अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 05:11 PM2022-01-28T17:11:44+5:302022-01-28T17:12:25+5:30

मराठवाड्यात झालेले विकास आंदोलन, दलित शिष्यवृत्ती आंदोलन, विद्यापीठ नामांतर आंदोलनात अनिल अवचट यांचा सक्रिय सहभाग राहिला.

Backlog to university renaming movement; Anil Avchat's close relationship with Marathwada | अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते

अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते

googlenewsNext

औरंगाबाद : हरहुन्नरी लेखक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते होते. ते युक्रांदचे कार्यकर्ते होते. त्या काळात युक्रांदची चळवळ महत्त्वाची होती. मराठवाड्यात झालेले विकास आंदोलन, दलित शिष्यवृत्ती आंदोलन, विद्यापीठ नामांतर आंदोलनात अनिल अवचट यांचा सक्रिय सहभाग राहिला.

अनिल अवचट हे युक्रांदच्या पहिल्या फळीचे कार्यकर्ते. औरंगाबादचे डॉ. कांगो यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध. अनिल अवचट यांनी आपल्या आयुष्यात अनेक प्रयोग केले. स्वत:च्या मुलाला त्यांनी मनपा शाळेत घातले होते. मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली होती. साहित्य क्षेत्रातील त्यांची कामगिरी मोलाची असून मराठवाड्याशी त्यांनी घट्ट नाते जोडले होते, त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी झाली आहे, अशा शब्दांत कॉ. भालचंद्र कांगो यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

बासरी वाजवली होती......
अनंत भालेराव यांच्या नावाचा साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा पुरस्कार २००८ साली अनिल अवचट यांना तापडिया नाट्य मंदिरात प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भाषणाआधी सुरेख बासरीवादन करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली होती.

आज शोकसभा...
अवचट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्र सेवा दल, औरंगाबाद तर्फे दि.२८ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जेएनईसीच्या आर्यभट्ट भवनात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी कळवले आहे.

चळवळीतील शिलेदार हरपला..
अत्यंत शांत स्वभावाचा, सखोल विचार व चिंतन करणारा, जन्मजात कलाकार, लिखाणात स्वतः ची शैली असलेल्या अवचट यांचे अचानक जाणे चटका लावणारे आहे. युवक क्रांती दलापासूनचा आमचा हा साथी औरंगाबादला सुरू झालेल्या दलित शिष्यवृत्ती वाढ आंदोलनात सहभागी झाला, डॉक्टर झाल्यावर डॉ. बाबा आढावांच्या दवाखान्यात हमाल कष्टकऱ्यांच्या सेवेत रुजू झाला, वैद्यकीय सेवा सुरू असतानाच समाजातील अपेक्षित - दुर्लक्षित देवदासींचे प्रश्न समजून घेऊन समाजासमोर मांडले. बाबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली एक गाव एक पाणवठा चळवळ असो, बिहार मधील दुष्काळ वा भ्रष्टाचारविरोधी आंदोलन असो, नामांतराचा लढा असो वा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो, तो सर्व चळवळीत राहिला, त्यावर लिखाण केले, अशी प्रतिक्रिया हमाल मापाड्यांचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी व्यक्त केली.

Web Title: Backlog to university renaming movement; Anil Avchat's close relationship with Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.