिमानात असते. मी कोणापुढे वाकत नाही. हात पुढे करीत नाही. मला जे हवे असते ते सरळ हिसकावून घेतो. लूटमार करायला धोका पत्करावा लागतो आणि कष्टही करावे लागतात. भिकारी ना धोका पत्करतो ना त्याची कष्टाची तयारी असते. लुटणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नाही. त्याला जिगर लागते. दोन्ही बाजू वजनदार आहेत. अशा वेळेस निर्णय करणे मोठे कठीण होऊन जाते. भिकेचे उदात्तीकरण करावे की लुटीचे समर्थन करावे, काही समजत नाही. ही अडचण होण्याचे मुख्य कारण असे, की आपण फक्त दोनच पर्यायांचा विचार करतो. यापेक्षा अन्य पर्यायांचा विचार केला, तर हे दोन्ही पर्याय तकलादू आणि ताज्य आहेत, हे आपल्या लक्षात येईल. कोण्या एकेकाळी जेव्हा माणसाने शेती करायला सुरुवात केली तेव्हा एकदा शेतकर्‍यांकडे एवढे दाणे शिल्लक पडले की जेणे करून त्याला पुढच्या वर्षी अन्नासाठी रानोमाळ भटकायची गरज उरली नाही. शेतकर्‍यांकडे बचत निर्माण झाली. या बचतीवर काहींचा डोळा होता. काही जणांनी त्याच्याकडे याचना केली. ज्यांना जेवढे देणे शक्य होते तेवढे त्याने दिले. पण तो सर्वांच्या याचना पूर्ण करू शकत नव्हता. आपल्या गरजेपुरते त्याने ठेवून घेतले. तो देत नाही म्हटल्यावर काहींनी रातोरात त्यावर हल्ला केला व त्याच्याकडचे धान्य लुटून नेले. काम करून पिकविणारा शेतकरी आधी याचकांना बळी गेला नंतर लुटारूंनी त्याचा बळी घेतला. एकंदरीत नागवला गेला शेतकरी. पुन्हा तो राबला. पुन्हा पिकविले. पुन्हा जेव्हा बचत निर्माण झाली तेव्हा लुटारू टपूनच बसले होते. इकडून टोळी आली, तिने शेतकर्‍याला बडविले. तिकडून आली, तिने मारले. जे होते, ते सगळे लुटून नेले. शेतकर्‍याची बचत लुटारूंच्या घरात गेली. लुटारूंना उसंत मिळाली. त्यांनी पुढच्यावर्षी शेतकर्‍यांना लुटण्यासाठी नवी हत्यारे निर्माण केली. शेकडो वर्षे या अराजकतेला तोंड देत शेतकरी जमीन कसत होते. शेवटी ते म्हणाले, तुमच्या पैकी एकाने आम्हाला इतरांपासून संरक्षण द्यावे, आम्ही त्याला अर्धा माल देऊ. एका टोळीने हमी दिली. ती टोळी त्या प्रदेशाची राजा मानली गेली. शेती उत्पादनाचा ठरलेला हिस्सा महसूल झाला. लुटारूंमध्ये धाडस होते. ते धोका पत्करत होते. चार हात करण्याची त्यांची क्षमता होती. पण समाजातील सगळे लोक असे नव्हते. नसतातच. जे धाडसी नव्हते. जे कर्तबगार नव्हते, अंगचुकार होते. त्यांचीही शेतमालाला पाहून जीभ लवलवत होती. त्यांनी नवी शक्कल काढली. ते म्हणाले, तुला शेती करायला पाऊस लागतो. तो पाऊस जो इंद्रदेव देतो तो आमचे ऐकतो. तुला जर पाऊस हवा असेल, तर इंद्रदेव प्रसन्न करायला हवा. तू दाणे देऊन आम्हाला प्रसन्न कर आम्ही देवाला तुझी शिफारस करू. अशा नाना गोष्टी सांगून दाणे हस्तगत करणारा एक नवा वर्ग तयार झाला. तो पुरोहित वर्ग. लुटारूंमधून जसा राजा जन्माला आला तसा शेतकर्‍यांच्या दाण्यांची भीक मागणार्‍यांमधून पुरोहितवर्ग जन्माला आला. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाच उद्देशाने जन्माला आल्या आणि त्यांनी एकच काम केले ते म्हणजे शेतकर्‍यांचे दाणे फस्त करणे. शेतकर्‍यांना नागवणे. सगळा समाज भिकार्‍यांचा झाला, तर तो जगू शकत नाही, तसेच सगळा समाज लुटारूंचाही असू शकत नाही. भीक देणारा असल्याशिवाय भिकारी जगू शकत नाही, तसेच लुटायलाही कोणी तरी लागतोच, त्याच्या अस्तित्वाशिवाय लुटारूला अस्तित्व असू शकत नाही. भिकारी आणि लुटारू हे परोपजीवी किडे आहेत. ते कोणाच्यातरी अस्तित्वावर जगत असतात. उत्पादक हे खरे झाड आहे. शेतकरी असो की अन्य कोणी उत्पादक. त्यांच्या जीवावर अनेक लोक जगत असतात. त्यामुळेच त्यांना पोशिंंदा म्हटले आहे. लुटारू आणि भिकारी हे दोन्हीही झाड नासवणारे किडे आहेत. एक किडा म्हणतो, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरा म्हणतो, तू नाही मी श्रेष्ठ आहे. या वादात बिचार्‍या झाडाकडे कोणी पाहत नाही. किडा जर झाडाला अपायकारक असेल, तर तो मारला पाहिजे; कारण झाड जगले पाहिजे. आज झाड कृश झाले आहे आणि लुटारू आणि याचक मालक झाले आहेत. खरा प्रश्न झाड कसे जगेल, हा असला पाहिजे.

Web Title: Disposal of insects and clutter of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.