शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

By Admin | Published: June 8, 2014 01:13 AM2014-06-08T01:13:27+5:302014-06-08T01:15:38+5:30

सुनील कच्छवे , औरंगाबाद शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे.

Taha in the city, wash the road | शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

googlenewsNext

सुनील कच्छवे , औरंगाबाद
शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे. पैठणपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यातून हे पाणी अहोरात्र बाहेर पडत आहे. जायकवाडी धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी दररोज तब्बल ४० दशलक्ष लिटर म्हणजे एक चतुर्थांश पाणी गळतीमुळे रस्त्यातच वाया जात आहे.
औरंगाबाद शहरात महिनाभरापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक भागांत चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.
त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मनपाच्या ७०० मि. मी. आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्यांना ३० पेक्षा जास्त ठिकाणी गळती लागली आहे.
भर उन्हात रस्त्याशेजारी डोह
मनपाच्या दोन्ही जलवाहिन्या पैठण रोडच्या बाजूने गेलेल्या आहेत. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे या रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोठमोठे डोह साचले आहेत. काही ठिकाणी हे पाणी रस्त्याच्या बाजूने वाहताना दिसत आहे.
जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधूनही पाण्याचे मोठमोठे फवारे बाहेर पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून ही गळती सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, मनपा प्रशासनाने तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही या गळत्या थांबविलेल्या नाहीत. शहराजवळील महानुभाव आश्रमापासून ते पैठण शहरापर्यंत रस्त्यालगत ठिकठिकाणी जलवाहिनीतून पाणी गळती लागली आहे. कांचनवाडी, वाल्मी, गेवराई तांडा, अलाना कंपनी, चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीन आदी ठिकाणी ही गळती सुरू आहे.
मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून सध्या दररोज १५० ते १५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. मात्र यापैकी १२५ दशलक्ष लिटर पाणीच शहरापर्यंत पोहोचते. उर्वरित ३० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे वाटेतच वाया जाते. ही गळती इथेच थांबत नाही तर शहरातही अंतर्गत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे आणखी १० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दररोज केवळ ११५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते.

Web Title: Taha in the city, wash the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.