शाळा वाऱ्यावर सोडून दोन महिन्यांपासून २०० गुरुजी गायब; औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:58 PM2018-08-03T16:58:45+5:302018-08-03T17:01:35+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास २०० शिक्षक हे अद्यापही शाळांवर रुजू झालेले नाहीत.

200 Guruji disappeared from school for two months; happens in Aurangabad district | शाळा वाऱ्यावर सोडून दोन महिन्यांपासून २०० गुरुजी गायब; औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकार 

शाळा वाऱ्यावर सोडून दोन महिन्यांपासून २०० गुरुजी गायब; औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकार 

googlenewsNext
ठळक मुद्दे वैद्यकीय रजा देऊन हे शिक्षक गायब झाले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिली. रुजू करून न घेता अगोदर मेडिकल बोर्डाकडे पाठविण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास २०० शिक्षक हे अद्यापही शाळांवर रुजू झालेले नाहीत. वैद्यकीय रजा देऊन हे शिक्षक गायब झाले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनीशिक्षण समितीच्या बैठकीत दिली. तथापि, हे शिक्षक रुजू होण्यासाठी जेव्हा केव्हा शाळेवर येतील, तेव्हा त्यांना रुजू करून न घेता अगोदर मेडिकल बोर्डाकडे पाठविण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. 

यंदा नवीन धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरावरून बदल्या करण्यात आल्या. २९ मे रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमुळे पहिल्या टप्प्यात ५२७ शिक्षक विस्थापित झाले. त्यामुळे ग्रामविकास विभागाने विस्थापित शिक्षकांना पुन्हा शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी संवर्ग-५ द्वारे आॅनलाईन नोंदणीची संधी दिली. नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी दुसऱ्या टप्प्यात ३६३ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. त्यानंतर १६ जून रोजी उर्वरित १६४ पैकी १५९ शिक्षकांना शाळांच्या गरजेनुसार राज्यस्तरीय बदली कक्षाकडून पदस्थापना देण्यात आल्या. 

या बदली प्रक्रियेत राज्यस्तरीय बदली कक्षाकडून झालेल्या बदल्या काही शिक्षकांच्या सोयीच्या नव्हत्या, तर काही पती-पत्नी शिक्षकांना दीडशे-दोनशे किलोमीटर अंतर असलेल्या शाळा मिळाल्या. दरम्यान, बदली आदेश निर्गमित केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिक्षकांना कार्यमुक्त करावे व शिक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश ग्रामविकास विभागाचे होते. या आदेशाला न जुमानता बदली प्रक्रियेत विभक्त झालेले पती-पत्नी शिक्षक तसेच एकल महिला शिक्षकांनी रजा टाकून घरी बसणे पसंत केले.

जिल्ह्यातील जवळपास २०० शिक्षक दोन महिन्यांपासून पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे रजा देऊन निघून गेलेले आहेत. दुसरीकडे, बदली झाल्यामुळे अगोदरचे शिक्षक निघून गेले, तर बदलीने येणारे नवीन शिक्षक शाळेत आलेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक शाळा- वस्तीशाळांची आहे. शाळेवर शिक्षक नसल्याच्या तक्रारी अनेक सदस्य, पालक, सरपंचांनी शिक्षण सभापती मीना शेळके यांच्याकडे केल्यामुळे समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. तेव्हा गायब शिक्षक जेव्हा केव्हा शाळेवर येतील तेव्हा त्यांना मेडिकल बोर्डाकडे पाठविण्याचे आदेश सभापती शेळके यांनी दिले. 

सखोल चौकशीनंतरच निर्णय
मेडिकल बोर्डाच्या अभिप्रायानुसारच गायब शिक्षकांना रूजू करून घेतले जाईल, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी सूरजप्रकाश जैस्वाल यांनी समितीच्या बैठकीत दिली. शिक्षण समितीच्या या निर्णयामुळे मात्र, गायब शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. दोन महिन्यांपासून रजेवर असलेल्या शिक्षकांना कोणता आजार आहे. या आजारावर त्यांनी कुठे उपचार घेतले. आजार एवढा गंभीर असेल, तर त्यांनी यापूर्वी त्याबाबतची पूर्वकल्पना शिक्षण विभागाला दिली होती का, या सर्व बाबी तपासण्याच्या सूचनाही शिक्षण सभापती मीना शेळके यांनी दिले आहेत. 

Web Title: 200 Guruji disappeared from school for two months; happens in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.