उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:45 AM2018-11-20T11:45:06+5:302018-11-20T11:45:45+5:30

बाजारगप्पा : उत्तर प्रदेशातून नवीन बाजरीची आवक सुरू झाल्याने औरंगाबाद बाजारपेठेत  स्थानिक बाजरीचे भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरले.

New Bajari of Uttar Pradesh comes in Aurangabad markets | उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी औरंगाबादच्या बाजारात

उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी औरंगाबादच्या बाजारात

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

मागील आठवड्यात उत्तर प्रदेशातून नवीन बाजरीची आवक सुरू झाल्याने औरंगाबाद बाजारपेठेत  स्थानिक बाजरीचे भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरले. मात्र, रबीचा पेरा कमी असल्याने जुन्या ज्वारीचे भाव आणखी  १०० रुपयांनी वधारले. दिवाळीनंतर बाजारपेठेत धान्याचा उठाव कमी झाला आहे. किराणा बाजारातही शुकशुकाट जाणवत आहे. मात्र, धान्याच्या अडत बाजारात मका, तूर व बाजरीची आवक सुरू झाल्याने थोडी वर्दळ वाढत आहे.

यंदा कमी पावसामुळे बाजरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे बाजरीलाही भाव आला. स्थानिक बाजरी क्विंटलमागे २३५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. एकीकडे थंडी वाढत आहे तर दुसरीकडे बाजरी महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे बाजरी आहे, त्यांना यंदा बाजरीला चांगला भाव मिळत आहे. पण उत्पादन कमी असल्याने त्याचा जास्त फायदा त्यांना मिळत नाही. मागील दोन ते तीन वर्षांच्या खंडानंतर मागील आठवड्यात उत्तर प्रदेशातील नवीन बाजरी बाजारात दाखल झाली.

आठवडाभरात सुमारे १५०० क्विंटल बाजरीची आवक झाली. परिणामी बाजरीचा भाव १०० रुपयांनी उतरून २००० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. उत्तर प्रदेशातील बाजरीची आवक आणखी वाढल्यास भाव आणखी कमी होतील, अशी  शक्यता होलसेल विक्रेत्यांनी व्यक्त केली. राज्यात ऊसतोड कामगारांकडून बाजरीला जास्त मागणी असते. 

ज्वारीची सर्वाधिक पेरणी मराठवाड्यात होत असते. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्याने रबी हंगामात बाजरीचे पीक घेण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. यामुळे पेरणी कमी झाली आहे. ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. परिणामी भविष्यात शाश्वती नसल्याने जुन्या ज्वारीच्या भावात आणखी १०० रुपयांनी तेजी आली असून, शनिवारी ज्वारी २६५० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. ज्वारीचे भाव वाढत असतानाच शेजारील कर्नाटक राज्यातून नवीन ज्वारी स्थानिक बाजारात दाखल झाली आहे. आठवडाभरात ९५० क्विंटल ज्वारीची आवक झाली. ही ज्वारी २४०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान विकत आहे. पुढील आठवड्यात कर्नाटकी ज्वारीची आवक वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

यंदा हिवाळ्यातच भूजलपातळी कमी झाली असल्यामुळे रबीत ज्वारीपाठोपाठ गव्हाची पेरणीही कमी होत आहे. गव्हाला पाणी अधिक प्रमाणात लागते. तसेच मागील १५ वर्षांपासून मराठवाड्यात गव्हाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. पाण्याअभावी अनेक शेतकरी स्वत:पुरताच गहू घेत आहेत. बहुतांश गहू मध्यप्रदेशातून येत असतो. मात्र, मराठवाड्यात गव्हाची पेरणी कमी झाल्याचे कारण पुढे करून आठवडाभरात गव्हाचे भाव ५० ते ६० रुपयांनी वाढविले. मागील आठवड्यात जाधववाडीतील अडत बाजार व मोंढ्यातील होलसेल धान्य बाजारात डाळीचे भाव स्थिर होते. 

Web Title: New Bajari of Uttar Pradesh comes in Aurangabad markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.