आजपासून ‘स्कूल चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:09 PM2018-06-25T23:09:14+5:302018-06-25T23:09:53+5:30

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

From today on 'School Chale Hum' | आजपासून ‘स्कूल चले हम’

आजपासून ‘स्कूल चले हम’

googlenewsNext
ठळक मुद्देआज वाजणार शाळेची घंटा : गुलाब पुष्प व पुस्तके देऊन स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
मार्च महिन्यात परीक्षा आटोपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या देण्यात आल्या. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्यानंतर आता पुन्हा शाळांची घंटा वाजणार आहे. शाळेची मजा औरच.. त्यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. शाळांमध्ये येणाऱ्या नवागतांचे व इतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा व्यवस्थापनाने विशिष्ट नियोजन केले आहे. नर्सरी, केजीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन वेल-कम केले जाणार आहे. तर अनेक ठिकाणी छोटेखानी

कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचे कौतुक केले जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठपुस्तके व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली आहेत.

चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या
कॉन्व्हेंटच्या युगात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या टिकविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. सध्या चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २५ हजार ११० एवढी विद्यार्थीसंख्या आहे. सर्वात कमी चार हजार ५४६ विद्यार्थी पोंभूर्णा तालुक्यात आहेत. याशिवाय भद्रावती तालुक्यात १५ हजार ४८५, वरोरा तालुक्यात १५ हजार ४८४, चिमूर तालुक्यात १६ हजार १३४, ब्रह्मपुरी तालुक्यात १५ हजार ९६२, नागभीड तालुक्यात १३ हजार ७८४, सिंदेवाही तालुक्यात ११ हजार ३३८, मूल तालुक्यात ११ हजार ६४७, सावली तालुक्यात १० हजार ८३१, गोंडपिपरी तालुक्यात आठ हजार ६२७, बल्लारपूर तालुक्यात सात हजार ३८४, राजुरा तालुक्यात ११ हजार ७६९, कोरपना तालुक्यात ११ हजार ४८७ तर जिवती तालुक्यात नऊ हजार १८३ अशी विद्यार्थीसंख्या आहेत.
गणवेशाचा निधीच मिळाला नाही
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना थेट गणवेश न देता त्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम देण्याची योजना राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षापासून सुरू केली़ मात्र अद्यापही समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला गणवेशासाठीचे चार कोटी ९२ लाखांचे अनुदान अद्याप मिळाले नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा भुर्दंड तुर्तास गोरगरीब पालकांवर बसणार आहे.
शिक्षकांच्या गृहभेटी
२६ जूनपासून शाळा सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती रहावी म्हणून जिल्ह्यातील अनेक गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंदानी आज सोमवारी गावात घरोघरी जावून पालकांच्या व विद्यार्थ्याच्या भेटी घेतल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, अशी विनंती पालकांना करण्यात आली. याला पालकांकडून प्रतिसादही मिळत आहे.
बालभारती व गणिताचे पुस्तक नाही
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून बालभारती व गणित विषयांची पुस्तके वगळून इतर सर्व पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. त्यामुळे २६ जूनला विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके देण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असला तरी बालभारती व गणिताचे पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नाही आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७२६ विद्यार्थ्यांना ९ लाख ९१ हजार पाठ्यपुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: From today on 'School Chale Hum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.