एटीएम क्रमांक व पासवर्ड सहाय्याने आॅनलाईन फसवणूक करणारा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:20 PM2017-11-01T13:20:26+5:302017-11-01T13:27:22+5:30

Online fraud cheats by using ATM number and password | एटीएम क्रमांक व पासवर्ड सहाय्याने आॅनलाईन फसवणूक करणारा जाळ्यात

एटीएम क्रमांक व पासवर्ड सहाय्याने आॅनलाईन फसवणूक करणारा जाळ्यात

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील तरुणांची टोळी देशात सक्रीयदर तीन महिन्यांनी पीन बदलण्याची गरज


आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : एटीएम क्रमांक व पासवर्डच्या आधारे आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात चंद्रपूर सायबर सेलच्या पथकाला यश आले आहे. ही टोळी उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर उघडकीस आलेले हे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याची अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर ठाण्यात त्रिरत्ना नारायण मेश्राम रा. नगीनाबाग या महिलेने बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून १५ हजार ९४५ रुपये लंपास झाल्याची तक्रार केली होती. भ्रमणध्वनीवरून पासवर्ड विचारून फसवणुकीचा प्रकार नसल्याने पोलिसांनाही तपास करणे अडचणीचे होते. मात्र सायबर सेलकडे प्रकरण वळते केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुंढे व त्यांच्या पथकाने सदर खात्यातून झालेल्या व्यवहाराचे तांत्रिक विश्लेषण करून पुरावे गोळा केले. यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील अनुपार मठिया येथील असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने उत्तर प्रदेशातील मुमदाबाद पोलिसांच्या सहकाऱ्याने टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. चंद्रपूरात या प्रकारचे तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी झोप उडाली होती.
अशी होते पासवर्डची चोरी
अनुपार मठिया येथील तरुणांची टोळी देशात नातेवाईक असलेल्या गावांमध्ये जावून एक ते दीड महिना मुक्काम करतात. यानंतर त्या परिसरातील एटीएमवर जाऊन एटीएमधारक पैसे काढण्यासाठी आल्यानंतर मोठ्या शिताफीने एटीएमचा १६ अंकी क्रमांक, एक्सपायरी डेट, नाव व पासवर्ड मिळवितात. त्यानंतर आपल्या गावाला परत गेल्यानंतर त्या आधारे ग्राहकाच्या खात्यातून आॅनलाईन खरेदी वा रक्कम गहाळ करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. अशा प्रकारचा हा पहिला गुन्हा महाराष्ट्रात निष्पन्न झाला असल्याचे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले.

दर तीन महिन्यांनी पीन बदलण्याची गरज
बँक व्यवहार, एटीएम व्यवहार, आॅनलाईन शॉपिंग, दुकानातील स्वाईप कार्ड शॉपिंग, करताना काळजीपूर्वक व्यवहार करावा. तसेच फोनद्वारे कोणालाही एटीएमचा १६ अंकी क्रमांक, सीवीवी क्रमांक आणि नंतर ओटीपी देण्यात येऊ नये. एटीएम कार्डचे पासवर्ड बदलले नसेल तर त्वरीत बदलावे. तसेच तीन महिन्यांनी हे पीन बदलत राहावे, तसेच एमटीएमचा वापर करतानाही आपली माहिती कोणाला दिसू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी पोलीस अधीक्षक ठाकर यांनी केले.

Web Title: Online fraud cheats by using ATM number and password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा