कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:12 PM2018-10-04T18:12:10+5:302018-10-04T18:19:04+5:30

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

In Aurangabad, garbage was found in the streets | कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ५० हून अधिक वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र यातील काही वॉर्डांची पाहणी केली असता, गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील समतानगर, भाग्यनगर, जयविश्वभारती, सिल्लेखाना, पैठण गेट, गांधीनगर, दलालवाडी वॉर्डातील कचऱ्याच्या स्थितीचा आढावा ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला असता यातील बहुतांश वॉर्डांतील गल्लीबोळांमध्ये कचरा आढळून आला नाही. अनेक छोट्या रस्त्यांवर महिनाभरापूर्वी असणारा कचरा उचलण्यात आला आहे.

तसेच काही वॉर्डांत एक दिवसाला तर काही ठिकाणी दोन दिवसाला कचऱ्याची गाडी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मात्र वॉर्डातील संकलन केलेला कचरा विघटनासाठी कोठेही घेऊन न जाता थेट त्या वॉर्डांच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक जागेच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला टाकल्याचे प्रत्येक वॉर्डात आढळून आले. या प्रकाराविषयी नागरिकांना विचारले असता, बहुतांश जणांनी अगोदर गल्लीत असणारा कचरा किमान रहदारीच्या घरांपासून थोडा फार दूर गेला. याचेही समाधान असल्याचे सांगितले. मात्र रस्त्यांवरून जाता-येता या साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असहाय असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

 

कचराच कचरा : 
सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर,  मुकुंदवाडीत सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचऱ्याची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले. 

आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचऱ्याचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाऱ्या गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली. 

ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे अस्वच्छता पसरवीत आहेत. 

संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाऱ्यांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली . मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविले.  

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग
कचरामुक्त वॉर्ड झाल्याचा गवगवा करीत २ आॅक्टोबर रोजी पालिकेने सन्मान सोहळा उरकला असला तरी ५० टक्के वॉर्डांत कचऱ्याची समस्या अजून पूर्णपणे संपलेली नाही. वॉर्डातून उचललेला कचरा त्याच परिसरात कुठेतरी साचविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. कचरा जाळणे, बॅगांमध्ये भरून रस्त्याच्या बाजूला ठेवणे, दुभाजकांत आणून टाकण्याचा प्रकार काही वॉर्डांत सुरूच आहे. 

Web Title: In Aurangabad, garbage was found in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.