...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:55 PM2022-10-05T17:55:38+5:302022-10-05T17:55:38+5:30

चार्जिंग स्टेशन स्मार्ट सिटी कार्यालयापर्यंतच मर्यादित

...say 200 charging stations in Aurangabad; But on paper! | ...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

...म्हणे औरंगाबादेत २०० चार्जिंग स्टेशन; पण कागदावरच !

googlenewsNext

औरंगाबाद : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडीसुद्धा दिली जात आहे. औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. स्मार्ट सिटीचे कार्यालय वगळता उर्वरित स्टेशन कागदावरच आहेत.

वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून ८५ टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातून ई-वाहने खरेदी केली जातील. त्यासोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात २०० ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल. सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून पेट्रोल पंप, मॉल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

स्मार्ट सिटीत ३ स्टेशन
सध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात तीन चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंगची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील, हे नंतर ठरणार आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रियाही मनपाने सुरू केली नाही.

वाहन संख्या वाढू लागली
पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक ई-दुचाकीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांची संख्याही शहरात बऱ्यापैकी वाढली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे.

Web Title: ...say 200 charging stations in Aurangabad; But on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.