खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 09:23 AM2018-04-18T09:23:47+5:302018-04-18T09:23:47+5:30

लाडक्या लेकींना माहेरी आनंदाच्या चार क्षणांसाठी या सणाला महत्त्व 

Aakhaji-Sasuravashin festival in Khandesh! | खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

googlenewsNext
ठळक मुद्देखान्देशात आखाजी सासुरवाशिणींचा सण घागर पुजून केले जाते पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी त्यासाठी आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत

 

प्रदीप पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : खान्देशात आखाजी अर्थात अक्षय तृतीया हा सासुरवाशीणींचा सण समजला जातो. सासरी गेलेल्या लेकी सणासाठी माहेरी परतात. यामुळे परिवारात आनंदी वातावरण असते. लाडक्या लेकींना माहेरी आनंदाचे चार क्षण मिळावे यासाठी आखाजी सणाला विशेष महत्व आहे.
अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेऊन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोºया, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासून आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरील पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.
खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रेट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!
माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत, कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेऊन, विसावा घेऊन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.
चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड
माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाºया टाकल्या जातात.. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वं
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धु हातमा दी ठेवजो ली ठेवजो
बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वं
झोके घेत मुली गाण्यातून आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.
वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय

 

Web Title: Aakhaji-Sasuravashin festival in Khandesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.