मूलमध्ये पतंजली चिकित्सालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:16 PM2018-02-22T23:16:24+5:302018-02-22T23:16:55+5:30

मानवी जीवनात योगा करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच योगाचा प्रसार, प्रचार तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी आणि उत्तम औषधोपचारासाठी मूलमध्ये पतंजलीचे चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली.

Originally Patanjali Hospital | मूलमध्ये पतंजली चिकित्सालय

मूलमध्ये पतंजली चिकित्सालय

googlenewsNext
ठळक मुद्देरामदेव बाबाची घोषणा : तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराचा समारोप

ऑनलाईन लोकमत
मूल : मानवी जीवनात योगा करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच योगाचा प्रसार, प्रचार तसेच विविध व्याधींवर मात करण्यासाठी आणि उत्तम औषधोपचारासाठी मूलमध्ये पतंजलीचे चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या योग चिकित्सा व ध्यान शिबिराचा गुरूवारी योग संकल्पाने समारोप झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आणि पतंजली योग समिती व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन मूल येथे करण्यात आले होते. गुरूवारी तिसºया दिवसीही योगगुरू रामदेवबाबा यांच्या योगासनांचा लाभ घेण्यासाठी असंख्य नागरिक उपस्थित होते.
योगा अभ्यासाचे धडे देताना रामदेवबाबानी मानवी जीवनातील योगाचे फायदे सांगितले. ‘करो योग, रहो निरोग’ हा मूलमंत्र त्यांनी शिबिरार्थ्यांमध्ये रुजविला. पतंजलीच्या माध्यमातून तरुणाईमध्ये देशाभिमान जागृत झाला पाहिजे. त्यासाठी अग्रक्रमाने स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद वाढली पाहिजे, असे सांगत प्राणायमाने शारीरिक, मानसिक बौद्धीक विकासात वाढ होते. यातून प्राप्त झालेली दिव्य उर्जा मानव जातीच्या उद्धारासाठी खर्ची घालावी, अशी भावनीक साद त्यांनी नागरिकांना घातली. ब्रम्हांड आणि जीवनाचा सार सांगताना त्यांनी सर्व जाती महान आणि समान असून प्रत्येकात महामानव दडलेला असल्याचे सांगितले.
समारोपीय शिबिराची सुरुवात पहाटे पाच वाजता ओमच्या उच्चाराने झाली. कर्मवीर मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहातही पतंजली योग समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय शिबिराला आ. देवराव होळी, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, पतंजलीचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयदीप आर्य, डॉ. विष्णू भूतडा, महापौर अंजली घोटेकर, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, अजय गोगूलवार, चंद्रकांत आष्टनकर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
एक हजार योग शिक्षक तयार करणार - सुधीर मुनगंटीवार
तीन दिवसीय योग शिबिराचा लाभ घेतल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांचे आभार मानले. योगाबरोबर राष्ट्रभक्तीचा संदेश सर्वदूर पोहचविण्यासाठी पतंजलीच्या माध्यमातून एक हजार योग शिक्षक तयार करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांना बांबूपासून बनविलेली तलवार, समई आणि गदा भेट देवून त्यांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘न भूतो न भविष्यती’ योग शिबिर
मूल येथील योग शिबिर न भूतो न भविष्यती असेच ठरले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग गुरु स्वामी रामदेवबाबा गेल्या चार दिवसांपासून मूलमध्ये अजय गोगूलवार यांच्या घरी वास्तव्याला होते. मूल वासीयांच्या तोंडी योग, प्राणायम आणि रामदेवबाबा एवढेच शब्द होते. पहाटे चार वाजतापासूनच पाऊले क्रीडांगणांच्या दिशेने वळत होती. विशाल जनसमुदायाने प्रत्यक्षात रामदेवबाबाची विविध योगासने याची देही, याची डोळा अनुभवली. तीन दिवसीय योग शिबिराला भरभरुन प्रतिसाद देताना येथील नि:शुल्क योग चिकित्सेचा सुद्धा अनेकांनी लाभ घेतला. शांततामय आणि संगीतमय वातावरणात शिबिरार्थ्यांनी योगाभ्यासाचे धडे घेतले. रामदेव बाबा यांना झेड सुरक्षा असल्याने शिबिरादरम्यान मूलमध्ये पोलीस बंदोबस्त चोख होता. दंगा नियंत्रण पथकाची दोन वाहने, खाजगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मूलवासीयांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल समारोपीय शिबिरात ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांप्रती आणि रामदेवबाबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे प्रेम रामदेवबाबाना चिरकाल टिकेल. साधी उचकी आली तरी मूल वासीयांनी आठवण काढली, असे बाबानी समजावे असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याला उत्तर देताना रामदेवबाबानी आपण मूलला कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे मला प्रत्येक वेळा येणारी उचकी ही फक्त मूल वासीयांच्या प्रेमाचीच असेल असे सांगून तीन दिवसीय योग चिकित्सा व ध्यान शिबिराचा निरोप घेतला.

Web Title: Originally Patanjali Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.