Action at Kalyan station: 11 people arrested: 5 men and 6 women were involved | कल्याण स्थानकात हाणामारी : ११ जणांना अटक :५ किन्नर आणि ६ महिलांचा समावेश

ठळक मुद्दे दंगल माजवण्याचा गुन्ह्याखाली ११ जणांना अटक पोलिस निरिक्षक माणिक साठे यांची माहिती

डोंबिवली: किन्नर आणि लोकल गाड्यांमध्ये गाणी म्हणुन पैसे मिळवणा-या दोन गटात शुल्लक कारणांवरुन हाणामारी झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी घडली. त्या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गंभीर नोंद घेत दंगल माजवण्याचा गुन्ह्याखाली ११ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ५ किन्नर आणि ६ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
स्थानकात फलाट क्रमांक ४ वर दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास दोन गटात वादावादी झाली, त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले, त्यानूसार ११ जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी करुन वाद घालण्याचे कारण, हाणामारी यामुळे सार्वजनिक ठिकाणी दंगल माजवणे, मारामारी, गर्दी जमवणे, रक्त येईस्तोवर मारणे आदींसह अन्य गुन्ह्यांखाली बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक माणिक साठे यांनी ‘लोकमत’ला दिली. अटक केलेले ५ किन्नर पत्रीपूल कल्याण परिसरातील रहिवासी असून अन्य ६ महिला ठाकुर्ली परिसरातील राहणा-या असल्याचे सांगण्यात आले.