पत्रकाराच्या घरातून पळविली १ लाख ९० हजाराची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:44 PM2019-04-24T18:44:00+5:302019-04-24T18:44:35+5:30

उकाड्यामुळे गॅलरीकडील दार उघडे होते

1 lakh 90 thousand cash stolen from the house of the journalist | पत्रकाराच्या घरातून पळविली १ लाख ९० हजाराची रोकड

पत्रकाराच्या घरातून पळविली १ लाख ९० हजाराची रोकड

googlenewsNext

औरंगाबाद: पुंडलिकनगर परिसरातील गजानननगर येथील रहिवासी पत्रकार विनोद शंकरराव काकडे यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी १ लाख ९० हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री अडिच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, विनोद काकडे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या वरच्या मजल्यावरील घरी झोपले. पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये त्यांचे वडिल आणि मुले झोपले होते तर हॉलशेजारच्या खोलीत त्यांची वृद्ध आई झोपली होती. उन्हाळ्यामुळे उकाडा असह्य होत असल्याने त्यांच्या आईने गॅलरीकडील दार लोटले होते. आई झोपलेल्या खोलीतच त्यांनी रोख रक्कम असलेली लोखंडी पेटी छोटी कुलूप लावून ठेवलेली होती. खोलीचे दार उघडे असल्याचे गल्लीतून स्पष्टपणे दिसत होते. 

गॅलरीशेजारीच जाईची वेल आणि सिताफळाचे जुने झाड आहे. चोरट्याने  या झाड आणि वेलीच्या मदतीने गॅलरीत प्रवेश केला. पेटीतील लेदरच्या बॅगेत काकडे यांनी नुकतेच बँकेतील फिक्स ठेव मोडून रोख रक्कम आणून ठेवली होती.  चोरट्यांनी खोलीत जाऊन लोखंडी पेटीचे कुलूप तोडले. यानंतरही पेटी सहज उघडत नसल्याने चोरट्याने पेटीचा एक भाग वर करून हात घातला आणि आतील लेदरची काळी बॅग बाहेर ओढली. या बॅगेत सुमारे सहा लाखाची रोकड होती. यापैकी १ लाख ९० हजार रुपयांचे बंडल काढण्यात चोरट्याला यश आले. 

यावेळी खडखड झाल्याने काकडे यांच्या आईला जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरटा १ लाख ९० हजार रुपये घेऊन गॅलरीतून उडी मारून साथीदारांसह पळून गेला. याघटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना कळविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक काळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.

Web Title: 1 lakh 90 thousand cash stolen from the house of the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.