चिखलमय गणेशनगर झाले गुळगुळीत ; न्यू गणेशनगर, मोतीनगरचे काय ?

By साहेबराव हिवराळे | Published: November 23, 2023 08:31 PM2023-11-23T20:31:34+5:302023-11-23T20:32:05+5:30

जलवाहिनी, ड्रेनेजलाईन टाकली, परंतु टँकरच्या पाण्यावर १२ महिने विसंबून

Muddy Ganeshnagar became smooth; What about New Ganeshnagar, Motinagar? | चिखलमय गणेशनगर झाले गुळगुळीत ; न्यू गणेशनगर, मोतीनगरचे काय ?

चिखलमय गणेशनगर झाले गुळगुळीत ; न्यू गणेशनगर, मोतीनगरचे काय ?

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगरचा जवळील भाग म्हणून गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर आदी परिसर ओळखला जातो. या परिसरातील वसाहतींत जाताना रस्ते गुळगुळीत झाले आहेत. पण, सुनियोजित विस्तारच रखडला आहे.

प्रश्न काय आहेत?
सिडको एन-४च्या पाठीमागे शिवाजीनगर मागील या वसाहती आहेत. येथे खालील समस्यांनी डोके वर काढले आहे. ड्रेनेजलाईन नाही. नवीन जलवाहिनी टाकून १२ महिने झाले असले तरी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे. ठिकठिकाणचे बोअर आटले आहेत. नवीन विकास कामांना मंजुरी मिळूनही कामे तडीस नेली गेली नाहीत. भागातील काही रस्ते अजूनही कच्चे असल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते.

सुशिक्षित तसेच स्वयंरोजगाराचे वास्तव्य...
गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर अशा वसाहतींत राहणाऱ्यांमध्ये डॉक्टर, वकील, बँकिंग सेक्टर तसेच काॅर्पोरेट सेक्टरमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांचे येथे वास्तव्य आहे. गरीब आणि हातावर काम करणाऱ्यांच्या मुलांनी शिक्षणातून प्रगती केली आहे. सिडको परिसरासारखे आपणही जीवन जगावे असाच प्रत्येकाचा संकल्प आहे. त्यातुलनेत परिसराचा विकास होताना दिसत आहे.
- ॲड. नागोराव डोंगरे 

पावसाळ्यात टँकरला होते अडचण...
पिण्याच्या पाण्याचे १२ महिने संकट कायम असून, बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. टँकरच्या फेऱ्या ड्रमवर अवलंबून असतात, मनपाकडे ड्रमनुसार पैसे भरल्यानंतरच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात टँकर येण्यास अडचणी येतात. त्यामुळे जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागते. अजून किती दिवस हा त्रास सुरू राहणार ?
- रुक्मिणीबाई आदमाने

रस्त्याचा प्रश्न सोडवावा...
इतर भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला असून, उर्वरित गल्ल्यातील रस्ते चिखलात रुतलेले असतात. एरवी शाळकरी मुलांची नेआण करणाऱ्या वाहनांना देखील घरापर्यंत येताना अडसर निर्माण होतो. तो दूर होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला तसाच विविध गल्लीतही रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांतून आहे.
- श्याम कदम

आवश्यक ठिकाणी पथदिवे टाका
वसाहतीत विविध गल्ल्यात विजेचे खांब नसल्याने वीज पुरवठा दुरवरून घरापर्यंत घ्यावा लागतो. पथदिवेही नसल्याने कामगार व नोकरदरांना अंधारातून घर गाठावे लागते. गल्लीतील अंधार हटविण्यासाठी पथदिवे बसविण्याची नितांत गरज आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- सुरेखा मांजरे

उर्वरित कामे पूर्ण होणार...
शिवाजीनगर ते गोकुळ स्वीटपर्यंत विकास आराखड्याखाली महत्त्वपूर्ण रस्त्याचे रखडलेले काम करण्यास यश आले. गणेशनगर, न्यू गणेशनगर, मोतीनगर, भागातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय होता, ड्रेनेज लाइनचा तो पूर्ण केला असून, नवीन जलवाहिनी टाकलेली आहे, मनपाकडून पाणी पुरवठा होईल त्यावेळी सर्वांना मुबलक पाणी येणार आहे. टँकरच्या पाण्याशिवाय सध्या नागरिकांना पर्याय नाही. विकास कामे मंजूर असून तेही पूर्ण होणार आहेत.
- माजी नगरसेवक कैलास गायकवाड 

Web Title: Muddy Ganeshnagar became smooth; What about New Ganeshnagar, Motinagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.