तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

By विजय सरवदे | Published: January 3, 2024 08:16 PM2024-01-03T20:16:50+5:302024-01-03T20:17:18+5:30

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला

Thirsty BAMU university will get relief from dams; Funds received for three Kolhapuri dams | तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर डोंगराने वेढलेला आहे. डोंगरावर कोसळणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ते अडवून जिरविण्यासाठी नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला आहे. यामुळे परिसरातील वनराईबरोबरच विहिरींनाही आता बऱ्यापैकी जीवदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखेच राहिले, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या.

७२४ एकरमध्ये पसरलेल्या विद्यापीठ परिसरात अनेक नाले आहेत. परिसरात अनेक विभाग, प्रशासकीय कार्यालये, विविध लॅब, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापक- कर्मचारी निवासस्थाने आहेत. जवळपास १२५ एकर परिसरात आंबा, चिंच, आवळा, चिकू आदींच्या फळबागा विस्तारलेल्या आहेत. वनस्पतिशास्त्र अभ्यासक्रमांशी संबंधित विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींनी नटलेली उद्याने आहेत. यासाठी मात्र, दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेले उपलब्ध १७ बंधारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे नवीन बंधारे उभारणे, तसेच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. आ. जैस्वाल यांनी यासाठी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत ५० लाखांचा निधी नुकताच विद्यापीठासाठी मंजूर केला आहे.

सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विद्यापीठातील सिंचनासाठी २५ लाखांचा निधी दिला होता. त्यातून विद्यापीठ परिसरातील जुन्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी चर खोदून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यात आले.

१५ कोटी लिटरपर्यंत साठवण क्षमता वाढणार
विद्यापीठ परिसरात सध्या सहा मोठे सिमेंट बंधारे आणि ११ नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता १०.५० कोटी लिटर एवढी आहे. आता प्राप्त झालेल्या ५० कोटी रुपयांतून प्रत्येकी दीड कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे तीन कोल्हापुरी बंधारे उभारले जाणार आहेत. यामुळे विद्यापीठ परिसरात १५ कोटी लिटर एवढी साठवण क्षमता वाढेल, यास विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: Thirsty BAMU university will get relief from dams; Funds received for three Kolhapuri dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.