गटशिक्षणाधिकारी, बीडीओंना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:44 AM2019-02-11T00:44:57+5:302019-02-11T00:45:39+5:30

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकावर सोयगाव पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे आणि गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांना रविवारी कायदेशीर नोटिसा बजावल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 Govt. Education Officer, Notices issued to BDO | गटशिक्षणाधिकारी, बीडीओंना बजावल्या नोटिसा

गटशिक्षणाधिकारी, बीडीओंना बजावल्या नोटिसा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकावर सोयगाव पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे आणि गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांना रविवारी कायदेशीर नोटिसा बजावल्याने सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हरिदास काटोले या मुख्याध्यापकाकडे जरंडी केंद्राचाही पदभार होता. या मुख्याध्यापकाने जरंडी प्राथमिक शाळेच्या २१ विद्यार्थिनींशी चार महिन्यांपासून अश्लील संवाद साधण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस झाला. यानंतर सोयगाव पोलीस ठाण्यात पालक व ग्रामस्थ तक्रार देणार होते. परंतु गटविकास अधिकारी एम. सी. राठोड आणि गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी ग्रामस्थांना पोलिसात तक्रार देऊ नका, आम्ही गावात येऊन चौकशी करतो, असे आश्वासन दिले होते. यावरून ग्रामस्थांनी सोयगाव पोलीस ठाण्यात केवळ घटनेचा अर्ज दाखल केला होता. गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यासमवेत ग्रामस्थ व पालकांनी जरंडी शाळेत जाऊन या दोघांनी घटनेची चौकशी केल्यानंतर त्यांच्या अहवालावरून बुधवारी तातडीने निलंबित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाने सोयगाव पोलिसात फिर्याद देणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी संबंधित मुख्याध्यापकाला पाठीशी घालून सोयगाव पोलिसात फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाल्यावरून या दोघांनी पोलिसांची अर्थात कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली करून पोलिसांना अंधारात ठेवल्याचे चौकशीत समोर आले असल्याचे पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांना सोयगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यातून दूरध्वनी करण्यात आले. परंतु त्यांनी दूरध्वनी टाळत वेळ मारून नेली. त्यानंतर पोलिसांनी थेट जरंडी शाळा गाठून बालकल्याण समितीच्या माध्यमातून सरकारतर्फे फिर्याद देऊन सदर मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन दिवसांत खुलासा सादर न केल्यास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
जरंडी शाळेच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांना कायदेशीर नोटिसा काढण्यात आल्या असून, खुलासा न मिळाल्यास या दोघांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी दिली.

Web Title:  Govt. Education Officer, Notices issued to BDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.