‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 19, 2024 01:03 PM2024-01-19T13:03:08+5:302024-01-19T13:03:32+5:30

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

'Missing' girl's 'missing' ignored by police?, murder in love, suicide case | ‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

‘त्या’ तरुणीचे ‘मिसिंग’ पोलिसांकडून दुर्लक्षित?, प्रेमात हत्या, आत्महत्या प्रकरण 

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तपासात स्थानिक पोलिसांवर अपयशाचा ठपका बसला आहे. तरुणीची मिसिंग दाखल झाल्यानंतर जर कळंबोली पोलिसांकडून गांभीर्याने तपास झाला असता, तर वेळीच गुन्हा उघडकीस आला असता. परंतु २० दिवसांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर केवळ सीसीटीव्हीच्या आधारे हाती लागलेल्या माहितीवरून त्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

बेपत्ता तरुण, तरुणींच्या तपासात स्थानिक पोलिस चालढकल करत असल्याचे किंवा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तरुण, तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर अनेकदा प्रकरण हलक्यात घेतले जाते. ते इच्छेने कुठेतरी पळून गेले असावेत, असा अंदाज लावत केवळ मोबाइलद्वारे तपासावर भर दिला जातो. त्यानंतर काही दिवसांनी पुढील तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवला जातो.

कळंबोली येथून बेपत्ता असलेल्या वैष्णवी बाबर (१९) हिच्या तपासाबाबत देखील स्थानिक पोलिसांकडून काहीसे असेच झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. १२ डिसेंबरपासून ते ६ जानेवारीपर्यंत कळंबोली पोलिसांना तिच्या तपासात काहीच धागेदोरे हाती न लागल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होताच सहायक निरीक्षक नीलम पवार यांनी थेट वैष्णवी शिकत असलेले सायन येथील कॉलेज गाठले. 

...तर सहज उलगडा झाला असता
    त्यांच्या पथकाने १२ डिसेंबरचे सीसीटीव्ही तपासले असता ती तरुणासोबत जाताना दिसून आली. 
    यामुळे दोघेही गेलेल्या मार्गाचा आढावा घेतला असता, खारघर स्थानकात व पुढे टेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघे सीसीटीव्हीत दिसून आले. 
    जर कळंबोली पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले असते तर इथपर्यंतचा उलगडा सहज झाला असता. 
    प्रत्यक्षात मात्र त्यांचे हात तपासात तोकडे पडल्याने गुन्हा उघड होण्यास महिन्याचा कालावधी लागला. 
    वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने कुटुंबीयांना अंतिम मुखदर्शन घेता आले नाही. 

मोबाइलचे गूढ कायम
गुन्हे शाखा पोलिस सीसीटीव्हीद्वारे टेकडीपर्यंत पोहचले असता, पुढील तपासासाठीदेखील सहायक निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने कसोटीचे प्रयत्न केले. त्यामध्ये सांकेतिक अंकाचा उलगडा करून अखेर पाचव्या दिवशी मृतदेह शोधून काढला. दरम्यान, वैभव बुरुंगले (२४) याने जुईनगर रेल्वेस्थानकालगत आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी मोबाइल आढळून आल्याचे वाशी रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मोबाइल मिळाल्यानंतर तो न तपासता जप्तीत ठेवला होता. तर वैष्णवीचा मोबाइल अद्याप मिळाला नसल्याने त्याबाबतचे गूढ कायम आहे.

Web Title: 'Missing' girl's 'missing' ignored by police?, murder in love, suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.