सोनपेठ येथे विद्यार्थ्यांच्या शोधात इंग्रजी शाळांचे शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:53 PM2018-05-02T17:53:22+5:302018-05-02T19:43:52+5:30

इंग्रजी शाळांचे पेव ग्रामीण भागातही पोहचले आहे़ शाळा वाढल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा लागली असून, विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत आहे़ 

English school teachers in search of students at Sonpeth | सोनपेठ येथे विद्यार्थ्यांच्या शोधात इंग्रजी शाळांचे शिक्षक

सोनपेठ येथे विद्यार्थ्यांच्या शोधात इंग्रजी शाळांचे शिक्षक

googlenewsNext

सोनपेठ (परभणी ) : इंग्रजी शाळांचे पेव ग्रामीण भागातही पोहचले आहे़ शाळा वाढल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्येच स्पर्धा लागली असून, विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत आहे़ 

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालल्याने पालकांची खाजगी शाळांकडे ओढ लागली होती़ मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांसोबत आता इंग्रजी शाळाही आल्या आहेत़ आपल्या पाल्याला स्पर्धेमध्ये टिकविण्यासाठी इंग्रजी आली पाहिजे, अशी मानसिकता पालकांमध्ये निर्माण झाली आहे़ त्यामुळे आर्थिक सक्षम असलेले पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळांमध्ये टाकत आहेत़ इंग्रजी शाळांमध्ये एका विद्यार्थ्यांमागे १५ ते २० हजार रुपये शिकवणी फिस मिळत असल्याने इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ आता तर ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा स्थापन करण्यात येत आहेत़ दोन वर्षांमध्ये इंग्रजी शाळांमध्ये स्पर्धा लागली आहे़ सोनपेठ तालुक्यातही वाडी-तांड्यापर्यंत इंग्रजी शाळा पोहचल्याने विद्यार्थी मिळविताना संस्था चालकांना कसरत करावी लागत आहे़ 

विद्यार्थ्यांकडून आपल्याला शैक्षणिक फिस कशी मिळविता येईल, यासाठी शाळेचे महत्त्व पटवून दिले जात आहे़ या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारी महिन्यापासून २५ टक्के मोफत प्रवेशाला सुरुवात झाली आहे़ अनेक पालकांनी २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत़ या प्रवेशासाठी अद्याप पूर्ण प्रक्रिया झालेली नाही़ परंतु, संस्था चालक मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळेवरील शिक्षकांनाच जुंपवित असून, प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट दिले जात आहे़ तालुक्यात पालकांशी संवाद साधताना इंग्रजी शाळेवरील शिक्षक दिसून येत आहेत़ 

पात्रताधारक  शिक्षकांचा अभाव
इंग्रजी शाळेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अपात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे़ इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आवश्यक असताना मराठी माध्यमातील शिक्षक अनेक ठिकाणी कार्यरत आहेत़ यामध्येही काही शिक्षकांनी डी़एड़्, बी़एड़ ही पदवीही घेतली नसल्याचे बोलले जात आहे़ कमी पगारात शिक्षक मिळत असल्याने संस्था चालकही याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ नर्सरी ते सिनीअर केजीसाठी १० हजारांपर्यंत शुल्क सोनपेठ तालुक्यात आकारले जात आहे़ याशिवाय पुस्तके, गणवेश, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी ठराविक दुकानांची नावे सांगितली जात आहेत़ 

Web Title: English school teachers in search of students at Sonpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.