वाळूची चोरटी वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने महिलेस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:51 AM2019-06-12T11:51:01+5:302019-06-12T11:53:16+5:30

शिरपूर तालुका : जातोडा येथील घटना, संंतप्त जमावाने ट्रॅक्टरसह वाहने जाळली; अन्य वाहनांची नासधुस

Trafficking in women with sand transmitted crushers | वाळूची चोरटी वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने महिलेस चिरडले

संतप्त जमावाकडून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जाळण्यात आले.

Next

शिरपूर : तालुक्यातील जातोडे गावात भल्या पहाटेच्या सुमारास घरातील केरकचरा बाहेर टाकण्यासाठी पडलेल्या महिलेला वाळूची चोरटी वाहतूक करणाºया एका अज्ञात ट्रॅक्टरने चिरडल्याची  घटना मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर संतप्त जमावाने  वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर व दुचाकी गाडी जाळून टाकली तर अन्य ३ ट्रॅक्टरांची नासधूस केली आहे़ तब्बल ६ तासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला, तोपर्यंत तो मृतदेह घटनास्थळीच पडून होता़
मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जातोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी राहणारी महिला कलाबाई सुदामसिंग राजपूत (४९) या घरातील केरकचरा काढून बाहेर टाकण्यासाठी जात असतांना वाळूची चोरटी वाहतूक करणाºया एका अज्ञात ट्रॅक्टरने त्यांना अक्षरश: चिरडले.  अपघातात त्या महिलेच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्यांचा जागीच मृत्यु झाला. 
घटना घडताच अंधाराचा फायदा घेत ते ट्रॅक्टर पसार झाले़ सदर ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता तो ट्रॅक्टर घेवून पसार होण्यात यशस्वी झाले़ घटनेचे वृत्त पहाटेच्या सुमारास ये-जा करणाºया ग्रामस्थांना कळताच अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी गोळा केली़ त्याचवेळी याच रस्त्याने अनेक ट्रॅक्टर वाळू वाहतुक करण्यासाठी ये-जा करीत असल्याकारणाने ग्रामस्थांनी त्या ट्रॅक्टर चालकांना थांबवून  त्यांच्यात शाब्दीक वाद झाला़ ही बाब शहरातील मुजोर वाळू माफियांना कळताच त्यांनी प्रशासनाचे अधिकारी येण्यापूर्वीच वाद मिटविण्याचा प्रयत्न केला़ मात्र वाद मिटत नसल्यामुळे मुजोर वाळू माफियांनीच ग्रामस्थांशी वाद घालीत दादागिरी केली़ तसेच इतर वाळू ट्रॅक्टर चालकांना ग्रामस्थांच्या तावडीतून सोडून नेले़ वाद न मिटल्यामुळे अखेर संतप्त जमावाने माफियांच्या ताब्यातील दुचाकी गाडी व एक ट्रॅक्टर जाळून टाकले तर ३ वाहनांची नासधूस केली़ याप्रसंगी शिरपूर येथून आलेल्या वाळू माफियांच्या इंडिका गाडीमध्ये असलेले ४-५ जणांकडे लाठ्या-काठ्या, तलवारी असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे़  
या घटनेचे वृत्त प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल, डीवायएसपी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मंडळ अधिकारी संजय जगताप यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यांच्या समोर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आक्रोश केला़ 
जोपर्यंत घटनास्थळी जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणार नाही अशी भूमिका घेतली़  तसेच महसूल विभागातील काही अधिकारी-कर्मचारी चोरटी वाळू वाहतुकीस प्रोत्साहन देत असल्यामुळे  रात्रभर ही चोरटी वाहतुक सुरू असते़ अधिकारी व कर्मचाºयांना अर्थकारण मिळत असल्यामुळे त्याकडे कानाडोळा देखील केला जात आहे़ या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महसूल विभागाचे अधिकारी का म्हणून याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केला़ त्यामुळे काही वेळ घटनास्थळी तणावाचे वातावरण झाले़ 
प्रांताधिकारी डॉ़बांदल यांनी मयत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयिताविरोधात कठोर कारवाई करू असे आश्वासन  दिले. मात्र ग्रामस्थांनी लेखी आश्वासनाशिवाय प्रेत नेणार नसल्यामुळे काही वेळानंतर ते परतले़ तोपर्यंत ग्रामस्थांनी घटनेचा पंचनामा सुध्दा करून दिला नाही, घटनास्थळीच प्रेत पडून होते़ अखेर दुपारी १ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनीच शवविच्छेदनासाठी सदर मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला़ सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
मयताच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे़
याबाबत मृत महिलेचा मुलगा भोजुसिंग सुदामसिंग राजपूत (२७) याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़


वाळूचे ठिय्या बंद असतांना बिनधास्त तस्करी

४शहरातील निमझरी नाक्याजवळ परवा रात्री एका दुचाकी मागवून वेगाने येणाºया वाळू वाहतुक करणाºया ट्रॅक्टर चालकाला हटकले असता त्याने वाद घालून अन्य वाळू माफियांनी बोलावून त्या दुचाकीस्वारास धमकाविण्याचा प्रकार घडला होता़ त्यावेळी १५०-२०० युवकांनी गर्दी करून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला होता़ त्याचवेळी अन्य वाळू माफियांनी त्या शिक्षकास महसूल विभागाला पैसे देतो त्यामुळे ते काहीच करू शकत नाही असे सांगितल्यामुळे या घटनेवर पडदा पडला़ वाळू माफिया बिनधास्तपणे महसूल विभागाच्या अधिकाºयांना पैसे देत असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नसल्याची चर्चा आता शहरात चौका-चौकात रंगू लागली आहे़ 
*गेल्या पंधरवाड्यात खुद्द तहसिलदारांनी ट्रॅक्टर पकडून एका खुल्या जागेवर असलेल्या सुमारे २०० ब्रॉस वाळूचा पंचनामा झाला़ त्यानंतर काय कारवाई झाली हे मात्र गुलदास्त राहीली़
*अवैध मार्गाने शहरात बिनधास्तपणे वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतुक सुरू आहे़ अनेकदा महसूल विभागाने पकडलेले ट्रॅक्टर तहसिल व प्रांत कार्यालयाच्या बाहेर उभे केले जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते़ मात्र लगेच ते ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रकार वारंवार घडत आहे़
*२२ रोजी दुपारी १२़१५ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेले ट्रक्टर पकडून प्रांत कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले़ मात्र त्याच दिवशी रात्री ८़२२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने वाळूने भरलेला ट्रॅक्टर चोरून नेला़ आहे़
 

Web Title: Trafficking in women with sand transmitted crushers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे