कोळसा खाणींनी घातला उद्योगाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:05 AM2019-05-04T00:05:52+5:302019-05-04T00:06:28+5:30

मुंबई- नागपूर रेल्वेमार्ग १८६७ रोजी सुरू झाल्यानंतर तत्कालीन सी. पी. अ‍ॅण्ड बेरार प्रांतातील कृषी व उद्योगाचे अर्थकारण बदलले. १८७७ रोजी वर्धा ते वरोरा रेल्वेमार्ग पूर्ण झाला. चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील कोळसा खाणींतील ब्लॅक गोल्डवर नजर ठेवून ब्रिटीशांनी वर्धा-वरोरा- बल्लारपूरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू केला.

The foundation of coal-fired industry | कोळसा खाणींनी घातला उद्योगाचा पाया

कोळसा खाणींनी घातला उद्योगाचा पाया

googlenewsNext
ठळक मुद्देखाणींच्या राष्ट्रीयीकरणाला ४७ वर्षे पूर्ण : प्रदूषण नियंत्रण व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुंबई- नागपूर रेल्वेमार्ग १८६७ रोजी सुरू झाल्यानंतर तत्कालीन सी. पी. अ‍ॅण्ड बेरार प्रांतातील कृषी व उद्योगाचे अर्थकारण बदलले. १८७७ रोजी वर्धा ते वरोरा रेल्वेमार्ग पूर्ण झाला. चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील कोळसा खाणींतील ब्लॅक गोल्डवर नजर ठेवून ब्रिटीशांनी वर्धा-वरोरा- बल्लारपूरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू केला. यातून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील जिल्ह्याच्या उद्योगाचा पाया घातला. दरम्यान, कोळसा खाण उद्योगातील गैरव्यहारांना चाप बसविण्यासाठी १ मे १९७२ रोजी देशातील खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर कोल इंडिया ही सर्वोच्च सरकारी कंपनी उदयाला आली. दरम्यान, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे कोळसा खाणींत खासगीकरण शिरले. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणाच्या ४७ वर्षे पूर्ण झाले. परंतु, शेतकरी व प्रकल्पग्रतांचे पुनर्वसन, मोबदला आणि प्रदूषण नियंत्रणाच्या विविध समस्या अधांतरीच राहिल्या आहेत.
१९९१-९२ नंतर सुरू झालेल्या खुल्या आर्थिक धोरणांच्या कालखंडात जिल्ह्यात सात कोळसा खाणी सुरू झाल्या होत्या. या खाणींचे सुत्र कोल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपच्या हातात होती. भारतात उत्पादन होणाऱ्या कोळशापकी तब्बल ८० टक्के कोळसा उत्पादनावर कोल इंडियाचे वर्चस्व आहे. कोल इंडियाने स्वीकारलेल्या खुल्या कोळसा खाण धोरणामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. अद्ययावत तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक मानवी श्रमाचा वापर करून उत्पादनावर भर देण्यात आली. परिणामी, पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या. मोठ्या दुर्घटना होऊन कामगारांचा बळी जाऊ लागला. पर्यावरण, प्रदूषण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गुंतागुतीचे झाले. जागतिकीकरणानंतर १९९३ व १०९६ रोजी कायद्यात दुरूस्ती करून खासगी उद्योगांना स्वतंत्र खाणी देण्यास सुरूवात झाली. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातही काही खासगी कंपन्यांनी करार करून कोळशाचे उत्पादन घेत आहेत. अशा करारांमधून सदर कंपन्या कामगार व परिसरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न उडवून लावतात. केंद्र सरकार कामगार व परिसरातील नागरिकांच्या हिताबाबत प्रामाणिक असले तरच न्याय पदरात पडू शकतो. अन्यथा प्रकल्पग्रस्त व नागरी सुविधांची उपेक्षा होते. जिल्ह्यातील कोळसा खाण परिसरातील प्रलंबित समस्या या खासगीकरणाच्या बेपर्वाई धोरणांचाच परिपाक आहे. कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर असंघटीत कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटतील असे वाटत होते. परंतु, कोळसा खाण राष्ट्रीयीकरणाच्या ४७ वर्षांनंतरही तेच प्रश्न नव्याने गंभीर स्वरूप धारण करीत आहेत.

कोळशाचा इतिहास
अ‍ॅरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४ ते ३२२) यांनी त्यांच्या ‘मेटरॉलॉनिका’ या पुस्तकात व त्यांचे शिष्य थिओफ्रॅस्टस (इ. स. पू. २८७) यांनी स्वत:च्या ग्रंथांमध्ये कोळशाविषयी लिहिले आहे. भारताला प्राचीन काळापासून कोळशाची माहिती असल्याचे अनेक पुरावे पुढे आले. विदेशातील नागरिक भारतात येण्यापूर्वी कोळशाचा व्यापार सुरू झाला नव्हता. १७७४ रोजी पश्चिम बंगालमधील बीरभूम व पांचेत या जिल्ह्यात सर्वप्रथम कोळसा सापडला. १८२० रोजी पहिली कोळसा खाण राणीगंज (पश्चिम बंगाल) येथे सुरू झाल्याचा इतिहास सांगतो.

कोळसा कसा तयार झाला ?
ग्रीक शास्त्रज्ञ थिओफ्रॅस्टस यांच्या ग्रंथातील नोंदीनुसार,३० कोटी वर्षांपूर्वी सखल भागात घनदाट जंगले होती. अतिपर्जन्य व पूर वैगेरे कारणांमुळे जंगले खचत गेली. जंगलातील वृक्ष खोल गेले. तब्बल २० मैल खोल गेलेल्या लाकडांपासून कोळसा तयार झाला. भारतात व्यापारी तत्त्वावर कोळशाच्या खाणकामाला सव्वादोनशे वर्षांपूर्वी सुरूवात झाली. १८५३ रोजी रेल्वे धावू लागल्याने कोळसा उत्पादनाला जोमाने वेग आला. देशाला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर सरकारने या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले. देशामध्ये सद्यस्थितीत ५०० कोळसा खाणी आहेत. त्यामध्ये चंद्रपूर, बल्लापूर व घुग्घुस परिसरातील खाणी अतिशय समृद्ध असून कोळशाची देशभरात मागणी असते.

अशी असते कोळसा खाण
सामान्यत: ज्याला दगडी कोळसा म्हटल्या जाते तो तोबिट्युमेनी कोळसा असतो. आगगाडी व आगबोटींची इंजिने, कारखान्यातील भट्टी, पाणी तापविण्याचे बंब, घरगुती शेगड्यांसाठी हा जळण म्हणून वापरला जातो. हा कोळसा थराच्या स्वरूपात आढळतो. तीन दिशांनी जाणारी दुर्बलता अथवा संधीची प्रतले (पातळ्या) असतात. या तीन प्रकारच्या गटांपैकी एका गटातील प्रतले कोळशाच्या स्तरणतलास (थराच्या पातळीस) समांतर असतात. उरलेल्या दोन गटांची प्रतले कोळशाचे स्तरणतल व एकमेकाला काटकोन करून असतात. या स्तरणतलामुळे कोळसा खणून काढताना किंवा फोडताना चौरस ठोकळ्याच्या आकाराचे तुकडे पडतात, अशी माहिती कोल इंडियाच्या संशोधन अहवालात नमुद आहे.
असा ओळखला जातो कोळशाचा दर्जा
वनस्पतीजन्य पदार्थ हे मुख्यत: कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन आणि नायट्रोजन यांचे निरनिराळ्या प्रकारे रासायनिक संयोजन होऊन तयार झालेले असतात. वनस्पतीजन्य पदार्थांचे कोळशात परिवर्तन होताना त्यातील बाष्पनशील द्रव्ये हळूहळू निघून जातात. स्थिर कार्बनाचे प्रमाण उत्तरोत्तर अधिक होते. एखाद्या कोळशात असणाºया स्थिर कार्बनच्या प्रमाणावरून त्याच्या परिवर्तनाचे प्रमाण किती आहे, हे कळते. परिवर्तनाच्या प्रमाणावरूनच कोळशाचा दर्जा ओळखला जातो. परिवर्तन अधिक असल्यास कोळशाचा दर्जा उच्च असतो. एखाद्या कोळशाचा दर्जा मुख्यत: त्याच्या इंधन गुणोत्तरावर अवलंबून असल्याचे कोळसा अभ्यासक सांगतात.

कोळसा खाणींमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. जिल्ह्यात अनेक पुरक उद्योग आले. राष्ट्रीयीकरणानंतर खाणीमध्ये अनेक सुधारणा झाल्या. राष्ट्राच्या उद्योग उभारणीत कोळशाचा मोठा वाटा आहे. खाणीतील त्रुटींचीही सतत सुधारणा केल्या जात आहे.
- प्रभात येंडे, निवृत्त अधिकारी वेकोलि

Web Title: The foundation of coal-fired industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.