पाण्यासाठी महिलांची ४ कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:48 PM2019-05-15T22:48:03+5:302019-05-15T22:49:08+5:30

शाळेतील चिमुकल्यांनाही पाणी आणल्यावरच खिचडी खायला मिळते़

4 kms of women in water for water | पाण्यासाठी महिलांची ४ कि.मी.ची पायपीट

dhule

Next

सुनील साळुंखे ।
शिरपूर : ‘पाणी हेच जीवन आहे, त्याचा काटकसरीने वापरा करा’ या उक्तीनुसार पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करण्याचा निर्धार शासनस्तरावरून करण्यात आला असला तरी तालुक्यातील आदिवासी भागातील महिलांना आजही पाण्याच्या थेंबाकरीता वणवण भटकावे लागत आहे़ गेल्या ७ वर्षापासून चोंदी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकतात़ पाणी नसल्यामुळे पिके सुध्दा घेता येत नाही़ विशेषत: गावातील हातपंप बंद़, पाण्याची टाकी नाही़, बोअरवेल नाही, विहिरी कोरडी, त्यामुळे गावातील महिलांना किमान ३-४ किमीची भटकंती करून पाणी आणावे लागत आहे़ शाळेतील चिमुकल्यांनाही पाणी आणल्यावरच खिचडी खायला मिळते़
बोराडी-सांगवी रस्त्यावरील बोराडी गावापासून ४ किमी अंतरावर चोंदी गांव आहे़ सदर गांव टेंभेपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येते़ सुमारे १५०० लोकवस्तीचे हे गांव आहे़ गेल्या ६-७ वर्षापासून या गावाला अधिक पाणीटंचाई भासवू लागली आहे़ विशेषत: उन्हाळ्यात ग्रामस्थांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने राहीलेला उन्हाळा कसा काढणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडू लागला आहे़ पाणीटंचाई इतकी तीव्र आहे की, गावातील अबालवृद्धांचा संपूर्ण दिवस एक हंडा पाणी आणण्यासाठी जातो.
गेल्या वर्षी गावातील खुलदार बासरा पावरा यांचे गावापासून ३ किमी अंतरावर शेत असून त्यांनी घर बांधकामासाठी पाईप लाईन टाकून घरापर्यंत पाणी आणले होते़ घर बांधकाम होईपर्यंत ग्रामस्थांना दर १५ दिवसातून एकदा तेथून पाण्यासाठी झुंबड उडत होती़ त्यांच्याकडे पाणी आले तर महिला अक्षरक्षा तासोन् तास तेथे उन्हयात थांबवून हंडाभर पाणी घेत होते़ विशेषत: या पाण्यासाठी चिमुकल्यांसह वृध्दापर्यंत सारे जण तेथे गर्दी करीत होते़ मात्र यंदा पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे़ गावात लाईट असून देखील केवळ पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे परिसरात पाणी लागत नाही़ एकच हातपंप होता तो देखील अडीच महिन्यापासून कोरडा पडला आहे़
गावाजवळील अर्धा किमी अंतरावरील नाला देखील कोरडा पडला आहे़ त्यातील डबक्यांमधील पाण्यात महिला कपडे, आंघोळ करीत असल्याचे सांगण्यात आले़ गावात जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून मुलांना पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी विद्यार्थ्यांनाच पाणी आणावे लागते़ त्यानंतरच मुलांना खिचडी खायला मिळते़ गावातील जनावरांना सुध्दा पाणीकरीता भटकंती करावी लागते़ जेथून महिला पाणी आणतात त्याच डबक्यातून जनावरे पाणी पितात़ त्यामुळे रोगराई पसरण्याची सुध्दा भिती वाटते़
गावातील परिसरातील जवळपास असलेले पाण्याचे स्रोत पूर्णपणे कोरडे टाक पडले आहे. ग्रामपंचायतची विहीर देखील डिसेंबर-जानेवारीमध्येच कोरडी पडली़ त्यामुळे जवळपास पाण्यासाठी गावकरी परिसरातील २-३ किलोमीटर वरुन पाणी आणावे लागत आहे़ मागील पाच वर्षापासून चोंदी गावातील ग्रामस्थांना डिसेंबर- जानेवारीपासूनच सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ग्रामपंचायतने खारीखांड येथील दौलत पावरा यांची विहीर अधिग्रहण केली आहे़ या विहीरीला ही पाणी कमी असल्यामुळे तब्बल ८-१० दिवसांनी पाणी मिळत आहे, तेही गावात दहा ते पंधरा मिनिटे चालते़ गावातील उर्वरित भागात पाणी पोहचत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गावातील जनावरांना चारा व पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत आहे़ जनावरांना पाण्यासाठी बोराडी येथील काळेपाणी धरणावर ३-४ किमीवर न्यावे लागत असल्यामूळे या दुष्काळात मुलांसारखे वागवलेल्या जनावरचे चाराटंचाई व पाणीटंचाईमुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे़
पाण्यासारख्या मुलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री पेयजल सारख्या इतर योजनाही कार्यान्वीत असून देखील गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी पाणीपट्टी नियमित भरून देखील पाण्याची सोय होत नसल्याने पाण्याअभावी गावकऱ्यांबरोबरच मुक्या प्राण्यांचेही प्रचंड हाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ मिळेल तेथून पाणी आणतांनाही नागरिकांमध्ये पाण्यांवरून संघर्ष होत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असुन, यापुढे ते आणखीनच वाढणार असल्याने पाण्याची व्यवस्था त्वरीत प्रशासनाने करावी अन्यथा तहसिल कार्यालयावर ‘पाणी भिक मांग’ आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: 4 kms of women in water for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे