‘बँड आणि चिंधीबाजार’ किती दिवस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:13 PM2018-02-23T23:13:12+5:302018-02-23T23:13:12+5:30

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कविता, कादंबरी व लोकनाट्यातून दरिद्री, दु:खी, पीडित व्यक्तींना नायकत्व बहाल करून विषम समाजव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याची प्रेरणा दिली.

How many days are 'band and ragasbazar'? | ‘बँड आणि चिंधीबाजार’ किती दिवस?

‘बँड आणि चिंधीबाजार’ किती दिवस?

Next
ठळक मुद्देलोकमत व्यासपीठ : मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांचा सवाल

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कविता, कादंबरी व लोकनाट्यातून दरिद्री, दु:खी, पीडित व्यक्तींना नायकत्व बहाल करून विषम समाजव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याची प्रेरणा दिली. श्रमिकांनाही जीवनमूल्य असते आणि ते जपण्यासाठी प्राणपणाने झुंज देतात. पण, या प्रतिभावान वास्तवदर्शी महान लेखकाचा चंद्रपुरातील मातंग समाज आजही बँड आणि चिंधीबाजाराचा व्यवसाय करून पोटाची खळगी भरत आहे. या समाजाच्या भळभळत्या जखमांवर केवळ फुंकर घालण्याचेच काम सरकारकडून अनेक वर्षांपासून होत असल्याने बँड आणि चिंधीबाजार आणखी किती दिवस हा सवाल ‘लोकमत’ व्यासपीठावर मातंग समाज बांधवांनी उपस्थित केला.
यावेळी मातंग समाज पंचकमिटीचे अध्यक्ष राजकिशन पायगुन, बजरंग वानखेडे, सोनू डोंबरे, मानव आमटे आदी उपस्थित होते. मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक समस्यांची माहिती देताना पायगुन म्हणाले, मातंग समाज हा इतरांच्या सुखदु:खाप्रसंगी वाद्य वाजवून उदरनिर्वाह करतो. जगण्याचे कोणतेही साधन नसल्याने हाच व्यवसाय शेकडो वर्षांपासून आधार ठरला होता. काळाच्या वादळात या व्यवसायावर इतर समाजाने अतिक्रमण केले. त्याचे दुष्परिणाम मातंग समाज भोगत आहे. भीषण दारिद्र्यात असणाºया समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष नाही. त्यामुळे समाजाच्या समाज दारिद्र्याचे दशावतार झाले आहेत. युवापिढी शिक्षण घेण्यास उत्सुक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलेल, या हेतूने प्रयत्न करु लागली. परंतु पोटाची खडगी कशी भरावी, या प्रश्नांने पोरांचे मायबाप घायाळ झाले आहेत. लोकशाही अण्णा भाऊ साठे यांनी मातंग समााजाचे दु:ख साहित्यातून मांडले.
समाज संघटीत व्हावा, यासाठी लेखनीद्वारे प्रबोधन केले. हा वारसा मातंग समाजाला लाभूनही घरातील दारिद्र्य अद्याप संपले नाही, अशी व्यथा पायगुन यांनी व्यक्त केली. पारंपरिक वाद्य वाजविण्याच्या व्यवसायावर पोट भरणे कठीन झाले. नवीन व्यवसाय करण्यास भांडवल नाही. शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहोचल्या नाहीत. प्रशासकीय क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्थेमुळे गरीबांचा निभाव लागत नाही. मातंगांसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. दरवर्षी वेगवेगळ्या योजनांची घोषणा होते. परंतु त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही. कुटुंबातील मुलांच्या भविष्याकडे पाहून महिला विविध कामे करतात. पुरुष मंडळी वाद्य वाजवितात तर महिला चिंधी बाजारात जुनी कपडे विकून संसाराला हातभार लावतात. अलिकडे चिंधी बाजाराला उतरती कडा लागली. जुने कपडे कुणी घेत नाही. १५ रुपयाला पँट आणि १० रुपयाला शर्ट अशी भावभाजी करुन ग्राहक खरेदी करतात. दिवसभर उन्हात बसूनही दीड-दोनशे रुपये हाती येत नाही. हमाल, मजुरी करणारे कामगार हे आमची ग्राहक आहेत. श्रीमंतांना चिंधी बाजाराशी देणेघेणे नाही. आर्थिक अगतिकता म्हणूनच आमच्या महिला हा व्यवसाय करतात, असे मत राजकिशन पायगुण यांनी मांडले.
चंद्रपूर शहरातील नेहरु विद्यालयाच्या मागील परिसरात मातंग समाजाची वस्ती आहे. बिनबागेट पर्यंत पसरलेल्या या वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक घरकुल मिळाले नाही. पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, अर्धवट नाली बांधकाम आदी समस्या पाहिल्या की श्रीमंतांना शिसारी येते. याला दोषी कोण? याच वॉर्डामध्ये मातंग समाजाचे समाजभवन बांधण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम होतात. परिवर्तनवादी विचारांचे काही कार्यकर्ते व शिक्षक मातंग मुलांना नि:शुल्क शिकवणी देतात. हा बदल सोडला तर, बाकी अंधार आहे. श्रीमंतांच्या लग्न वरातीपुढे तेजाळलेले झुंबर डोक्यावर घेवून पुढे जाणाºया समाजात कीर्र अंधार आहे. इतरांच्या सुखदु:खात बँड वाजवून पाखली वाहण्यातच अनेक पिढ्या वाया गेल्या. हे दिवस बदलणार नाही काय, हा प्रश्न युवकांच्या मेंदूला झिणझिण्या आणतो. बँड वाजविण्याचा व्यवसाय करण्याची आमची अजितबात इच्छा नाही. पण नाईलाज आहे, अशी वेदना सोनु डोंगरे या युवकाने चर्चेदरत्यान मांडली. बजरंग वानखेडे म्हणाले, काळानुसार बँड वाजविण्याच्या व्यवसायात बदल करुन अन्य व्यवसाय करण्याची खुप इच्छा आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाकडून कर्ज मिळावे, यासाठी अर्ज केला होता. अनेकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या आणि पुन्हा बँड वाजवू लागलो. चर्चेत सहभागी झालेल्या दहावीतील सोनु डोंगरे या विद्यार्थ्यानेही हेच दु:ख कथन केले. मातंग वॉर्डातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती बँड वाजवितो. वर्षातून चार महिने चालणार हा व्यवसाय कुटुंबाची चूल पेटविण्यास उपयोगी येत नाही. महिला चिंधी बाजारात जुने कपडे घेवून विकायला बसतात. मात्र, आमचेच आयुष्य फ ाटके आहे बदलले पाहिजे, अशी अपेक्षाही वानखेडे यांनी व्यक्त केली. बँडचे दुकान लावण्यासाठी चंद्रपुरात कायमस्वरूपी जागा नाही. रस्त्यावर टूल टाकून त्यावर बँड ठेवला जातो. लग्न कार्यासाठी आॅर्डर घेण्यास कुणी ग्राहक आले तर रस्त्यावरचे दुकान पाहून आमच्यावर विश्वास ठेवत नाही. अडवॉन्स मागल्यास नकार देतात. जागा कायमस्वरूपी दुकान असते तर ही वेळ मातंग समाजावर आली नसती. बँड वाजविण्याचा दरही मिळाला असता. बँड पार्टीचा व्यवसाय करणाºया राजकिशन पायगुन सांगतात, लोकांच्या आनंद आणि दु:खासाठी आम्ही बँड वाजवितो.
मात्र, स्थिती बदलली नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने संघटन शक्ती दुबळी आहे. नेते मंडळी केवळ निवडणुकीदरम्यान मातंग वस्तीमध्ये येतात. त्यानंतर पाच वर्षे कुणी फिरकत नाही. युवापिढी हा व्यवसाय सोडण्याच्या मानसिकतेत आहे. आजोबा-पंजोबाने केलेला व्यवसाय नातवाकडे आला. यातून केवळ दोन वेळच्या जेवणाचीच व्यवस्था होवू शकते. आदर व सन्मान मिळत नाही, हे बदलले पाहिजे, अशी अपेक्षा मानव आमटे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली.
शिकलेली मंडळी लपवितात ओळख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षामुळे मातंग समाजातील काही मंडळी शिकून मोठी झालीत. आर्थिक समस्या सुटल्या. अन्य समाजात प्रतिष्ठा मिळाली. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून ही मंडळी समाजाच्या उपयोगी येत नाहीत. ‘मातंग’ ही ओळख लपविण्यासाठीच अनेकांचा खटाटोप चालतो. ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या समाजासाशी सांस्कृतिक व जैविक नाळ जोडली आहे, हेही विसरतात. मातंग वस्तीशी संबंध ठेवत नाही. ज्यांचे प्रश्न सुटले त्यांनी समाजाकडे मागे वळून पाहिले पाहिजे, ही अण्णा भाऊंची शिकवण आहे. पण, आपण मातंग असल्याचेच काहींना लाज वाटते, अशी नाराजी चर्चेदरम्यान समाजबांधवानी व्यक्त केली.
अण्णा भाऊ साठे महामंडळाकडून अपेक्षाभंग
राज्य शासनाने मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाठी अण्णा भाऊ साठे महामंडळाची स्थापना केली. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा डंका वाजविणाºया सरकारने महामंडळाच्या निधीमध्ये कपात केली. महामंडळाचा खर्च परवडत नाही, या कारणाखाली दुर्बल घटकांचा विकास निधी अन्य योजनाबाह्य कामांसाठी वापरला जात आहे. चेहरे पाहून कर्ज प्रकरणे मंजूर करणाºया काही अधिकाºयांकडून मातंग समाजाला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे युवापिढीमध्ये अस्वस्थता आहे. चंद्रपुरातील मातंग वस्तीमध्ये दारिद्रयरेषेखाली नागरिक असतानाही मनपानेही आजपर्यंत कुणालाही घरकुल दिले नाही. मातंग सामाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू आहेत, असे मत कार्यकर्त्यांंनी चर्चेप्रसंगी व्यक्त केले.
 

Web Title: How many days are 'band and ragasbazar'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.