धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी आठच प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:42 AM2018-09-01T11:42:52+5:302018-09-01T11:44:40+5:30

 जि.प.चे साडेतीन हजार शिक्षक कार्यरत, वेतनवाढ बंदमुळे अनेकांनी फिरवली पाठ

8 proposals for teacher award from Dhule district | धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी आठच प्रस्ताव

धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी आठच प्रस्ताव

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात जि.प.चे साडेतीन हजार शिक्षक कार्यरतवेतनवाढ मिळत नसल्याने अनेकांनी प्रस्ताव पाठविण्याकडे फिरवली पाठसर्वाधिक प्रस्ताव धुळे तालुक्यातून

आॅनलाइन लोकमत
धुळे : शिक्षकीपेशाशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया शिक्षकास शिक्षकदिनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत असते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून वेतनवाढ मिळत नसल्याने, या पुरस्काराकडे अनेक शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यातील चारही तालुक्यातून केवळ आठ शिक्षकांचेच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया शिक्षकांना  जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत असते. पुरस्कारासाठी शिक्षण विभागातर्फे जुलै महिन्यापासूनच इच्छूक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यास सुरवात केली होती. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत १८ आॅगस्ट होती.
जिल्ह्यातील ११०३ जिल्हा परिषद शाळांमध्ये थोडथोडके नव्हे तर ३ हजार ५८६ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र साडेतीन हजार शिक्षकांमधून केवळ आठ शिक्षकांनीच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यातही सर्वाधिक म्हणजे तीन प्रस्ताव हे धुळे तालुक्यातून दाखल झालेले आहे. तर साक्री, शिरपूर तालुक्यातून प्रत्येकी दोन व शिंदखेडा तालुक्यातून केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. 
पूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांमध्येच प्रचंड स्पर्धा होती. एका तालुक्यातून अनेक प्रस्ताव दाखल होत होते. यातून आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करतांना समितीचीही कसोटी लागत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुरस्काराबाबत उदासिनताच दिसून येत आहे.
वेतनवाढ बंद केल्याचा परिणाम
पूर्वी आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे तो मोठा आधार होता. मात्र २००८ पासून शासनाने आदर्श शिक्षकांना वेतनवाढ देणेच बंद केले, त्यामुळे अनेकांनी प्रस्ताव सादर करण्याकडेच पाठ फिरविली असल्याची चर्चा आहे. 
त्रयस्थांमार्फत मुल्यांकन व्हावे
दरम्यान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाला स्वत:चा प्रस्ताव स्वत:च तयार करावा लागतो. हे काहींना पसंत पडत नाही. जिल्हा परिषदेला आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचा आहे, तर मग त्यांनीच त्रयस्थांमार्फत मुल्यांकन, पहाणी करून,  आदर्श शिक्षकाची निवड केली पाहिजे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. तसे होत नसल्यानेही काही शिक्षकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. 



 

Web Title: 8 proposals for teacher award from Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.