आम्ही सर्व आमदार अनिल गोटेंसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:53 PM2018-11-15T13:53:05+5:302018-11-15T13:59:47+5:30

अद्वय हिरे : धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका 

We are all with MLA Anil Goten | आम्ही सर्व आमदार अनिल गोटेंसोबत

आम्ही सर्व आमदार अनिल गोटेंसोबत

Next
ठळक मुद्देस्थानिक नेतृत्वास डावलण्याची पक्षाची भूमिका चुकीची डॉ.सुभाष भामरे गट-तट निर्माण करत पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपलोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

लोकमत आॅनलाईन
धुळे  : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षश्रेष्ठींबाबत जी भूमिका घेतली आहे, ती वर्षभरापूर्वी मी स्वत: अनुभवली. पक्षाचे हे धोरण चुकीचे असून अशा परिस्थितीत आम्ही सर्व आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षनेते व नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे यांनी येथे गुरूवारी पत्रकार परिषदेत मांडली. 
यावेळी त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यावरही टीका केली. ते सरळ पक्षाचे तिकीट घेऊन आले त्यांचा अद्याप पक्ष प्रवेशच झालेला नाही, असे सांगून त्यांना मतदारसंघात त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते हवे असून ते पक्षाच्या त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अडचणीत आणून स्वत:चा गट निर्माण करत असल्याचा  आरोपही त्यांनी केला. 
मोदी लाटेमुळे ते निवडून आल्याचे सांगतात. परंतु स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही त्यांच्या विजयात मोठा वाटा आहे, हे त्यांनी विसरू नये. आता तर ते पराभूत होतील, असा पक्षाचाच सर्व्हे आहे. त्यामुळे आता डॉ.भामरे यांनी आत्मचिंंतन करावे. अन्यथा त्यांना येत्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागू शकते, असे भाकितही त्यांनी वर्तवले.  
धुळे मनपा निवडणूक प्रक्रियेतून  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भामरे यांना बाहेर काढावे, असे आमची मागणी नाही. पण पक्ष उमेदवारांना तिकीट वाटप आमदार अनिल गोटे यांना विश्वासात घेतल्याशिवाय होऊ नये. कारण स्थानिक लोकप्रतिनिधीच्या ताकदीमुळेच त्या-त्या मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकतो आहे, हे पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. धुळ्यात पक्षाच्या झेंड्याचा दांडा आमदार गोटे यांच्या हातात आहे. तोच काढण्याचा प्रयत्न झाला तर पक्षाचा झेंडा कुठे राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला. 
यावेळी अद्वय हिरे यांच्यासोबत नाशिक कृउबाचे माजी सभापती काशिनाथ पवार, माजी जि.प. सदस्य दशरथ निकम, मालेगाव तालुका संघाचे माजी अध्यक्ष शांताराम लाठर व व्यंकटेश बॅँकेचे सभापती अशोक बच्छाव उपस्थित होते.  

 

Web Title: We are all with MLA Anil Goten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.