आजपासून ‘स्कूल चले हम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:45 AM2019-06-26T00:45:45+5:302019-06-26T00:46:08+5:30

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनीही नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

From today, 'School Chale Hum' | आजपासून ‘स्कूल चले हम’

आजपासून ‘स्कूल चले हम’

googlenewsNext
ठळक मुद्देआज वाजणार शाळेची घंटा : गुलाबपुष्प व पुस्तके देऊन होणार स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनीही नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
मार्च महिन्यात परीक्षा आटोपल्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या देण्यात आल्या. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्यानंतर आता पुन्हा शाळांची घंटा वाजणार आहे. शाळेची मजा औरच. त्यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. शाळांमध्ये येणाऱ्या नवागतांचे व इतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा व्यवस्थापनाने विशिष्ट नियोजन केले आहे. नर्सरी, केजीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन वेल-कम केले जाणार आहे. तर अनेक ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचे कौतुक केले जाणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठपुस्तके व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पाठ्यपुस्तके पाठविण्यात आली आहेत. याशिवाय शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी व शाळेच्या प्रारंभाच्या दिवशी विशेष उपक्रम राबविण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप समग्र शिक्षा व शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये, याकरिता वर्ग १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता राज्य शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ रोजी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी दिली. इयत्ता १ ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके देण्यात येणार असून शाळेतील सर्व दाखल पात्र मुलांची शंभर उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत ही योजना शासनाने सुरू केली आहे. यासाठी मराठी, हिंदी, तेलगू, उर्दू व बंगाली माध्यमाच्या एक लाख ७९ हजार ७३९ विद्यार्थ्यांकरिता तर बालभारतीकडे दहा लाख सात हजार ७४५ पाठयपुस्तकांची आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
जि.प. शाळांमध्ये एक लाख दहा हजार विद्यार्थी
कॉन्व्हेंटच्या युगात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या टिकविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण एक हजार ५८६ शाळा आहेत. या शाळांमधून एक लाख दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संवर्ग-१ चे ३६ अधिकारी ३६ शाळांना भेटी देणार
प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत. यात जि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव, मारडा (मोठा), सिनाडा, ढोरवासा, मांगली, आमडी, नांदगाव पोडे, मालडोंगरी, ब्रह्मपुरी क्रं. ४, मारडा, आनंदवन, लिखितवाडा, भंगाराम तळोधी, धानोरा, पंचाळा, दिघोरी, घाटकुळ, मूल, ताडाळा, मुंळाडा, नलसेनी पेठगाव, व्याहाड खुर्द, सरडपार, मेंढामाल, सिंदेवाही नं. २, चिखलपरसोडी, मेंढामाल, मानली, आंबेनेरी, बोथली, उपरवाही, वनसळी, पिंपळगाव, पालडोह, शेणगाव, खिचल (बू.) या शाळांचा समावेश आहे.
कन्या प्रवेशोत्सव साजरा होणार
शाळेतील मुलीच्या प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी व शंभर टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी शाळांमध्ये कन्या प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत शिक्षक आपल्या भागातील मुलीला स्वत: शाळेत घेऊन जातील व तिची शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतील. त्यानंतर मुलींचा सत्कारही केला जाणार आहे.

Web Title: From today, 'School Chale Hum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.