बजाजनगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 08:26 PM2018-12-23T20:26:38+5:302018-12-23T20:26:51+5:30

वाळूज उद्योगनगरीतील पहिली कामगार वसाहत व मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगरात आजघडीला एकही सार्वजनिक सुलभ शौचालय नाही.

 Lack of public toilets in Bajajnagar | बजाजनगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव

बजाजनगरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील पहिली कामगार वसाहत व मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगरात आजघडीला एकही सार्वजनिक सुलभ शौचालय नाही. त्यामुळे कामाच्या शोधात व इतर कामासाठी बाहेर गावाहून आलेले प्रवासी व कामगारांची गैरसोय होत असून, महिलांची कुचंबना होत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे आढळून आले आहे. 


एमआयडीसीने बजाजनगरमध्ये कोलगेट चौकात सार्वजनिक शौचालय बांधून खाजगी संस्थेला भाडेतत्वावर दिले होते. मात्र, त्याठिकाणी अनूचित प्रकार होत असल्याने काही महिन्यांपूर्वीच हे शौचालय एमआयडीसीने जमीनदोस्त केले. यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. एकीकडे केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून, यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. पण जवळपास एक लाख लोकसंख्या असतानाही या भागात एकही सार्वजनिक शौचालय नाही. पुरुषांपेक्षा महिलांची अधिक प्रमाणात कुचंबना होत आहे. पण वर्दळीचा भाग असलेल्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. यातून नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे.

एमआयडीसी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे, अन्यथा ‘राईट टू पी’ यासारखी चळवळ उभारण्याचा इशारा परिसरातील महिलांनी दिला आहे.


आजाराची लागण
लघुशंका व नैसर्गिक विधी वेळेवर न केल्यास आजारांना आमंत्रण ठरते. यामुळे पोटदुखी, मुतखडा यासारखे गंभीर आजार जडत आहेत, असे दिनेश दुधाट यांनी सांगितले.


दूरवर पायपीट करावी लागते
औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे दररोज हजारो नागारिक विविध कामासाठी बाहेरगावाहून येतात. पण या ठिकाणी नैसर्गिक विधी करण्यासाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. हे दुर्र्दैव आहे. लघुशंकेसाठी सुधा दूरवर पायपीट करावी लागते. असे परमेश्वर मदन,अंजन साळवे यांनी सांगितले.

Web Title:  Lack of public toilets in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.