Namantar Andolan : नामांतर लढ्यातील या दिग्गज दिवंगतांच्या योगदानाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:56 AM2019-01-14T11:56:10+5:302019-01-14T11:58:19+5:30

नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल.

Namantar Andolan: Salute to the contribution of veterans in the Namantar Andolan of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | Namantar Andolan : नामांतर लढ्यातील या दिग्गज दिवंगतांच्या योगदानाला सलाम

Namantar Andolan : नामांतर लढ्यातील या दिग्गज दिवंगतांच्या योगदानाला सलाम

googlenewsNext

औरंगाबाद : यंदाचे हे विद्यापीठ नामविस्ताराचे रौप्यमहोत्सवी वर्ष. नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल. कितीतरी जणांनी यात आपले योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विनम्र सलामच. 

ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत व नेते कॉ. चंद्रगुप्त चौधरी आणि त्यांच्या पत्नी कॉ. करुणाभाभी चौधरी आज हयात नाहीत; पण हे दोघेही सामाजिक बांधिलकी ठेवून आयुष्यभर श्रमिक, कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले. मग नामांतरासारख्या समतेच्या लढ्यात ते नसतील तरच नवल. 

बापूसाहेब काळदाते आणि सुधा काळदाते ही जोडीही अशीच. आयुष्यभर त्यांनी दीनदलित, गोरगरिबांचीच चिंता वाहिली. ही जोडी पण नामांतराच्या लढ्यात अग्रभागी राहिली. दिवंगत बापूसाहेब काळदाते यांच्या विद्वतापूर्ण व ओजस्वी भाषणांनी त्याकाळी एक पिढी घडत गेली. म. भि. चिटणीस आणि म. य. ऊर्फ बाबा दळवी यांचे योगदान तर वादातीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास, विश्वास लाभलेले म. भि.सर तर नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष राहिले. मोठ-मोठे मोर्चे त्यांच्या नेतृत्वाखाली निघाले. पुढे अध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. अंकुश भालेकर यांनी सांभाळली. म. य. ऊर्फ बाबा दळवी हे तर प्रारंभापासूनच लोकमतसारख्या मोठ्या दैनिकातून आपली लेखणी नामांतराच्या बाजूने चालवत होते. इतकेच नाही तर प्रत्यक्ष लढ्यातही ते सक्रिय राहिले होते. 

दिवंगत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हेही नामांतरवादी. नामांतरासाठी कारावास भोगलेले. दिवंगत प्राचार्य गजमल माळी यांचीही या लढ्यात महत्त्वाची भूमिका राहिली. माजी आमदार दिवंगत वसंतराव काळे यांनी तर विद्यापीठात नामांतराचा ठराव मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय हे पक्के आंबेडकरवादी. नामांतर लढ्यातही ते सक्रिय राहिले. माजी राज्यमंत्री दिवंगत अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर हे नामांतर लढ्याचे नेतृत्व करीत होते. कारावासही भोगत होते. 

आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. एस. टी. प्रधान. ते रिपब्लिकन चळवळीत वाढलेले. पुढे काँग्रेसवासी झालेले; पण नामांतराची भूमिका त्यांनी सोडली नाही. याच मुद्यावरून त्यांना विधानसभा निवडणुकीत फटकाही बसला. जगन कांबळे, भाई चंद्रकांत जाधव, भीमराव जाधव, प्रा. अनंत मांजरमकर, प्रकाश जावळे, अ‍ॅड. प्रवीण वाघ, तातेराव ससाणे, पत्रकार प्रकाश देशमुख या दिवंगतांचा नामांतर लढ्यातील सहभाग आणि योगदान मोलाचेच. त्यांचे स्मरण आज झाल्याशिवाय राहत नाही. 

डॉ. गंगाधर पानतावणे आणि प्रा. अविनाश डोळस आज नाहीत. आपल्या लिखाणाद्वारे आणि व्याख्यानांद्वारे त्यांनी नामांतराची ज्योत सतत प्रज्वलित ठेवली. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक दिवंगत बापूराव जगताप यांनी नामांतराचा झंझावात महाराष्ट्रभर पोहोचवला.

Web Title: Namantar Andolan: Salute to the contribution of veterans in the Namantar Andolan of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.