महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 03:38 PM2018-11-01T15:38:14+5:302018-11-01T15:49:42+5:30

महानिर्मितीमधील प्रकल्पग्रस्त कुशल, अर्धकुशल व अकुशल उमेदवारांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

Increase in the stipend of the candidates in mahanirmiti | महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ

महानिर्मितीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ

Next
ठळक मुद्देऊ र्जामंत्र्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानिर्मितीमधील प्रकल्पग्रस्त कुशल, अर्धकुशल व अकुशल उमेदवारांच्या विद्यावेतनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना दिवाळीनिमित्त ही भेट असून येत्या १ नोव्हेंबरपासून ही वाढ लागू करण्याचे निर्देश उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, हे विशेष.
कुशल प्रकल्पग्रस्तांना महानिर्मितीच्या सेवेत सामावून घेण्यास प्राधान्य देण्यात येते. ज्यांना नियमितपणे सामावून घेता आले नाही, अशा आयटीआयधारक, आयटीआय नसलेल्या प्रकल्पग्रस्तांना सामाजिक जबाबदारी अंतर्गत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. प्रकल्पग्रस्तांना तंत्रज्ज्ञ ३ या पदामध्ये सरळ सेवेत भरती करून घेण्यासाठी कुशल बनविले जाते. प्रकल्पग्रस्तांसाठी प्रगत कुशल प्रशिक्षण योजना बनविण्यात आली. अशा प्रकल्पग्रस्तांना २०१० मध्ये सुरू झालेल्या योजनेनुसार सहा हजार रूपये विद्यावेतन निश्चित करण्यात आले होते. या विद्यावेतनात कालांतराने वाढ करण्यात आली. २०१३ मध्ये विद्यावेतनातदोन हजार रूपये वाढ करनू ते आठ हजार करण्यात आले. सन २०१४ मध्ये प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीला तीन वर्षांपर्यंत आठ हजार व तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले.
वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या कुशल प्रशिक्षणार्थीला ५८ वर्षापर्यंत १० हजार एवढा निर्वाह भत्ता देण्याची तरतूद २०१५ मध्येच करण्यात आली. २३ आॅक्टोबर २०१५ च्या परिपत्रकानुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना नोेकरीच्या बदल्यात पाच लाख रूपये एक रकमी अनुदान देऊन आपली नोकरीवरील हक्क सोडण्याची तरतूदही करण्यात आली. दरम्यान, किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ना. हंसराज अहीर यांच्याकडे केली होती. ना. अहीर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या विद्यावेतनात पुन्हा घसघशीत वाढ करून त्यांना दिवाळीची भेट दिली आहे.

अशी आहे वाढ
आयटीआयधारक प्रकल्पग्रस्त अकुशल उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला १४ हजार रूपये विद्यावेतन, आयटीआयधारक कुशल उमेदवाराला पाच वर्षापेक्षा अधिक प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला, त्या उमेदवाराला १६ हजार रूपये, इयत्ता पहिली ते आठवी अकुशल उमेदवाराला १४ हजार रूपये, इयत्ता नववी ते बारावी अर्धकुशल उमेदवाराला १४ हजार रूपये, वाहन चालक नर्स, फार्मासिस्ट पदवीधर कुशल उमेदवाराला १५ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. एकूणच प्रकल्पग्रस्त असलेल्या सर्वच वर्गवारीच्या उमेदवारांच्या विद्यावेतनात चांगलीच वाढ करून किमान वेतन कायद्यानुसार या उमेदवारांना विद्यावेतन देण्याचा निर्णय उर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतला.

Web Title: Increase in the stipend of the candidates in mahanirmiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.