शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलानेच रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव 

By परिमल डोहणे | Published: September 28, 2022 08:00 PM2022-09-28T20:00:26+5:302022-09-28T20:00:55+5:30

शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा डाव रचला. 

To avoid going to school, the boy hatched a plan to kidnap himself | शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलानेच रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव 

शाळेत जाणे टाळण्यासाठी मुलानेच रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव 

Next

चंद्रपूर : शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता. वडिलाने मोबाइल हिसकावून शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, त्याला शाळेत जायचेच नव्हते. त्यामुळे त्याने थेट स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून आपण कसे सुटलो, अशी माहिती त्याने कुटुंबीयासह पोलिसांना दिली. अचानक घडलेल्या या घटनेने सारेच अचंबित झाले. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा बिंग फुटले. चित्रपटात शोभावा असा प्रकार बुधवारी चंद्रपुरात शहर पोलिसांनी उघडकीस आणला.

चंद्रपूर येथील एका १३ वर्षीय मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याचे मोठे वेड आहे. तो तासनतास मोबाइलच गेम खेळत असतो. सोमवारी तो मोबाइलवर गेम खेळण्यात इतका गुंग झाला की, शाळेची वेळ केव्हा झाली, हे त्याला कळलेच नाही. शाळेची वेळ होऊनही मुलगा मोबाइलच बघत असल्याचे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेत त्याला शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, मुलाला शाळेत जायचेच नसल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. तो स्कूल बॅग घेऊन शाळेकडे निघाला. काही अंतरावर शेजारी नागरिक उभे होते. तेव्हा त्याच्या शर्टाचे बटण तुटलेले होते. तेव्हा नागरिकांनी त्याला विचारले असता त्याने आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. 

अपहरणकर्त्याने आपल्याला पेढा खायला दिला. मात्र, तो खाण्यास नकार दिला. एवढ्यात तोंडावर रुमाल ठेवून नेत असताना कशीबशी आपली सुटका केल्याचे त्याने सांगितले. ही घटना गंभीर असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन बोलावून घेतले. कुटुंबीयांनी त्याला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांचीही तारांबळ उडाली. एपीआय जयप्रकाश निर्मल यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. काहीच गवसले नाही म्हणून सीसीटीव्ही तपासले. यातही घटना उघडकीस न आल्याने पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता शाळेत जायचे नसल्याने असा बनाव रचल्याचे मान्य केले. या प्रकारामुळे पोलिसांसह कुटुंबीयही चक्रावून गेले.
कोट

टिव्ही व मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोक्यात अशा कल्पना येत आहेत. त्यामुळे आपला मुलगा मोबाईलवर काय करत असतो. याबाबत पालकाने सतर्क असणे गरजेचे आहे. मुलाला मोबाईलपासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगत विशिष्ट वेळेतच मोबाईल हाताळू द्यावा, असे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी म्हटले. 


 

Web Title: To avoid going to school, the boy hatched a plan to kidnap himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.