सोशल मीडियावरून आता विवाहाचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:10 AM2019-02-14T00:10:31+5:302019-02-14T00:11:09+5:30

तरुणाईत क्रेझ : ‘फेसबुक’चा मोठ्या प्रमाणावर वापर, व्हाट्सअपद्वारेही पसंती

Wedding invitation from social media now | सोशल मीडियावरून आता विवाहाचे आमंत्रण

dhule

Next

शिरपूर : देशातील वेडिंग मार्केट झपाट्याने विस्तारत असतांना आता त्यात अनेकानेक पैलूंचीही भर पडत आहे. लग्नाच्या आधी महत्त्वाच्या लोकेशन्सवर जोडीसह फोटोसेशन करणे, समारंभासाठी घेतलेले दागिने व कपडे यांचे प्रेझेंटेशन करणे, लग्नपत्रिकांचे आॅनलाईन निमंत्रण देणे या गोष्टींना सोशल मीडियावर चांगलेच महत्त्व आले आहे. अलीकडे सोशल साईटवर डिजिटल लग्नपत्रिका टाकण्याकडेही कल वाढला आहे. आप्तांसह बाहेरील मित्रांनाही आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची माहिती व्हावी आणि त्यावर मिळणाऱ्या कमेंटमधून उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी ‘फेसबुक’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
विधीही सोशल साईटवर
लग्नासाठी प्रत्येक समाजात वेगवेगळ्या विधी असतात, परंतु आता काळानुरूप त्यात मोठे बदल झाले आहेत. विविध दूरचित्रवाहिन्यांवरून दाखविण्यात येणारे विधी करण्याची स्पर्धाच जणू सर्वच लग्न समारंभात दिसून येते. त्यात मेंदीपासून ते लग्नापर्यंत विधी आणि त्यासाठीचा कॉस्च्युम यात आधुनिकता येत आहे. कोण्या एका समाजाची मक्तेदारी असलेला सोहळा आता अभावानेच दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक विधी कसा साजरा झाला हे दाखविण्यासाठीही सोशल साईटवर फोटो टाकले जातात. लग्न ठरल्यापासून जोडीदाराबरोबरचा फोटो टाकण्यापासून ते हनिमूनला कोणत्या ठिकाणी गेलो आहोत त्याचे अपडेटस्ही सोशल मिडियावर बघायला मिळतात.
पत्रिकेसाठी डिझायनर
लग्नाच्या पत्रिकेपासून सोशल साईटचा खरा वापर सुरू होतो. पत्रिकेचा केवळ फोटो टाकण्याऐवजी त्याचे डिजिटल सादरीकरण करण्याकडे युवापिढीचा कल दिसून येत आहे. त्यात पत्रिकेच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत सर्व मजकूर आकर्षकरीत्या दिसण्यासाठी त्याची सजावट आणि प्रोग्रॅमिंग केले जाते. त्यासाठी खास काही डिझायनरही कार्यरत असतात. त्यासाठी शुल्क आकारून त्या पत्रिकेची सजावट केली जाते.
वेगवेगळे विधी ज्याप्रमाणे सोशल साईटवर शेअर केले जातात, तसाच एखाद्या बालकाचा जन्मही सोशल साईटवर शेअर केला जातो. व्हॉट्स अँप त्यासाठी प्रभावी माध्यम ठरते. नवजात अभर्कांचा फोटो अवघ्या काही मिनिटांत शेअर करून त्याचे स्वागतही मिडियाद्वारेच केले जाते. आजच्या टेक्नो सेव्ही युगात वेडिंग हे स्वतंत्र प्रकरण बनले आहे. काही वर्षापर्यंत लग्नपत्रिका ही सामान्य बाब होती. आता ई-मेल, इन्स्टाग्राम व फेसबुकमुळे प्रत्यक्ष वेडिंग कार्ड पाठविणे ही संकल्पना कमी होत जाण्याचाा अंदाज वर्तविला जात आहे. लग्नकार्य कसे करावे याच्या टिप्सही सोशल साईटवरच मिळू लागल्या आहेत. त्यामुळे जुने आणि नवे यांची सरमिसळ होऊन लग्नकार्यातही ‘फ्युजन’ दिसू लागले आहेत.
फोटो अल्बम होतोय कालबाह्य
आजकाल लग्नात काढल्या जाणाºया फोटोंचा वापर घरी आलेल्या पाहुण्यांना दाखविण्यासाठी कमीच केला जातो. त्याऐवजी स्मार्ट फोनमधून सर्वच फोटो त्यांना दाखविले जातात. मध्यमवर्गीयांच्या घरी किमान एक स्मार्ट फोन आल्याने आता फोटो थेट प्रत्येकाला पाठविले जातात. लग्नाचे फोटोही डिजिटल कॅमेºयामधून कॉपी करून थेट सोशल साईटवर टाकले जातात. त्यामुळे किमान पन्नास टक्के लोकांना आता अल्बम दाखविण्याची गरज पडत नाही. भविष्यात हे प्रमाण आणखी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, यात दुमत नाही.

Web Title: Wedding invitation from social media now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे