ज्ञानदानातून आपल्यातील राष्टभिमान जागृत करणारा गुरू असतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:54 AM2019-07-16T11:54:50+5:302019-07-16T11:58:38+5:30

हर्षल विभांडीक : गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूंविषयी भावना केल्या व्यक्त; जीवनातील अनेक मूल्यांची शिकवण; प्रसंगी शिक्षाही करतात

From Gyan, the nation of ours is a teacher who is aware of the pride of the nation | ज्ञानदानातून आपल्यातील राष्टभिमान जागृत करणारा गुरू असतो 

आपले गुरू प्रकाश पाठक यांच्यासमवेत हर्षल विभांडीक.

Next

सुरेश विसपुते । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आपणास इतिहासाची माहिती, घटनाक्रम, ऐतिहासिक व्यक्ती इत्यादींची माहिती मिळते. परंतु त्या ज्ञानातून आपल्यातील राष्टभिमान जागृत करणारा गुरू असतो. आपण स्वत:साठी  जगायचे नसते तर राष्टÑासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार गुरू आपल्याला देतात, अशा शब्दांत डिजिटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी गुरूंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. 
शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवितात. आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो. काही विद्यार्थी शिक्षकांची चेष्टा करतात, हे अयोग्य आहे. आपण गुरूपौर्णिमेच्या दिवशी त्यांची क्षमा मागून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असेही त्यांनी प्रांजळपणे नमूद केले.  
ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न असते. अशी ही शक्ती तत्काळ एकाच वेळी शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशावेळी गुरूंच्या शक्तीची आवश्यकता भासते. मला नेहमीच विचारले जाते की, शाळेत डिजिटल वर्ग झाला म्हणजे विद्यार्थी आपले शिक्षण स्वत:च का नाही करू शकत? डिजिटल वर्गात शिक्षण घेण्यासाठी शिक्षकाची काय आवश्यकता? अशा या प्रश्नांनी व विचारांनी मला शिक्षक म्हणजेच गुरूंबाबत लिहावयास प्रेरीत केले. 
गुरू म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की, विद्यार्थी एक थंडगार दगडासारखा आणि ज्ञान उकळत्या पाण्यासारखे आहे. हे असे उकळणारे पाणी आपण थेट एखाद्या थंडगार दगडावर ओतले तर ज्ञानाच्या शक्तीने आणि तापमानाच्या परिवर्तनाने त्यास तडा जाऊन तो खंडीत होऊ शकतो. 
गुरू ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या या ज्ञानाच्या तापाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते. अर्थात थंडगार दगडावर उकळते पाणी ओतण्यापेक्षा, त्या पाण्याचे तापमान सर्वप्रथम कमी करून मग थेंब थेंब करून हे पाणी त्या दगडावर सोडते. म्हणजे त्या दगडाला तडा न जाता त्या दगडाचे तापमान वाढू लागते. आणि विद्यार्थी त्या गरम पाण्याप्रमाणे तापू लागतो आणि स्वत: गुरूपदाला जाऊन पोहचतो, असेही ते म्हणाले. 
वर्तमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तके, संगणक, शिकवण्या अशा विविध माध्यमांद्वारे कोणत्याही विषयाची माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गुगल आणि विकीपिडीया हे आपल्याला एका ‘क्लिक’नेच एखाद्या विषयाची सखोल माहिती उपलब्ध करून देतात. परंतु विद्यार्थ्याचे अज्ञान घालवून, त्याची शैक्षणिक, अध्यात्मिक आणि शारीरिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरू असे म्हणतात, असे स्पष्ट करून विभांडीक यांनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

गुरूंमुळेच सामाजिक प्रकल्प राबवू शकलो

माझ्या आयुष्यात शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक जीवनात अहमदाबाद व अमेरिकेतील न्यू यॉर्क या शहरांमध्ये नोकरी करताना मला विविध शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ज्यातून माझ्या जीवनाला दिशा मिळण्यास मदत झाली. आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही माझ्या जीवनशैलीत दिसून येईल. गेल्या चार वर्षांत मला डिजिटल शाळा उपक्रम आणि स्टार्ट अप धुळे उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. ते सर्व यशस्वीपणे राबविताना माझे गुरू प्रकाश पाठक यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, कोणताही निर्णय घेण्याआधी लागणारी पूर्वतयारी, माझी वैचारिक आणि अध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांनी माझ्याकडून करवून घेतलेल्या गोष्टी आणि माझ्या धाडसी निर्णयांमध्ये वेळोवेळी माझ्या परिवाराची घातलेली समजूत यामुळेच विविध सामाजिक उपक्रम मी यशस्वीरीत्या राबवू शकलो, असेही हर्षल विभांडीक यांनी आवर्जून नमूद केले. 

Web Title: From Gyan, the nation of ours is a teacher who is aware of the pride of the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे