औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 07:35 PM2017-12-07T19:35:23+5:302017-12-07T19:36:33+5:30

शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

The number of private vehicles doubled in six years due to the city bus in Aurangabad | औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादने स्मार्ट सिटीत पाऊल टाकले आणि शहराच्या विकास, विस्ताराची चाके गतिमान झाली. परंतु गेल्या काही वर्षांत शहर बसची ‘चाके ’ जाम झाली आहेत. शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

शहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. औरंगाबाद शहराचा आज चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक अंतर ये-जा करावी लागते. तासन्तास थांबूनही शहर बस येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांचा वापर केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वाहन खरेदीकडे कल वाढला. 

आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे. यामध्ये शहरातील वाहनांची नोंद सर्वाधिक आहे. शहर बससेवा समक्ष असेल तर किफायतशीर प्रवासाला प्राधान्य दिल्या जाते. परंतु गेली अनेक वर्षे शहर बसची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात खाजगी वाहतुकीचा वापर करणे अनिवार्यच झाले. त्यातून शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणाचाही ताण वाढला.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी करून दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची संख्या वाढीला एकप्रकारे हातभार लावण्यात आला. गेली अनेक वर्षे हेतूपुरस्सर शहर बससेवा सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले. शहर बससेवा अपुरी असल्याने आता आणखी एका नव्या प्रकारचे प्रवासी वाहन शहरात दाखल होत असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावरील खर्च वाढला आहे. औरंगाबादेत दररोज सुमारे ३ लाख लिटर पेट्रोल तर सुमारे २ लाख डिझेलची विक्री होते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी दिली. दुचाकी, रिक्षांमध्ये इंधन विक्रीचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे शहर परिसराचे वातावरण प्रदूषित होण्यासही हातभार लागत आहे. 

सहा वर्षांत दुपटीने वाढ
२००९-१० यादरम्यान जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार २७ इतकी होती. अवघ्या सहा वर्षांत ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वाहनांची संख्या ११ लाख २ हजार ४४४ वर जाऊन पोहोचली. त्यानंतर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ७३ हजार वाहनांची भर पडली. तर एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ६० हजार ९३६ नव्या वाहनांची भर पडली आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या शहरातील रस्त्यांवर ७ लाखांवर वाहने धावत आहेत.

Web Title: The number of private vehicles doubled in six years due to the city bus in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.