छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का?

By संतोष हिरेमठ | Published: January 25, 2024 03:21 PM2024-01-25T15:21:21+5:302024-01-25T15:24:47+5:30

संवर्धन अन् पर्यटकांच्या प्रतीक्षेत दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू अन् पर्यटनस्थळे

Chhatrapati Sambhajinagar district has many pearls of tourism; Will anyone see? | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दडलेत पर्यटनाचे अनेक माणिकमोती; कोणी पाहणार का?

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पर्यटननगरीत दरवर्षी हजारो देश-विदेशातील पर्यटक येतात. परंतु, शहर आणि जिल्ह्यातील ५ ते ६ स्थळांपर्यंतच पर्यटक पोहोचत आहेत. यापेक्षा कितीतरी अधिक ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळांचे वैभव जिल्ह्यात आहे. दडलेली माणिकमोतीरूपी ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित झाली आहेत. संवर्धन अन् पर्यटनवाढीसाठी शासन आणि पर्यटकांची जणू प्रतीक्षाच या वास्तू करीत आहेत.

दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटनदिन साजरा करण्यात येतो. वेरुळ, अजिंठा, बीबी का मकबरा, देवगिरी (दौलताबाद) किल्ला, पाणचक्की, औरंगाबाद लेणी या ठिकाणांवरच पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतो. मात्र, याशिवाय जिल्ह्यात अनेक स्थळे आहेत. यातील काही स्थळांचा पुरातत्त्व विभागाकडून नावालाच सांभाळ केला जात आहे, तर काही स्थळे अजूनही कोणाच्या नजरेत आलेली नाहीत. घटोत्कच लेणी, रुद्रेश्वर लेणी, औरंगाबाद लेणीचा तिसरा भाग आजही दुर्लक्षितच आहे.

दौलताबाद घाटात लेणीसारख्या गुहा
दौलताबाद घाट सुरू होण्यापूर्वी केसापूर तांडा रस्त्याच्या बाजूने असलेल्या डोंगरात लेणीसारख्या गुहा आहेत. या गुहा आजही कोणाच्या नजरेत आलेल्या नाहीत.

बनी बेगम बाग
खुलताबादमध्ये बनी बेगम बाग आहे. हे सुंदर ठिकाण पर्यटकांच्या आणि संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य संरक्षित स्मारक असूनही या स्थळाविषयी माहिती देणारा फलक पर्यटकांना शोधावा लागतो.

शहराच्या रचनाकाराची कबर दुर्लक्षित
खुलताबादकडे म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुन्या छत्रपती संभाजीनगर शहराचे रचनाकार मलिक अंबर यांची कबर आहे. कबर असलेला मकबरा आणि घुमट आजघडीला काळवंडलेला आहे. ठिकठिकाणी पडझड झालेली आहे. माहिती देणारा फलकही नाही.

अब्दीमंडी परिसरातील हे स्थळ कोणी पाहिले का?
अब्दीमंडी परिसरात चार घुमट आणि एक मुख्य प्रवेशद्वार असलेले स्थळ दुर्लक्षित झालेले आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात हे स्थळ हरवले आहे. जाण्यासाठी रस्ताही नाही.

जिल्ह्यात हे ८ किल्ले माहीत आहेत?
किल्ला म्हटला की दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचे नाव निघते. मात्र, जिल्ह्यात एक-दोन नव्हे, ८ किल्ले आहेत. अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगांत हे किल्ले आहेत. अंतूर किल्ला (कन्नड, गौताळा अभयारण्य), जंजाळा किल्ला, सुतोंडा किल्ला, वेताळवाडी किल्ला, लहूगड नांद्रा, भांगसीमाता गडकिल्ला आणि लोंझा किल्ला जिल्ह्यात आहे.

पर्यटनवाढीसाठी प्रयत्न
पर्यटनवाढीसाठी पर्यटन संचालनालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ३० कृषी पर्यटन केंद्रेही सुरू आहेत.
- विजय जाधव, उपसंचालक, प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालय

विविध उपक्रम हवेत
पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. फिल्म टूरिझम, स्पोर्ट्स टूरिझम, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन यांनाही चालना मिळाली पाहिजे.
- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टूरिझम विकास संघटना

दुर्लक्षित लेणी
सिल्लोड तालुक्यातील घटोत्कच लेणी ही दुर्लक्षित बौद्ध लेणी आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ता नाही. अनेक अभ्यासक या लेणीचा अभ्यास करण्यासाठी येतात, पण रस्ता नसल्याने खूप त्रास सहन करावा लागतो. खुलताबाद येथे मलिक अंबर यांच्या कबरीचे सुशोभीकरण केले पाहिजे. शहरातील खंडोबा मंदिरही अनेक लोकांना माहिती नाही.
- डॉ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

पर्यटननगरीत किती पर्यटक भेट देतात?

बीबी का मकबरा
कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
२०१९ ते २० - ११,१३,४५२-९,५४०
२०२० ते २१ - १,८०,१४८-४८
२०२१ ते २२ - ३,४६,५७८-३३७
२०२२ ते २३ - ११,६१,८०२-४,७१४
२०२३ ते डिसेंबर २०२३- १२,५१,९२६-४२११

वेरूळ लेणी
कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
२०१९ ते २०- १२,५५,८६५-२१,४०७
२०२० ते २१- १,२०,२८३-८२
२०२१ ते २२- ३,४८,३४९-६०५
२०२२ ते २३- १४,१५,८२८-१०,७४४
२०२३ ते डिसेंबर २०२३ -१२,५१,४७३-८९३३

अजिंठा लेणी
कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
२०१९ ते २०- २,७३,३४४-१५,८९८
२०२० ते २१- ४०,१८७-५५
२०२१ ते २२- १,१४,९१७-४०९
२०२२ ते २३- ३,९३,९२८-६,९६७
२०२३ ते डिसेंबर २०२३- ३,२१,१९०-६७८८

देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला)
कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
२०१९ ते २०- ४,६५,१६८-४,१७३
२०२० ते २१- ९३,३९०-४७
२०२१ ते २२- १,७९,५१२-१६६
२०२२ ते २३- ९,८३,८११-४,१२३
२०२३ ते डिसेंबर २०२३-३,८८,३१७-१७९५

औरंगाबाद लेणी
कालावधी- भारतीय पर्यटक- परदेशी पर्यटक
२०१९ ते २० - १,२७,६६४-१,६५५
२०२० ते २१ - ३०,६०८-४
२०२१ ते २२ - ६२,१८१-६०
२०२२ ते २३ - १,१२,५७८-७०२
२०२३ ते डिसेंबर २०२३-९५,९६५-९१५

Web Title: Chhatrapati Sambhajinagar district has many pearls of tourism; Will anyone see?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.