भाष्य - शालिनता हरपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:14 AM2017-07-24T00:14:05+5:302017-07-24T00:14:05+5:30

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत

Commentary - Shalita ran away! | भाष्य - शालिनता हरपली!

भाष्य - शालिनता हरपली!

Next

आपल्या कामाचा सर्वसामान्यांच्या जीवनात प्रभाव दिसला पाहिजे. २० टक्के राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करत जगावे अशी भूमिका अखेरपर्यंत ठेवणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, राज्य मंत्रिमंडळातील दोनवेळचे माजी मंत्री तथा माजी खासदार शिवाजीराव पाटील हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख जीवन जगले. त्यातूनच त्यांनी सहकारमहर्षी, विकासपुरुष, सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्पष्ट व सुसंस्कृत भाषा, समंजसपणा आणि सहकार व लोकशाही विचारांशी त्यांनी शेवटपर्यंत बांधिलकी घट्ट ठेवली. यामुळेच त्यांच्या जाण्याने सामाजिक भान जपणाऱ्या पिढीचा एक दुवा निखळला असून राजकारणातील शालिनतेचा उत्तम प्रतिनिधी आपण गमावला असल्याच्या श्रद्धांजलीपर भावना उमटल्या आहेत.
राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या शिवाजीरावांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यानंतर राजकारणातून समाजाला भरपूर विधायक योगदान दिले. पेट्रोल कामगार, शेतकरी व शेतमुजरांचे प्रश्न त्यांनी सोडवले. जलसिंचनाचे क्षेत्र ७ हजार एकरावरून तब्बल ४० हजार एकरापर्यंत वाढवले. विजेचा प्रश्नसुद्धा सोडवला आणि शेतकऱ्यांना ऊस लावायचे आवाहन केले. त्यातून खान्देशच्या विकासात महत्त्वाचा ठरलेला शिरपूर साखर कारखाना आणि अनेक प्रकल्प उभे राहिले. शिसाका अल्पावधीत अग्रेसर ठरला. जागतिक साखर संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्याकडे रिफार्इंड साखरेचे उत्पादन त्यांच्याच प्रयत्नातून सुरू झाले.
१९७७ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेसची सर्वत्र पीछेहाट होत असताना त्यांनी धुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसला जिंकून दिल्या. पुढे सहकार मंत्रिपदही भूषविले. वसंतदादा पाटलांसोबत सबंध महाराष्ट्र पालथा घातला. शरद पवार युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा शिवाजीराव सचिव होते.
सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले शिवाजीराव हे अतिशय पुरोगामी विचारांचे होते म्हणूनच आपली धाकटी कन्या स्मिता पाटील हिला सिनेअभिनेत्री होण्यास आडकाठी न करता त्यांनी प्रोत्साहनच दिले. मोठी मुलगी डॉ. अनिता व मधली गीता यासुद्धा उच्चशिक्षित असून परदेशात आहेत. कन्येला प्रथम आणि पित्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कार अशा दुर्मीळ पालकांपैकी ते एक होते. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हासुद्धा आपल्या विधायक समाजकारणाचे फळ आयुष्याच्या उत्तरार्धात मिळाल्याची त्यांची समाधानाची भावना होती.

Web Title: Commentary - Shalita ran away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.