अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष म्हणजे ‘रबरी शिक्का’ : प्रतिभा अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:54 PM2019-03-09T12:54:14+5:302019-03-09T12:56:47+5:30

संमेलनाध्यक्ष असूनही त्यांना व्यक्त होता आले नाही, मत मांडता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर या विद्रोही साहित्य संमेलनात मी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका मांडणार आहे.

Female President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan is like 'Rubber stamp': Pratibha Ahire | अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष म्हणजे ‘रबरी शिक्का’ : प्रतिभा अहिरे

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष म्हणजे ‘रबरी शिक्का’ : प्रतिभा अहिरे

googlenewsNext

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदी असलेल्या महिलेची भूमिका ही केवळ ‘रबरी शिक्क्या’ प्रमाणे होती. संमेलनाध्यक्ष असूनही त्यांना व्यक्त होता आले नाही, मत मांडता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर या विद्रोही साहित्य संमेलनात मी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका मांडणार आहे. ऊर्मिला पवारही अध्यक्षा होऊन गेल्या. प्रतिमा परदेशी प्रमुख संघटक म्हणून काम पाहत आहेत. हा या दोन साहित्य संमेलनातील मोठा फरक असून, विद्रोहाचे नेतृत्व महिला करीत आहेत, अशी ठाम भूमिका १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवड झालेल्या कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मांडली. निपाणी (बेळगाव) येथे दि.१० मार्च रोजी विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, या संमेलनाध्यक्षपदाची धुरा डॉ. अहिरे यांच्याकडे देण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सध्या साहित्य विश्वात सुरू असलेली खळबळ आणि नियोजित संमेलनाध्यक्षपद याविषयी ‘लोकमत’ने प्रतिभा अहिरे यांची घेतलेली मुलाखत.

- विद्रोही साहित्य संमेलनामागची भूमिका काय?
दलित, वंचित, शोषित, आदिवासी, स्त्रिया अशा समूहाचे प्रतिबिंब अ. भा. साहित्य संमेलनातून उमटत नाही, तेथे आमचे प्रश्न मांडले जात नाहीत, त्या साहित्यातून आम्हाला न्याय मिळत नाही, असे वाटते. म्हणून आमचे विचार मांडण्यासाठी, आमचा स्पेस आम्हालाच निर्माण करायचा होता. म्हणूनच धारावीसारख्या झोपडपट्टीतून या विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. त्यामुळेच हे खऱ्या अर्थाने उपेक्षितांचे, वंचितांचे संमेलन आहे. येथील लोक संख्येने कमी असले तरी जिगरबाज आहेत. 

- विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका कशी असेल?
आजचे वातावरण प्रतिगामी आहे. संविधानिक मूल्य, लोकशाहीच धोक्यात आली आहे. संविधानिक मूल्य जपण्यासाठी, वंचितांचा आवाज प्रखर करण्यासाठीच माझ्याकडे हे संमेलनाध्यक्षपद आले आहे, असे मी मानते. त्या नात्यानेच मी माझी भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आमचा आवाज छोटा असला तरीही आमचे विचार आम्ही ठामपणे मांडू हे निश्चित आणि येथील अध्यक्ष हा अभिव्यक्त होणारा आहे.

- ‘सामाजिक चळवळीची आस’ हा विद्रोही साहित्याचा मूळ उद्देश कितपत यशस्वी झाला आहे?
आजवर १३ संमेलने झाली आहेत. येथे सातत्य आहे. काही अपवादात्मक व्यक्ती वगळल्या तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वंचित घटकांना सोबत घेऊन विद्रोही साहित्याची वाटचाल सुरू आहे. याउलट संख्येने कमी आणि विशेषाधिकार असणारा विशिष्ट वर्गच त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येत आहे. मग याला अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणायचे तरी कशाला? विचार मांडण्याची संधीही त्या ठिकाणी मिळत नाही. विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे वंचितांना संघटित करणारी, तमाम उपेक्षितांना जोडणारी एक शक्ती आहे, असे मी मानते. जातीअंत आणि वर्गअंताची भूमिका असणारी ही चळवळ असून, घटनेला अपेक्षित असणारी समानता निर्माण करणारी एक  प्रक्रिया आहे. 

- विद्रोही साहित्यिक कृतीमधून महापुरुषांच्या विचारांना बगल देतात, असा आरोप होतो, याबाबत काय सांगाल?
मला वाटत नाही. येथील लोक निष्ठेने जगायला लागली आहेत. येथे कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली जात नाही. कोणाकडेही मानधन मागितले जात नाही. विचारांमध्ये आणि कृतीमध्ये येथे फरक नाही. काही साहित्यिक, व्याख्याते तसे आहेत, पण समाज त्यांना नाकारत आहे. भूमिकेशी बांधील असणाऱ्या व्यक्तीचाच याठिकाणी विचार केला 
जातो. 

- विद्रोही साहित्याने काही सामाजिक बदल घडला नाही असा आरोप होतो?
हा एक सोयीस्कर वाद आहे. प्रत्येक कालखंडात विद्रोही प्रवाह आहे. आपल्या पदरात काही पाडण्यासाठी किंवा तिकडे गेल्याशिवाय आपल्या अस्तित्वावर मुद्रा उमटणार नाही असे वाटणारे हा वाद घालतात. मात्र आजचा तरुण,  वाचक अशांना चांगल्या  प्रकारे ओळखतात. या चळवळीने उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणले आहे. कोणी काही म्हटल्याने यावर परिणाम होत नाही. ही परिवर्तनाची आश्वासक लढाई आहे. यामागे जे ठामपणे उभे राहणारे असतात ते राहतातच.

- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन होत आहे? याकडे कसे पाहता?
तुम्ही शासनाच्या विरोधात बोलत असल्याची शंका आली तरी तुम्हाला जेलमध्ये टाकणार, अशी परिस्थिती आहे. कुठलीही गुन्हेगारी सिद्ध न होता जागतिक पातळीवरील नावाजलेल्या वैचारिक नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे ‘सरकारी दहशतवाद’च आहे. सर्वसामान्यांतून एकप्रकारे तुम्ही व्यक्त होऊ नका हा संदेश दिला जात आहे. विचारांचा विरोध विचाराने व्हावा, असे दमन होता कामा नये.

Web Title: Female President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan is like 'Rubber stamp': Pratibha Ahire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.