स्त्रीद्वेष्ट्यांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:23 AM2017-12-16T02:23:13+5:302017-12-16T02:23:28+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून जगभरातील कर्मठ व सनातनी लोकांना उत्साहाचे उधाण आल्याचे दिसले. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंडमध्ये ब्रेक्झिटच्या बाजूने उभ्या असलेल्या तेरेसा मे विजयी झाल्या तेव्हाही या उठवळांच्या उमेदीत आणखी भर पडली.

Defeat of feminists | स्त्रीद्वेष्ट्यांचा पराभव

स्त्रीद्वेष्ट्यांचा पराभव

Next

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून जगभरातील कर्मठ व सनातनी लोकांना उत्साहाचे उधाण आल्याचे दिसले. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंडमध्ये ब्रेक्झिटच्या बाजूने उभ्या असलेल्या तेरेसा मे विजयी झाल्या तेव्हाही या उठवळांच्या उमेदीत आणखी भर पडली. नंतर फ्रान्स आणि जर्मनीत त्यांच्या झालेल्या पराभवाने तो उत्साह काहीसा मावळला असला तरी त्याची मळमळ अजून पूर्णपणे शमली नव्हती. आता अमेरिकेच्या अलाबमा या राज्यात झालेली गव्हर्नरपदाची निवडणूक या वर्गाच्या रॉय मूर या उमेदवाराने घालविली आणि तेथे डेमोक्रेटिक पक्षाच्या उदारमतवादी व आधुनिक विचारांच्या डग जोन्स यांचा विजय झाला. त्यामुळे उदारमतवाद्यांना पुन्हा त्यांचे दिवस येत असल्याच्या शक्यता दिसू लागल्या आहेत. ‘अमेरिकेला गुलामगिरी आवश्यकच आहे’, ‘अमेरिकेतील स्त्रियांनी चूल-मूल हीच क्षेत्रे सांभाळली पाहिजे’ किंवा ‘स्त्रिया समाजकारणात आल्या तेव्हापासून देशाच्या समाजकारणाचा स्तर खालावला आहे’ असे एकाहून एक धक्कादायक व मूर्ख उद्गार काढणाºया मूर यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रकारासाठी ते अलाबमाला गेलेही होते. त्यांची सर्व मते फार चांगली असल्याचे प्रशस्तीपत्रही ट्रम्प यांनी त्यांना दिले होते. त्यातून या मूरवर अनेक स्त्रियांशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप होता. तशी प्रतिज्ञापत्रे घेऊन तीन स्त्रिया न्यायासनासमोर हजरही झाल्या. तरीही ट्रम्प त्यांच्या मागे राहिलेलेच जगाला दिसले. त्याचे एक कारण तशा आरोपांनी ट्रम्प यांनाही घेरले असणे हे आहे. अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार म्हणून निवड होण्याआधी ट्रम्प यांच्यावर अनेक स्त्रियांनी असे आरोप केले व तशी प्रतिज्ञापत्रेही जाहीर केली. तरीही ते निवडून आले. मात्र त्या आरोपांनी त्यांचा पिच्छा अजून सोडला नाही. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हेले (या भारतीय वंशाच्या आहेत) यांनी एका मुलाखतीत ट्रम्प यांच्यावरील ‘त्या’ आरोपांची चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर या आरोपांना किती अर्थ उरतो या प्रश्नाला उत्तर देताना हेले म्हणाल्या ‘निवडणुकीतील विजय हा नीतिमत्तेचे प्रशस्तीपत्र नव्हे. निवडणूक एखाद्याची लोकप्रियता सिद्ध करील. ती त्याचे सभ्यपण अधोरेखित करणार नाही’. विशेषत: मूर यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे महत्त्व आणखी वाढले आहे. ट्रम्प हे तसेही आपली लोकप्रियता घालवून बसलेले अध्यक्ष आहेत. त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची भाषा त्या देशात आता सुरू झाली आहे. त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य कमालीचे संशयास्पद आहे. आपल्या स्वत:च्या मुलीचे वर्णन ‘हॉट’ असे करणारा हा इसम आहे. सामाजिक व सांस्कृतिक बाबतीतही ते कमालीचे प्रतिगामी व कर्मठ आहेत. त्यांचा परधर्मीयांवर राग आहे. कृष्णवर्णीयांवर संताप आहे. मेक्सिकनांना ते शत्रू मानतात आणि मध्य आशियात त्यांना अशांतताच हवी आहे. त्यांच्या भूमिका स्त्रीविरोधी व वर्णवादी राहिल्या आहेत. ज्या स्त्रियांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले ‘त्या तसे करण्याच्या लायकीच्या तरी आहेत काय’ असे बेशरम उद्गार त्यांनी काढले आहेत. खरे तर अमेरिकेच्या इतिहासात इतका बेजबाबदार इसम कधी अध्यक्षपदावर आला नाही. त्यांनी केलेली मूरची निवड त्यांच्या पक्षालाही आवडली नाही. आता मूर पराभूत झाले आहेत. जगभरच्या कर्मठ, परंपरावादी आणि स्त्रीविरोधी प्रवाहांना अलाबमाच्या मतदारांनी लगावलेली ही चपराक आहे. आधुनिकतेच्या विजयाची ही परंपरा अखंड राहिली तरच ती जगातील लोकशाही व मानवाधिकार सुरक्षित करू शकणार आहे. ट्रम्प किंवा मूर सारखी वर्णद्वेषी, धर्मद्वेषी, स्त्रीद्वेषी आणि श्रमद्वेषी माणसे उद्या जगाच्या सत्तेवर आली तर ती साºया समाजाला पायदळी तुडवायला मागेपुढे पाहणार नाहीत.

Web Title: Defeat of feminists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.