गुजरातची लढाई भाजपसाठी यंदा सोपी नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:15 AM2017-10-24T00:15:26+5:302017-10-24T00:15:35+5:30

राजकीय समरांगणात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर सा-या देशाचे लक्ष सध्या केंद्रित आहे. हिमाचलचे मतदान ९ नोव्हेंबरला व निकाल १८ डिसेंबरला आहेत.

BJP is not easy for BJP this year! | गुजरातची लढाई भाजपसाठी यंदा सोपी नाही !

गुजरातची लढाई भाजपसाठी यंदा सोपी नाही !

Next

- सुरेश भटेवरा

राजकीय समरांगणात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर सा-या देशाचे लक्ष सध्या केंद्रित आहे. हिमाचलचे मतदान ९ नोव्हेंबरला व निकाल १८ डिसेंबरला आहेत. गुजरातच्या मतदानाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी निकाल १८ डिसेंबरलाच आहेत हे निश्चित. गुजरातच्या रणांगणात डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत भाजप विरूध्द काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमधे अटीतटीची झुंज रंगणार आहे. प्रचाराचा प्रारंभ मात्र आत्तापासूनच सुरू झाला आहे. भाजप गुजरातमधे सलग २२ वर्षे सत्तेत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान मोदी देशाचे पंतप्रधान झाले.भाजपसाठी अनेक वर्षानंतर यंदा पहिलीच अशी निवडणूक आहे की प्रचाराचे नेतृत्व जरी मोदींकडे असले तरी ते स्वत: उमेदवार नाहीत. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आपली सारी शक्ती पणाला लावून ‘गर्जे गुजरात’ घोषणेसह यंदा १८२ पैकी १५0 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे. गुजरातमधे वातावरण विरोधात आहे, यंदाची निवडणूक भाजपसाठी अजिबात सोपी नाही, याचा अंदाज एव्हाना मोदी आणि शाह दोघांनाही आला आहे. पाटीदार पटेल, ओबीसी आणि दलित समुदाय भाजपच्या विरोधात आहेत. या समुदायांच्या ३ तरूण नेत्यांनी कोणत्याही स्थितीत भाजपच्या पराभवाचा निर्धार केल्याचे जाणवते आहे. गुजरातमधे आजवर अजिंक्य ठरलेले मोदी प्रचारमोहिमेच्या पहिल्या टप्प्यात काहीसे नर्व्हस तर राहुल गांधी प्रचंड उत्साहात असल्याचे चित्र सर्वांना जाणवले. पाटीदार अनामत आंदोलन समितीने २0१५ साली पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवला. गुजरात सरकारने सर्वशक्तिनिशी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला मात्र पटेल आरक्षणाच्या मागणीची धग आजही संपलेली नाही.
अमेरिकेचा दौरा आटोपून राहुल गांधींनी गुजरातमधे प्रवेश करताच, हार्दिक पटेलांनी व्टीटव्दारे त्यांचे स्वागत केले. पाटीदारांचा कल यंदा काँग्रेसच्या बाजूने असल्याचे संकेत त्यातून स्पष्टपणे ध्वनित झाले. गुजरातच्या एकुण मतदानात पाटीदार पटेलांचे मतदान १२ टक्के आहे. तथापि पटेल समुदाय आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने वातावरणावर प्रभाव टाकण्याची क्षमता या समाजात आहे. अमित शाह यांच्या रणनीतीनुसार पाटीदार समाजाची मते आपल्याकडे वळवण्याचे सारे प्रयत्न भाजपने चालवले आहेत. अनामत आंदोलनाच्या नेत्यांविरूध्द कोर्टातले सारे खटले गुजरात सरकारने मागे घेतले इतकेच नव्हे तर पोलीसांनी आंदोलकांवर केलेल्या अत्याचारांच्या चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. तरीही हार्दिक पटेलांचे मन वळवण्यात भाजपला यश आले नाही. गुजरातचा दलित समाज अनेक कारणांनी भाजपवर नाराज आहे. २0 हजार दलित तरूणांनी ‘यापुढे मृत जनावरे उचलणार नाही आणि डोक्यावर मैला वाहणार नाही’ अशी शपथ घेत ‘आजादी कूच’ आंदोलन केले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संयोजक जिग्नेश मेवाणी नावाच्या दलित तरूणाने या आंदोलनाचे नेतृत्व केले . गुजरातच्या ६ कोटी ३८ लाख लोकसंख्येत दलितांची संख्या जवळपास ३६ लाखांची आहे. एकुण मतदानाच्या ती ७ टक्के आहे. गुजरातमधे ओबीसी, दलित व आदिवासी एकता मंचाचे संयोजक अल्पेश ठाकुर हे गुजरातचा विकास हा निव्वळ देखावा आहे, लाखो लोकांकडे रोजगार नसल्यामुळे राज्यातल्या तिन्ही वर्गातल्या मागासवर्गियांची अवस्था किती नाजूक आहे, हे विविध कार्यक्रमांव्दार अधोरेखित करीत राज्यभर हिंडत आहेत. गुजरातमधे ओबीसी समाजाचे ४0 टक्के मतदार आहेत. गुजरातमधे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकुर या तिन्ही नेत्यांचा उदय मुख्यत्वे गुजरातच्या अफाट खासगीकरणातून झाला. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली त्यांनी अनेक मोठे उपक्रम राबवले. त्यात गुजरातच्या औद्योगिकरणाचे व्यापक खासगीकरण झाले. या मोहिमेमुळे आपल्या मुलाबाळांना चांगले रोजगार मिळतील या आशेने अनेक पालकांनी महागड्या संस्थांमधे उच्चशिक्षणासाठी मुलांना दाखल केले. फी भरण्यासाठी मोठाली कर्जे काढली. नोकरीच्या बाजारपेठेत हे पदवीधर दाखल झाले तेव्हा गुजरातमधे त्यांना दरमहा ५ ते ६ हजारांच्या नोकºया उपलब्ध होत्या. भाजपच्या घोषणा अन् प्रत्यक्ष स्थिती यात असे अंतर पडत गेल्याने, लाखो निराश तरूणांचे तांडे या ३ नेत्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधींच्या पहिल्याच दौºयाला गुजरातमधे चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा नुकताच संपला तर सोमवारपासून राहुल गांधींचा दुसरा दौरा सुरू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘हॅशटॅग विकास वेडा झालाय’ मोहिमेने अक्षरश: भाजपच्या तोंडचे पाणी पळवले. काँग्रेसने मुस्लिमांचे जाहीर तुष्टीकरण करण्याऐवजी यंदा सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग अनुसरलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या भाजप आणि काँग्रेसची स्थिती अनुक्रमे ६0 व ४0 टक्क्यांवर आहे, मात्र वातावरण झपाट्याने बदलते आहे. विरोधाची लाट खरोखर जोरात उसळली तर स्थिती पूर्णत: बदलेल. कोणालाही त्याचे आश्चर्य वाटायला नको.
(राजकीय संपादक, लोकमत)

Web Title: BJP is not easy for BJP this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.