Namantar Andolan : नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यायचे : बाबूराव कदम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:17 PM2019-01-21T12:17:15+5:302019-01-21T12:20:55+5:30

लढा नामाविस्ताराचा : १० जून १९७७ चा प्रसंगाची आठवण आली की, आजही अंगावर शहारे येतात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची गाडी औरंगाबादेत अडविण्यात आली. चिकलठाण्याच्या मंडाबाई लक्ष्मण, मसनतपूरच्या मुक्ताबाई भालेराव, पुष्पा गायक वाड आदी महिला जिवाची पर्वा न करता गाडीसमोर आडव्या झाल्या. गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, असे त्यांनी सांगितले.

Namantar Andolan: For the Namantar March thousands of students came : Baburao Kadam | Namantar Andolan : नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यायचे : बाबूराव कदम 

Namantar Andolan : नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी यायचे : बाबूराव कदम 

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘लोकमत’च्या समंजस भूमिकेमुळे वातावरण निवळले

- स. सो. खंडाळकर

तो काळच मंतरलेला होता. नामांतर हा अस्मितेचा प्रश्न बनलेला होता. नामांतराचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी यायचे. सहभागी व्हायचे. सारेच जण जणू पेटून उठलेले. १९८२ नंतर औरंगाबादेत ‘लोकमत’ आले आणि ‘लोकमत’च्या समंजस भूमिकेमुळे धगधगत असलेले वातावरण निवळत जाण्यास नक्कीच मदत झाली. ‘लोकमत’ जणू नामांतरवाद्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आणि या लढ्याचा जीवाभावाचा मित्र बनला’ असे सडेतोड मत  ‘रिपाइं-ए’चे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी व्यक्त केले. 

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. बाबूराव कदम हे आता ‘रिपाइं ए’चे कार्याध्यक्ष आहेत; पण त्यावेळी ते दलित पँथरमध्ये होते. गंगाधर गाडे, दिवंगत अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, आजचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, दिवंगत अरुण कांबळे, अशी सारी बिनीची नेतेमंडळी एकत्रच होती. दलित पँथरच्या नेतृत्वाखाली लढा लढत होती. राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आणि औरंगाबादेतच दलित पँथरची पुरर्स्थापना करून ‘मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे,’ ही मागणी लावून धरण्याचे ठरले.

अटकसत्र चालूच होते
त्यावेळी मी मिलिंद महाविद्यालयात शिकत होतो. पुढे मी पँथरचा कार्यकर्ता बनलो व नामांतर लढ्यात सामील झालो. १२ जून ७८ मध्ये आझाद मैदानावरून नामांतरासाठी मोर्चा काढण्यात आला. रेल्वेच्या गाड्या भरून लोक सहभागी झाले होते. आठवले-अरुण कांबळे यांनी घणाघाती भाषणे केली. पोलिसांनी लाठीमार केला. त्यात आम्हाला अटक करण्यात आली व दोन दिवसांनंतर सोडून देण्यात आले. पुढे २७ जुलै १९७८ रोजी नामांतर घोषित केल्यानंतरही वातावरण तणावपूर्ण बनले आणि आम्हाला अटक करून १५ दिवस हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात झालेल्या सत्याग्रहातही आम्हाला अटक करण्यात आली. १९८४ साली क्रांतीचौकात रास्तारोको करण्यात आला. त्यावेळी आम्हाला अटक करून एमआयडीच्या एका गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले. जागाच नव्हती म्हणून काही कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती बाबूराव कदम यांनी दिली. छावणीतील गवळीपुरा येथे मी एका खोलीत राहत होतो. मिलिंदमधील विद्यार्थी नामांतराच्या प्रश्नावर पेटून उठले होते. पँथरने हा लढा नेटाने लढवला.

पुढे १९९० ला रामदास आठवले यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आठवलेंना मंत्री केल्याने नामांतराचा प्रश्न निवळेल, असे  शरद पवार यांना वाटले; परंतु उलट झाले. लढा तीव्र झाला. १४ एप्रिल १९९४ पर्यंत नामांतर न झाल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असा इशारा आठवले यांनी शरद पवार यांना दिला. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या माझ्या समाजासाठी मी मंत्रीपदावर लाथ मारायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर शरद पवार यांनी नामांतर करण्याच्या दिशेने हालचाल सुरू केली. नामांतर विरोधकांच्या बैठका घेतल्या आणि १४ जानेवारी रोजी नामांतराऐवजी एकदाचा नामविस्तार झाला, असे कदम यांनी सांगितले.

Web Title: Namantar Andolan: For the Namantar March thousands of students came : Baburao Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.