मालमत्ता कर, स्वत: करा कॅलक्युलेट; छत्रपती संभाजीनगर मनपाच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध

By मुजीब देवणीकर | Published: February 28, 2024 07:47 PM2024-02-28T19:47:30+5:302024-02-28T19:47:35+5:30

या टॅक्स कॅलक्युलेटवर उपयुक्त चार कॉलमची माहिती भरून दिल्यास कर किती लागेल, हे दिसून येते.

Property Tax, Do-It-Yourself Calculate; Facilities available on Municipal website | मालमत्ता कर, स्वत: करा कॅलक्युलेट; छत्रपती संभाजीनगर मनपाच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध

मालमत्ता कर, स्वत: करा कॅलक्युलेट; छत्रपती संभाजीनगर मनपाच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर कशा पद्धतीने लावण्यात येतो, हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी महापालिकेच्या वेबसाईटवरच टॅक्स कॅलक्युलेटर उपलब्ध करून दिले. या टॅक्स कॅलक्युलेटवर उपयुक्त चार कॉलमची माहिती भरून दिल्यास कर किती लागेल, हे दिसून येते. अगोदर कर लावलेला असेल तो योग्य किंवा अयोग्य हे सुद्धा तपासून पाहता येणार आहे.

कर अदालतमध्ये सर्वसामान्य नागरिक आम्हाला जास्त कर लावला, तसेच नवीन मालमत्तांना कर किती लागेल, असे साधे साधे प्रश्न विचारतात. प्रत्येक मालमत्ताधारकाला हे समजावून सांगणे अधिकाऱ्यांसाठीही अवघड असते. कारण, माहिती दिल्यानंतर नागरिक उपप्रश्न विचारून भांडावून सोडतात. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी अत्यंत साधे-सोपे टॅक्स कॅलक्युलेटर वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले. मागील एक ते दीड महिन्यापासून यावर काम सुरू होते. मंगळवारी टॅक्स कॅलक्युलेटर अपलोड झाले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना करमूल्य निर्धारण अधिकारी अर्पणा थेटे यांनी सांगितले की, नागरिकांनी वेबसाईटवर गेल्यानंतर मालमत्ता अधिकृत, अनधिकृत, वापराचा प्रकार, प्लॉट अथवा घराचे क्षेत्र, चालू आर्थिक वर्षे किंवा नवीन वर्षे या गोष्टींचा उल्लेख केल्यावर कर किती लागू शकतो याचा तपशील प्राप्त होतो. व्ह्युमध्ये गेल्यावर कोणकोणत्या प्रकारचा कर असेल हे सुद्धा दिसून येईल. एखाद्या नागरिकाला आपल्याला कर जास्त लागला आहे, असे वाटत असेल तर तो टॅक्स कॅलक्युलेटरवर जाऊन पडताळणीही करू शकतो.

टॅक्स कॅलक्युलेटवर पडताळणी केल्यानंतर ज्यांना कर लावायचा असेल त्यांनी संबंधित वॉर्ड कार्यालयात मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र दाखल करावेत. मनपा मुख्यालयातही जमा केले तरी चालतील. महापालिका प्रशासन त्यांना कर लावून देईल, असेही थेटे यांनी नमूद केले.

Web Title: Property Tax, Do-It-Yourself Calculate; Facilities available on Municipal website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.