भाजपाचा घातक अजेंडा

By admin | Published: December 22, 2014 05:40 AM2014-12-22T05:40:51+5:302014-12-22T05:40:51+5:30

राज्यसभेत गोंधळ चालूच आहे आणि त्याला विरोधी पक्ष जबाबदार नसून मोदी सरकारच जबाबदार आहे. या सत्रात एका आठवड्यात दहा विधेयके संमत

BJP's dangerous agenda | भाजपाचा घातक अजेंडा

भाजपाचा घातक अजेंडा

Next

सीताराम येचुरी,मार्क्सवादी नेते

राज्यसभेत गोंधळ चालूच आहे आणि त्याला विरोधी पक्ष जबाबदार नसून मोदी सरकारच जबाबदार आहे. या सत्रात एका आठवड्यात दहा विधेयके संमत करण्यासाठी सहकार्य करून विरोधकांनी अभूतपूर्व काम केले आहे. सभागृहात गोंधळ चालू असतानाच विनियोजन विधेयकावर शिक्कामोर्तब करण्याचे काम करून सभागृहाने संसदीय लोकशाहीच्या परंपरेचे पालन केले आहे. सरकारने हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहात गोंधळ माजला. सरकारने या अजेंड्याखाली आपली दोन धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे धार्मिक अल्पसंख्यांचे, विशेषत: मुस्लिमांचे आणि ख्रिश्चनांचे सामुदायिक हिंदू धर्मांतर (घरवापसी) आणि दुसरे म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी शिक्षणसंस्थांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त ह्यउत्तम कारभार दिनह्ण साजरा करण्याचा निर्णय.
नवा सक्तीचे धर्मांतरबंदी कायदा मान्य करण्यास विरोधी पक्ष तयार आहे की नाही असा सवाल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करून विरोधी पक्षांना आव्हान दिले. सक्तीच्या धर्मांतर बंदीची तरतूद भारतीय संविधानात आणि दंडविधानात आहे, त्यामुळे अशा कायद्याची गरज नाही याकडे विरोधकांनी सरकारचे लक्ष वेधले पण सरकारने त्याची दखल घेतली नाही.
भाजपाचे मंत्री आणि खासदार संविधानातील हमी आणि दंडविधान या दोन्हीचे उल्लंघन करीत असतील तर त्यांना शिक्षा केलीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आणि तसे आश्वासन पंतप्रधानांनी द्यावे असा आग्रह धरण्यात आला. सध्या घडणाऱ्या अशा सर्व घटनांमागे विकास आणि समृद्धीच्या गोंडस नावाखाली राबविला जाणारा मोदी सरकारचा जातीय धु्रवीकरणाचा घातक अजेंडा आहे. आकाशात सोडण्यात येणाऱ्या विकासाच्या तथाकथित फुग्यांना कोसळणाऱ्या जीडीपीने आणि कोसळणाऱ्या औद्योगिक आणि उत्पादन आकड्यांनी चांगलीच टाचणी लावली आहे. लागवडीखाली येणारी जमीन कमी होत असल्याने कृषी उत्पादनही घटत आहे, त्याचबरोबर लोकांची क्रयशक्ती वाढवून अंतर्गत मागणी वाढल्याशिवाय आर्थिक परिस्थिती सुधारणे अशक्य आहे असे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे. देशात धार्मिक धु्रवीकरण वाढत असतानाच लोकांचे राहणीमान घसरत आहे. त्यामुळे लोकांत असंतोष पसरत आहे. परिणामी त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ख्रिसमस दिनाच्या दिवशी ह्यउत्तम कारभार दिनह्ण पाळण्याची घोषणा दिली आहे. त्याचा झारखंडच्या निवडणुकांत फायदा होईल असे गणित मांडण्यात आले आहे. असेच गणित उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत लव्ह जिहादचा नारा देऊ न मांडण्यात आले होते. वोट बँकेच्या राजकारणाचा हा अत्यंत वाईट प्रकार आहे.
देशाने सुसंस्कृतपणाकडे केलेल्या प्रगतिशील वाटचालीला अटकाव करून हिंदुत्वाची एकचालकानुवर्ती संस्कृती लादण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत हा प्रगतिशील संस्कृतीची प्रयोगशाळा आहे ही जगन्मान्य संकल्पना मागे पडत आहे. रवींद्रनाथ ठाकूरांनी भारताच्या या संपन्न वारशाबाबत म्हटले आहे, ह्लआर्य आणि बिगर आर्य, द्रविड आणि चिनी, स्कॅथियन, हून, पठाण आणि मोगल हे सर्व या संस्कृतीत आपली वेगळी ओळख विसरून सामावून गेले आहेत. त्यातून एक वेगळेच रसायन निर्माण झाले आहे आणि ते आहे आजचा भारत.ह्व स्वामी विवेकांनद म्हणतात, बुद्धाने क्रांती केली नसती तर प्रभावशाली उच्च जातींकडून होणाऱ्या अत्याचारांतून खालच्या जातींच्या कोट्यवधी पीडितांची कधीच सुटका झाली नसती. (विवेकानंदांचे कार्य, खंड ४, पृष्ठ ४६२). पुढे ते म्हणतात, या देशात समतेचा संदेश घेऊ न इस्लाम आला. प्रेम हाच धर्म झाला. त्यात वंश, वर्ण किंवा अन्य कशालाही थारा नव्हता. (विवेकानंदांचे कार्य, खंड १, पृष्ठ ४८३). माझ्या मन:चक्षुपुढे असा भारत आहे, ज्याचा मेंदू वेदान्तांनी बनलेला आहे आणि शरीर इस्लामने. (विवेकानंदांचे कार्य, खंड ६, पृष्ठ ४१६). आपण सर्वांनीच स्वामी विवेकानंदांच्या या विचारांना स्वीकारले पाहिजे.
परराष्ट्रमंत्री जो राष्ट्रीय ग्रंथ व्हावा अशी मागणी करीत आहेत, त्या भगवत्गीतेमध्येही ह्लभक्त ज्या कुणाची भक्ती श्रद्धेने करतो, त्यात माझे अस्तित्व असतेह्व, असे भगवंताने म्हटले आहे.
उज्ज्वल भारतासाठी आणि तेथील जनतेचा चांगल्या जीवनासाठी चालू असलेला लढ्याला बळ देण्यासाठी या संस्कृती विघातक शक्तींशी लढा देणे आता गरजेचे आहे.

Web Title: BJP's dangerous agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.