जिल्ह्यात कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:00 AM2017-12-12T00:00:12+5:302017-12-12T00:00:33+5:30

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेल्या विदर्भ बंदला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद मिळाला.

Kadakadit in the district | जिल्ह्यात कडकडीत

जिल्ह्यात कडकडीत

Next
ठळक मुद्देविदर्भ राज्य करा : चंद्रपुरात बंदला अल्प प्रतिसाद

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेल्या विदर्भ बंदला चंद्रपुरात अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.
चंद्रपुरात आज सकाळपासूनच बंदला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास विदर्भवाद्यांनी शहरात रस्त्यांवर फिरून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गावरील काही दुकाने त्यानंतर बंद करण्यात आली. मात्र याची भनक पोलिसांना लागताच पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. रामनगर, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, गिरनार चौक, गांधी चौक या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विदर्भवादी कार्यकर्ते येताच त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जात होते.
वरोºयात विदर्भवाद्यांनी सकाळपासूनच रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, निखील मत्ते, समीर बारई, जयंत टेमुर्डे, अ‍ॅड. शरद कारेकार आदी सहभागी झाले होते.
राजुºयात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकरी संघटनेचे प्रा. अनिल ठाकुरवार, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, नगरसेवक भाऊजी कन्नाके, मधुकर चिंचोळकर, घनश्याम हिंगाने, राजु धोटे, अ‍ॅड. अरुण धोटे, प्रशांत माणुसमारे, असद कुरेशी, दिनकर डोहे, सुनिल सोमलकर आदींनी व्यवसायिकांना बंद पाळण्याची विनंती केली.
मूलमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष कवडू येनप्रडीवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य संजय पाटील मारकवार, बाजार समितीचे संचालक राकेश रत्नावार, गंगाधर कुनघाडकर, संदीप कारमवार आंदोलनात सहभागी झाले होते.
ब्रह्मपुरी येथे कडकडीत बंद पाडून शिवाजी चौक येथे डॉ. डी. एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली. यात अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, हरिश्चंद्र चोले, सुखदेव प्रधान, अ‍ॅड. हेमंत उरकुडे, विनायक रामटेके, सुधा राऊत यांनी मार्गदर्शन केले.
जीवतीसह संपुर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात आला. या आंदोलनाला भाजपा सोडून सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग दर्शविला.
पोंभूर्णा येथे कडकडीत बंद पाडून तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात आंदोलन समितीचे गिरीधर बैस, मुरलीधर टेकाम, अशोक सिडाम, विराज मुरकुटे आदींचा समावेश होता. यासोबतच सिंदेवाही, नागभीड, चिमूर, बल्लारपूर, गोंडपिंपरी या तालुक्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

भद्रावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद
भद्रावती येथील व्यापारी बांधवांनी तथा शैक्षणिक संस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फुर्तीने दुकाने व शाळा -महाविद्यालय बंद ठेवले. विदर्भवाद्यांनी ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर निनादून सोडला. आंदोलनकर्त्यांमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. विवेक सरपटवार, सचिव राजू बोरकर, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, चंद्रकांत गुंडावार, प्रशांत कारेकर, संतोष रामटेके आदींचा समावेश होता.

नांदाफाटा येथे तणाव
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी बंददरम्यान रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Kadakadit in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.