नरेंद्र मोदींनी कुटुंबात राजकारण आणले असते तर मी अंबानींचा पार्टनर असतो, प्रल्हाद मोदींचे मत

By विकास राऊत | Published: December 12, 2022 12:27 PM2022-12-12T12:27:31+5:302022-12-12T12:29:55+5:30

'मी स्वस्त धान्य दुकानावरून गरिबांना धान्य कसे मिळेल, याकडे पाहतो. मोदी राष्ट्रसेवेतून जनकल्याणाचे काम करीत आहेत.’

Had Narendra Modi brought politics into the family, I would have been Ambani's partner, says younger brother Prahladbhai Modi | नरेंद्र मोदींनी कुटुंबात राजकारण आणले असते तर मी अंबानींचा पार्टनर असतो, प्रल्हाद मोदींचे मत

नरेंद्र मोदींनी कुटुंबात राजकारण आणले असते तर मी अंबानींचा पार्टनर असतो, प्रल्हाद मोदींचे मत

googlenewsNext

औरंगाबाद : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आमच्या कुटुंबात राजकारण आणले असते, तर मी उद्योगपती किंवा अंबानींचा पार्टनर राहिलो असतो. परंतु, एका तत्त्वाचे संस्कार आमच्या कुटुंबावर आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी वडील असलेले पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कुटुंबात राजकारण आणले नाही, असे ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व पंतप्रधानांचे लहान बंधू प्रल्हादभाई मोदी यांनी येथे सांगितले.

बुलढाणा येथे आज, १२ डिसेंबर रोजी रेशन दुकानदारांचे अधिवेशन, वर्कर्स कमिटीची बैठक होत आहे. त्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी प्रल्हादभाई, फेडरेशनचे सचिव विश्वंभर बासू शहरात आले होते. यावेळी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी. एन. पाटील यांची उपस्थिती होती. मोदी यांनी काही निवडक माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांचे बंधू आहात, त्यामुळे हक्काने काही बाबी सांगून त्यांच्याकडून कामे करून घेता येत असतील, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘पंतप्रधान कुटुंबात राजकारण आणत नाहीत. तसे केले असते, तर मी अंबानींचा पार्टनर राहिलो असतो. आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. परिवारातून राजकारणाचा कोणताही वारसा आम्हाला नाही. नरेंद्र यांनी जे मिळविले व आज ते ज्या पदावर आहेत, ते त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळविले आहे. राजकारणाचा व्यवहार करणे हे त्यांच्या तत्त्वात नाही. मी स्वस्त धान्य दुकानावरून गरिबांना धान्य कसे मिळेल, याकडे पाहतो. मोदी राष्ट्रसेवेतून जनकल्याणाचे काम करीत आहेत.’

पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटीचा योग वारंवार येतो काय, यावर प्रल्हादभाई म्हणाले, ‘नाही, तसा योग येत नाही. मध्यंतरी गुजरातमधील एका पदयात्रेत स्वागतासाठी हार घेऊन गर्दीत उभा होतो. त्यावेळी त्यांनी मला जवळ बोलवून स्वागत स्वीकारले. मतदानासाठी असलेला पत्ता गुजरातमधील आहे, त्यामुळे त्यांना कुटुंबाकडे येता आले, नाहीतर त्यांनी राष्ट्रसेवेसाठी कुटुंब केव्हाच सोडले आहे.’

नीती आयोगात दोन सदस्य असावेत...
देशातील रेशनदुकानदार आणि ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी नीती आयोगात फेडरेशनचे दोन सदस्य असावेत. दुकानदारांचे कमिशन वाढले पाहिजे; तसेच कार्डधारकांची संख्या वाढली पाहिजे. ५ किलो मोफत तांदूळ आणखी सहा महिन्यांनी वाढवावा. २०११ च्या जनगणनेनुसार कार्डधारकांची संख्या आहे. त्यात आताच्या लोकसंख्येनुसार वाढ झाली पाहिजे. धान्य गळती प्रती क्विंटल १ किलो मिळावी. शहरात ४८ टक्के, तर ग्रामीण भागात ७५ टक्के कार्डधारक आहेत. देशभरात ५ लाख ३६ हजार ३८ दुकाने आहेत. ई-पॉस मशीनमुळे ग्राहक व दुकानदारांत वाद होत आहेत. या सगळ्या बाबींवर फेडरेशन अधिवेशनात चर्चा करणार असल्याचे सचिव बासू व राज्य अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Had Narendra Modi brought politics into the family, I would have been Ambani's partner, says younger brother Prahladbhai Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.