छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का?

By मुजीब देवणीकर | Published: January 25, 2024 02:46 PM2024-01-25T14:46:17+5:302024-01-25T14:50:02+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवघ्या दहा महिन्यांत काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले. अजूनही ३०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले आहे.

Announcement of water every two days from February 15 in Chhatrapati Sambhajinagar; Will there be abundant water? | छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का?

छत्रपती संभाजीनगरात १५ फेब्रुवारीपासून २ दिवसाआड पाण्याची घोषणा; मुबलक पाणी येणार का?

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यापूर्वी शहराला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. राजकीय नेत्यांसह महापालिकेनेही १५ फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसाआड पाणी मिळेल अशी घोषणा केली. त्यानुसार आता फक्त २२ दिवस शिल्लक आहेत. पंपिंग स्टेशन, क्रॉस कनेक्शन, जलशुद्धीकरण केंद्र आदी कामे पूर्ण झाली का? यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला विलंब होतोय. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक आहे. पाणी प्रश्नाचे चटके सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला बसतील अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे तातडीने २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवघ्या दहा महिन्यांत काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले. अजूनही ३०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले आहे. बिडकीन येथे एका मंदिराचा अडथळा निर्माण होताेय. ठिकठिकाणी क्रॉस कनेक्शनची काम शिल्लक आहेत. फारोळा जलशुद्धीकरण केंद्र उभारणीला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही सर्व कामे होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खूप लवकर कामे केल्यास १ मार्चपर्यंत शहरात मुबलक पाणी येऊ शकते. पुढील २५ दिवसांत टेस्टिंग होण्याची शक्यताही कमीच आहे.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्र
सध्या वापरात असलेल्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १८५ एमएलडीपर्यंत आहे. सध्या १२० एमएलडी पाणी शुद्ध केले जात आहे. नवीन जलवाहिनीतून ५५ एमएलडी पाणी येईल. १७५ एमएलडी पाणी शहरात आणले जाणार आहे. याच ठिकाणी आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. ते नियोजित वेळेत होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जुन्या केंद्राचाच आधार घ्यावा लागेल.

नवीन पंपिंग स्टेशन उभारणी सुरू
जायकवाडी महापालिकेने १९७२ मध्ये पंपिंग स्टेशन उभारले. त्याच ठिकाणी नवीन मोठ्या अश्वशक्तीचे पंप बसविणे शक्य नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपसा केंद्र आहे, त्याच्या खालील बाजूला शेड उभारून पंपिंग स्टेशन केंद्र उभारले जात आहे. येथे ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप बसविले जातील. एक पंप स्टँडबाय असणार आहे. किर्लोस्कर कंपनीकडून खास एवढ्या मोठ्या अश्वशक्तीचे पंप बनवून घेण्यात आले आहेत.

दोनच जलकुंभ मनपाच्या ताब्यात
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेला आतापर्यंत दोनच जलकुंभ मनपाच्या ताब्यात दिले आहेत. पहिले पहाडसिंगपुरा आणि दुसरे टीव्ही सेंटर आहे. खूप घाई केली तर हिमायतबाग येथील जलकुंभ मार्चमध्ये टेस्टिंगनंतर मिळेल.

वेळेत पाणी येईलच...
१५ फेब्रुवारीपूर्वी शहरात पाणी आलेच पाहिजे अशा पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा काम करीत आहे. छोटे-छोटे अडथळेही दूर होतील. ३० जानेवारीला टेस्टिंग घेण्यासंदर्भात आम्ही काम करीत आहोत. डेडलाइन टळणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

Web Title: Announcement of water every two days from February 15 in Chhatrapati Sambhajinagar; Will there be abundant water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.