औरंगाबादचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक इज्तेमासाठी आलेल्या साथींच्या अलोट गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:44 PM2018-02-26T15:44:23+5:302018-02-26T15:46:37+5:30

राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले.

Railway station of Aurangabad, bus station rises in the crowd for Ijtema | औरंगाबादचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक इज्तेमासाठी आलेल्या साथींच्या अलोट गर्दीने फुलले

औरंगाबादचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक इज्तेमासाठी आलेल्या साथींच्या अलोट गर्दीने फुलले

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले. त्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि एसटी महामंडळाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. 

रेल्वेस्टेशनवर गेल्या दोन दिवसांत पाच विशेष रेल्वेंसह नियमित रेल्वेतून दीड लाखांवर ‘साथी’ बांधव दाखल झाल्याचा अंदाज रेल्वे सुरक्षा बलाकडून वर्तविण्यात आला आहे. रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि मालधक्का परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ५ तिकीट कक्ष, एक चौकशी कक्ष, आरपीएफ बुथ, जीआरपी बुथ स्थापन करण्यात आले आहे. रेल्वेने येणारे साथी मालधक्का परिसरातून इज्तेमा परिसराकडे रवाना होतात. शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळते.

एसटी महामंडळातर्फे जिल्हाभरात ठिकठिकाणाहून जादा बस सोडण्यात येत आहेत. याबरोबर पुणे मार्गावरील बसेसमधून वाहतूक करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, कर्णपुरा मैदान या ठिकाणी रविवारी साथींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दीनुसार बसेस सोडण्यावर भर देण्यात आला. साथींसाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानकात पाणीवाटप करण्यासह आवश्यक मदतीसाठी खिदमतगार कार्यरत आहेत.

प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

रेल्वे प्रशासनाने २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर १० रुपयाने वाढवून २० रुपये केले आहे. रेल्वेस्टेशनवर गर्दी वाढत आहे. प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे सोयीचे राहावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ही वाढ केल्याचे ‘दमरे’ने कळविले.

विमानसेवा फूल
दिल्ली, मुंबईहून येणारे विमान काही दिवसांपासून ९० टक्क्यांवर भरून येत आहे. परदेशातून मुंबई, दिल्लीत दाखल झाल्यानंतर  तेथून औरंगाबादपर्यंतचा प्रवास विमानाने करण्यास प्राधान्य देण्यात आला. यामध्ये देश-विदेशातून अनेक जण खास इज्तेमासाठी शहरात दाखल झाले. आगामी दोन दिवसांतील विमानांचे बुकिंगही जवळपास फूल आहे. एअर  इंडियाच्या अधिकार्‍यांनी यास दुजोरा दिला.

आज धावणार्‍या विशेष रेल्वे

२६ फेब्रुवारीला औरंगाबाद-आदिलाबाद ही विशेष रेल्वे औरंगाबादहून दुपारी १.५५ वाजता सुटेल. औरंगाबाद-गुलबर्गा रेल्वे  सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-परळी रेल्वे सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-मनमाड रेल्वे सायंकाळी ६.५० वाजता सुटेल, तसेच औरंगाबाद-सीएसटी मुंबई विशेष रेल्वे सायंकाळी ७.५० वाजता सुटेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.

आरोग्य यंत्रणा दक्ष; प्रथमोपचार केंद्र, अतिदक्षता विभागाद्वारे रुग्णसेवा
राज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून आलेल्या ‘साथी’ बांधवांसाठी आरोग्य यंत्रणा २४ तास दक्ष आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्स रुग्णसेवा देत आहेत. जिल्हा परिषदेचे ३८ डॉक्टर, १२ औषध निर्माण अधिकारी, १० आरोग्य सहायक, ३० आरोग्य सेवक देण्यात आलेले आहेत. इज्तेमा परिसरात जवळपास २२ प्रथमोपचार केंद्रे, ६ अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आले आहेत. याबरोबरच घाटी रुग्णालयातर्फे ५ फिजिशियन, ३ सर्जन, २ आॅर्थोपेडिक सर्जन रुग्णसेवा देत आहेत. समन्वयक म्हणून डॉ. सय्यद अश्फाक काम पाहत आहेत. या ठिकाणी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला. इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयातही ४० खाटांचा विशेष वॉर्ड दक्ष ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत इज्तेमासाठी आलेल्या २७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.

रुग्णवाहिकांचा मोठा ताफा 
इज्तेमा परिसरात रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका आहेत, तसेच २५ डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचे पथक कर्तव्य पार पाडत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली. 

Web Title: Railway station of Aurangabad, bus station rises in the crowd for Ijtema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.