ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर

By दत्ता लवांडे | Published: January 30, 2024 03:28 PM2024-01-30T15:28:12+5:302024-01-30T15:28:47+5:30

'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'; 'सरपंचपती'चे अजब विधान

No water, no light, no toilet; Grampanchayat's negligence towards Anganwadi in Vithalnagar of hardworking people | ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर

ना पाणी, ना लाईट, ना टॉयलेट; कष्टकऱ्यांच्या विठ्ठलनगरातील अंगणवाडी वाऱ्यावर

- दत्ता लवांडे
पैठण :
गावालगत असलेले उसाचे शेत, शेजारीच असलेले ज्वारीचे शेत, तिथेच गावाला वीजपुरवठा करणारी विजेची डीपी, जनावरांना खाण्यासाठी लागणाऱ्या वैरणीच्या गंजी, उसाच्या शेतातील पाचटाचा ढिगारा, छातीएवढे वाढलेले गवत आणि यामध्ये मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा पाया असलेली अंगणवाडी. या अंगणवाडीत ना लाईट, ना पाणी, ना टॉयलेट अशी अवस्था. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावातील विठ्ठलनगर येथे असलेल्या अंगणवाडीची ही अवस्था आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपासून सुरू झालेल्या अंगणावाडीसाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. 

दरम्यान, टाकळी अंबड गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलगर येथील बहुतांश नागरिक हे उसतोड मजूर म्हणून काम करतात. या गावात सहा ते सात वर्षांपूर्वी बांधलेल्या अंगणवाडीमध्ये एका महिन्यापूर्वी केवळ एक कपाट, टेबल अन् खुर्च्या देण्यात आल्या आहेत.

लाईट-पाण्याची सुविधा नाही
अंगणवाडी सुरू होऊन काही वर्षे उलटून गेले तरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि लाईटची सुविधा नाही. त्याचबरोबर रूममध्ये असेलेले टॉयलेट, बाथरूम आणि किचनचीही दुरावस्था झाली आहे. या अंगणवाडीतील लहान मुलांना खेळायला कोणत्याच प्रकारचे ग्राऊंड नसल्याने मुलांचा शारीरिक विकासही खुंटत आहे. 

शेजारीच डीपी अन् उसाचे शेत
अंगणवाडीच्या शेजारीच गावाला वीजपुरवठा करणारी डीपी आहे. या डीपीला किंवा अंगवणाडीला कसल्याही प्रकारचे कुंपन घातले नाही. त्याचबरोबर शेजारीच उसाचे शेत असल्यामुळे जंगली प्राणी किंवा साप, विंचू अशा प्राण्यांचा धोका लहान मुलांना आहे. उसाचे पीक मोठे झाल्यानंतर बिबट्यासारख्या प्राण्यांचा यामध्ये वावर आढळतो. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

छत गळके, भिंतीला पडल्या भेगा
या अंगणवाडीच्या इमारतीचे छत पावसाळ्यामध्ये मागच्या दोन वर्षांपासून गळत आहे. यामुळे लहान मुलांना रूममध्ये नाहीतर पडवीत बसावे लागते. भिंतीलासुद्धा पाठीमागे आणि पुढे अशा चार पाच जागेवर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे साप, विंचू किंवा सरपटणारे प्राणी रूममध्ये येण्याचा धोका आहे. पडवीमध्ये असलेली फरशीसुद्धा निघाली असून पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे.  

अंगणवाडी आवारात कचरा, गवतांचा उत
अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जो परिसर आहे त्या परिसरात उसाचे पाचट, जनावरांची वैरण, कचरा टाकलेला आहे. अंगणवाडीच्या भिंतीलगत छातीएवढे गवत वाढले असल्याने विद्यार्थ्यांना मोकळी जागा उपलब्ध नाही. अशा अवस्थेत उसतोड कामगारांचे मुलं शिक्षण कसे घेतील हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

अंगणवाडीत अजूनही नाही फळा
मुलांना शिकवण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे फळा आणि खडू. पण या अंगणावाडीत अजूनही फळा नाही अशी अवस्था आहे. अंगणवाडी सेविका वेळेवर हजर राहत नाही, तर आल्यानंतर लवकरच घरी जातात. पोषण आहारसुद्धा व्यवस्थित आणि वेळेवर येत नाही, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. 

'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो'
याप्रश्नी टाकळी अंबड येथील सरपंच जयश्री घायतडक यांचे पती सुनिल घायतडक यांना संपर्क केला असता, 'अंगणवाडीची दुरवस्था झाली तेव्हा आम्ही सत्तेवर नव्हतो, दुरवस्था का झाली तुम्हाला माहिती नाही का?' असं अजब उत्तर मिळालं. त्याचबरोबर, 'सरपंच इथे नाहीत, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही' असं सांगत त्यांनी अंगणवाडीच्या सुविधेच्या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.

अंगणवाडीच्या आवारात जनावरे बांधतात 
"आम्ही मागच्या एक दीड वर्षांपासून अंगणवाडीमध्ये लाईट, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज केला आहे पण या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. त्याचबरोबर रूमच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत, छत गळत आहे,  अंगणवाडीच्या आवारात स्थानिक नागरिक जनावरे बांधतात यामुळे लहान मुलांना खेळायला ग्राऊंडच उपलब्ध नाही." 
- शशिकला म्हस्के (अंगणवाडी सेविका, विठ्ठलनगर)

शैक्षणिक, शारिरीक नुकसान
"अंगणवाडी सेविका अनेकदा वेळेवर हजर नसते. तर अंगणावाडीमध्ये फळा घेण्यासाठी सेविकेने लहान मुलांच्या पालकांकडून प्रत्येकी ५० रूपये जमा केले आहेत पण अजूनही तेथे फळा नाही. लहान मुलांना पोषण आहारही व्यवस्थित दिला जात नाही. त्यामुळे येथील लहान मुलांचे शैक्षणिक आणि शारिरीक नुकसान होत आहे."
- दिलीप भोसले (स्थानिक नागरिक, विठ्ठलनगर)

Web Title: No water, no light, no toilet; Grampanchayat's negligence towards Anganwadi in Vithalnagar of hardworking people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.