‘ आपल्याच जवानांचं रक्त असेल तळपायांना लागलेलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:30 AM2019-02-28T00:30:20+5:302019-02-28T00:30:42+5:30

कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.

'Pillars of blood will have their own soldiers' | ‘ आपल्याच जवानांचं रक्त असेल तळपायांना लागलेलं’

‘ आपल्याच जवानांचं रक्त असेल तळपायांना लागलेलं’

googlenewsNext
ठळक मुद्देकविता दिन : मसापचे धीरगंभीर कविसंमेलन


औरंगाबाद : कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.
मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर नांदेडकर हे होते. समारोप करताना नांदेडकर यांनी ‘मराठीचा अभिमान बाळगत असतानाच इतर भाषांशीही मैत्री जपा. कवितेशी इमान राखा, असा सल्ला देत कवितेची मुक्ती माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा आग्रह धरला. त्यांनी सादर केलेल्या ‘ धूळफेक’ या कवितेच्या काही बोलक्या ओळी अशा :
‘ धूळफेक करत,
अभिनय करत,
अनवाणी चालत,
तुम्ही पोहोचलाच पुन्हा
संसदेच्या पवित्र प्रवेशद्वारापाशी
भावनांवर हुकुमत दाखवत
पुन्हा भावुक व्हाल
प्रभू रामचंद्रांनी
बहाल केलेला असेल तुम्हाला
सत्तेचा सुवर्ण मुकुट
आणि गंजलेलं असलं
लोखंडी असलं तरीही
काळीज आहेच की दिलेलं
महाराज,
संसदेच्या पायपुसण्याला
चाळीस वेळा पाय स्वच्छ
पुसा
आपल्याच जवानांचं रक्त
असेल तळपायांना लागलेलं
कवी रवी कोरडे यांनी ‘गळफासाची तयारी’ या कवितेत लिहिलेल्या ओळी अशा :
‘ तू जेव्हा शेवटची तयारी करतोस
पाय जमिनीपासून अधांतरी ठेवण्याची
तेव्हा अंगणातल्या खेळात
लहानग्यांनी तुझ्यासाठी
पूरणपोळीचा बेत केलेला असतो’
नांदेडची कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी तीन तुकड्यात सादर केलेल्या ‘कवीचा माफीनामा’ या कवितेने उत्स्फूर्त दाद मिळविली.
माफक शब्दांची मोताज नसते कविता
हा तुम्ही कोणता डाव मांडताहात
हे तुम्ही कसे फासे फेकताहेत
कवी लिहितो पाणी
तर तुम्ही अमुकतमुक नदीचे नाव घेता
कवी लिहितो रक्त
तर तुम्ही फलान्या- बिस्तान्या जातीचा शिक्का मारता
कवी लिहितो वारा, आभाळ, माती, आई, बाई
तरी तुम्ही तोलता, तुकवता, नागवता कवीला
दासू वैद्य, वीरा राठोड, विलास वैद्य, पी. विठ्ठल, अभय दाणी, योगिनी सातारकर, संदीप जगदाळे, वाल्मीक वाघमारे यांनी या संमेलनात भाग घेऊन प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. प्रारंभी, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी कवींचे स्वागत केले. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. अस्लम मिर्झा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: 'Pillars of blood will have their own soldiers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.