'यहां से एक कमल दिल्ली भेज दो'; छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढण्यावर शिक्कामोर्तब 

By विकास राऊत | Published: March 6, 2024 11:24 AM2024-03-06T11:24:48+5:302024-03-06T11:24:48+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून स्पष्ट संकेत

'Here send a lotus to Delhi'; Chhatrapati Sambhajinagar seat sealed for BJP contest | 'यहां से एक कमल दिल्ली भेज दो'; छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढण्यावर शिक्कामोर्तब 

'यहां से एक कमल दिल्ली भेज दो'; छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढण्यावर शिक्कामोर्तब 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणातून मंगळवारी मिळाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी येथे कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत केले. मागच्या वेळी जी चूक केली, ती चूक यावेळी करू नका, असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी केले. 

भाजपने हा मतदारसंघ लढण्याची पूर्ण तयारी केल्याचे सभेच्या नियोजनातून दिसून आले. तसेच कमळ या चिन्हावरच ही लोकसभा लढली जाणार असल्याचेदेखील स्पष्ट होत आहे. शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस होते. त्यांनी स्थानिक नेत्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांशी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहमदनगर क्लस्टरच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर सायंकाळी सभेत येथे कमळ फुलविण्याचे आवाहन केले. एमआयएम आणि भाजप अशी थेट लढत लोकसभेच्या रणसंग्रामात पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

सभेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आ. पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राहुल लोणीकर, नगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, रिपाइंचे बाबूराव कदम, आदींची भाषणे झाली.

नामकरणावरून फडणवीसांनी टार्गेट केले ठाकरेंना
या शहराला संभाजीनगर असे नाव दिले पाहिजे, अशी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली. पण दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षे याबाबत जाग आली नाही. ज्यावेळी सरकार अल्प मतात आले, त्यावेळी शेवटच्या क्षणी ठराव केल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले. शिंदे सरकार आल्यावर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करून प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली. मागच्या लोकसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने मतदान केले तर काय होते, त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. चूक केल्यामुळे सगळ्या चांगल्या उपक्रमांना विरोध करणाऱ्यांच्या यादीत शहराचे नाव गेले. ३७०, राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जे आपले होते, ते देखील त्यांच्याच रांगेत जाऊन बसले. त्यामुळे यावेळी चूक करू नका, काही थेट विरोधात येतील, काही बहुरूपी तयार झाले आहेत. इकडे हिंदुत्वाचे नारे देतात, तिकडे ठाकरेंना जनाब असे संबोधतात. अशांना ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्र शासनाने जिल्ह्याला भरभरून दिले...
शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत शहराचा पाणीप्रश्न मिटेल, असा दावा करीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस १६८० कोटी रुपये योजनेसाठी मंजूर केले. मात्र, २०१९ मध्ये दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. योजनेची निविदा काढायला सरकारला दीड वर्ष लागले. त्यामुळे योजनेला उशीर झाला. आता योजनेचे काम गतीने सुरू आहे. शहराला स्मार्ट सिटीसाठी १ हजार कोटी केंद्र शासनाने दिले. साडेचार हजार कोटींची पीएनजी गॅस योजना आहे. प्रत्येक घराला गॅस मिळणार असून, ६० हजार घरांमध्ये कनेक्शन देण्याचे काम झाले आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी १५० कोटींचे सी-डॉप्लर रडार मंजूर झाले आहे. वंदे भारत रेल्वे, ३०० कोटींचे रेल्वे स्टेशन, पीटलाईनचे उद्घाटन, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू असून, केंद्र शासनाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे, असे डॉ. कराड म्हणाले.

आम्ही तर जागा मागितली आहे....
छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये भाजपनेच लढवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील येथून कमळ फुलवा, असे आवाहन केल्यामुळे आमच्या मागणीला बूस्ट मिळाल्यासारखेच आहे.
- शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष

मतदार यावेळी चूक करणार नाहीत.....
मतदार मागच्या निवडणुकीसारखी चूक यावेळी करणार नाहीत. केंद्र शासनाने केलेली कामे, तसेच राममंदिर, कलम ३७० आणि महिलांसाठी आरक्षण इ. कामे मोदी सरकारच्या काळात झाली आहेत. देशाची आर्थिक घडी बसवून देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेच्या दिशेने नेण्याचे काम मोदी करीत आहेत. सभेचे वातावरण पाहता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचाच होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भाषणातून देखील तसेच संकेत मिळाले आहेत.
- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

Web Title: 'Here send a lotus to Delhi'; Chhatrapati Sambhajinagar seat sealed for BJP contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.